You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हरलीन देओलने घेतलेला कॅच तुम्ही पाहिलात का?
सनी देओल, अभय देओल, बॉबी देओल ही नावं तुम्ही ऐकली असतील. आता हरलीन देओल हे नावही पक्कं लक्षात ठेवा. हरलीन भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरलीनने घेतलेल्या चित्तथरारक कॅचची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा आहे.
बाऊंड्रीबाहेर जाऊन चेंडू आत टाकून टिपणाऱ्या कॅचेसला रिले कॅच म्हटलं जातं. हरलीनने शिखा पांडेच्या गोलंदाजीवर अॅमी जोन्सचा पकडलेला कॅच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅचपैकी एक मानला जात आहे.
शिखा पांडेच्या गोलंदाजीवर अॅमी जोन्सने जोरदार फटका लगावला. चेंडू षटकार जाणार अशी स्थिती होती. मात्र हरलीनने बाऊंड्री कुठे आहे याचं भान राखत झेल टिपला.
आपण बाऊंड्रीपल्याड जाणार हे लक्षात आल्यानंतर हरलीनने हवेतच चेंडू आत टाकला. बाऊंड्रीबाहेर गेलेल्या हरलीनने अफलातून उडी मारून अफलातून कॅच टिपला.
हरलीनच्या हा अविश्वनीय कॅच पाहून भारतीय खेळाडूंनी तिच्या दिशेने धाव घेत तिचं कौतुक केलं. इंग्लंडच्या खेळाडूंनीही खेळभावना दाखवत हरलीनचं कौतुक केलं.
या कॅचविषयी सोशल मीडियावर कळताच हरलीनच्या नावाची सगळीकडे चर्चा होऊ लागली. बीसीसीआयच्या महिला क्रिकेट ट्वीटर हँडल, आयसीसी यांच्यासह असंख्य आजीमाजी क्रिकेटपटूंनी हरलीनच्या कॅचचा व्हीडिओ शेअर करत तिचं भरभरून कौतुक केलं.
मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही ट्वीट करून हरलीनच्या कॅचचं कौतुक केलं. हरलीनचा कॅच हा यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम कॅच आहे असंही तेंडुलकर म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये असे रिले कॅच घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. एकट्याने शक्य नसेल तर खेळाडू बाऊंड्रीजवळ असणाऱ्या खेळाडूकडे चेंडू फेकतात. असे कॅच घेण्यासाठी प्रचंड फिटनेस लागतो. बाऊंड्री नेमकी कुठे आहे, आपलं शरीर कुठे आहे, पायाचा किंवा कुठल्याही शरीराच्या भागाचा संपर्क बाऊंड्रीला होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. उडी मारताना चपळता दाखवावी लागते. असे कॅच टिपण्यासाठी प्रसंगावधान लागतं.
किंचित चूक झाली तरी अंपायर सिक्स देतात. सगळं मुसळ केरात जाऊ शकतं. अनेकदा मागे प्रेक्षकांचा गोंगाट असतो. अशा वेळेस एकाग्र होऊन कॅच झेलावा लागतो. हरलीनने चपळता, फिटनेस, प्रसंगावधान यांचा सुरेख मिलाफ साधत हा अफलातून झेल टिपला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या कॅचचा व्हीडिओ शेअर करत हरलीनचं कौतुक केलं आहे.
"क्रिकेटच्या मैदानावर टिपलेल्या सर्वोत्तम कॅचपैकी एक", अशा शब्दात व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हरलीनचं कौतुक केलं आहे.
"महिला क्रिकेटमध्ये अशा स्वरुपाचे कॅच आता खेळाडू टिपू लागतील अशी आशा आहे. मला स्वत:ला असा कॅच पकडायला आवडेल", असं इंग्लंडच्या नॅट स्विहरने म्हटलं आहे.
"अशक्य! थरारक. हरलीन तुझं मनापासून अभिनंदन. कमाल कॅच पकडलास", असं ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकर यांनी म्हटलं आहे.
अप्रतिम कॅच असं इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटू आणि समालोचक इसा गुहा यांनी म्हटलं आहे.
सर्वसामान्य प्रेक्षकांनीही हरलीनच्या कॅचचं मनापासून कौतुक केलं आहे. ट्वीटरवर हरलीनच्या कॅचची विशेषत्वाने चर्चा आहे. अनेक नेटिझन्स वारंवार हा व्हीडिओ पाहून हरलीनच्या समयोचित कृतीचं कौतुक करत आहेत.
जगभरातून या कॅचसाठी हरलीनवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. 23 वर्षीय हरलीन 10 ट्वेन्टी20 सामने खेळले असून, दोन वर्षांपूर्वी तिने भारतासाठी पदार्पण केलं होतं.
हरलीन आक्रमक फलंदाजी करते आणि उपयुक्त गोलंदाजीही करते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)