You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज, भाजपच्या 11 तालुकाध्यक्षांसह 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. बीड जिल्ह्यात भाजपच्या 11 तालुकाध्यक्षांसह 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्याने बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक नाराज असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असून जिल्ह्यातील सर्व 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. टिव्ही 9 हे वृत्त दिलं आहे.
आतापर्यंत एकूण 25 पदाधिकऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचाही समावेश आहे.
मोदी सरकारने नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात राज्यातील चार भाजप खासदारांना स्थान मिळाले. पण, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने परळीसह बीड जिल्ह्यात समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. "प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती," असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
पण राजीनामा सत्रानंतर आता पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2. 'राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांना देखील आवडले नाही' - देवेंद्र फडणवीस
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने शनिवारी (10 जुलै) मुंबईत बैलगाडीतून आंदोलन केलं. पण आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटल्याने गोंधळ उडाला. यावरुन भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
ते म्हणाले, "राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांना देखील आवडलेले दिसत नाही. त्यामुळेच ती बैलगाडी तुटली." महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मात्र बैलगाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते चढल्याने बैलगाडी तुटली. याचा व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. हीच संधी साधत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाक्ष्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आघाडी आणि युतीचा विचार न करता कामाला लागा. शिवसेना बळकट करा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांना देतात तेव्हा चालतं. पण तेच मी बोललो तर त्रास होतो."
3. भाज्या आणि डाळींच्या किमतीत वाढ
इंधनाचे वाढते दर आणि लॉकडाऊनचा फटका आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होताना दिसत आहे. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले असून डाळींच्या दरातही 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले.
गेल्या काही काळापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक खर्च महागला आहे. यामुळे पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांतून येणाऱ्या शेतमालाचे दर वधारल्याचे दिसते. तसंच लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे किरकोळ विक्रेत्यांनी किमती वाढवल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वसामान्य ग्राहकांना मात्र याचा भार उचलावा लागत आहे. मुंबईतील किरकोळ बाजारत भेंडी 60-80 रुपये किलो, कांदा 35-40 रुपये किलो, फ्लावर 60-80 रुपये किलो, गवार 80-100 रुपये किलो अशा दराने विक्री होत आहे. तर तूर, मसूर, मूग डाळींच्या किमतीही 120-140 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
4. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी 84 टक्के पालकांची सहमती?
15 जुलैपासून राज्यातील कोव्हिड-मुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने (SCERT) सर्वेक्षण केले असून त्यानुसार 84 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
यासाठी राज्यातील सव्वा दोन लाख पालकांनी आपली मते नोंदवली असून यापैकी 84 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
आठवी ते बारावीप्रमाणेच इतर इयत्ता सुद्धा सुरू करण्याबाबत पालकांचे मत जाणून घेण्यासाठी एससीईआरटी हे सर्वेक्षण करत आहे. हे सर्वेक्षण 12 जुलैपर्यंत सुरू राहणार असून पालक ऑनलाईन माध्यमातून आपले मत नोंदवू शकणार आहेत.
5. आता 'एवढे' तास चालणार रेल्वेचे काम
सकाळी सात ते दुपारी चार आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये आता रेल्वे विभाग काम करणार आहे. केंद्रीय रेल्वे विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
हा आदेश केवळ रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. यामुळे कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे. रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी आणि जलद गतीने काम व्हावे यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही शुक्रवारी (9 जुलै) केंद्रीय राज्यमंत्री पदभार स्वीकारला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)