PEW: हिंदूच खरे भारतीय कसे? भारतीयपणाच्या रिमेकची गोष्ट - सुहास पळशीकर

फोटो स्रोत, NurPhoto
- Author, सुहास पळशीकर
- Role, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
(लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)
भारतीय धर्माकडे कोणत्या पद्धतीने पाहतात याबाबतचा एक अहवाल आंतरराष्ट्रीय संस्थेने तयार केला आहे. हिंदुत्व आणि भारतीयत्व यांच्या परस्परसंबंधाकडेही या अहवालात विचार मांडण्यात आले आहेत.
➢ भारतातील नागरिक धर्माचा, धार्मिक भावनांचा आणि आंतरधर्मीय संबंधांचा कसा विचार करतात याविषयी PEW या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या एका मोठ्या पाहणीचा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला. त्यानुसार भारतीय लोक अधिक धार्मिक होऊ लागले आहेत, इतर धर्मांच्या लोकांशी त्यांचा अगदी मर्यादित संपर्क असतो, एकमेकांच्या धार्मिक उत्सवात ते जेमतेमच सहभागी होतात पण इतर धर्मांचा आदर करावा हे मात्र लोकांना तत्त्वतः मान्य आहे अशा काही गुंतागुंतीच्या पण फारशा नवीन नसलेल्या बाबी पुन्हा एकदा नजरेस आल्या आहेत. पण हिंदू असणे आणि भारतीय असणे यांचा हिंदूंच्या मनात संधा जुळला आहे हा त्यातला एक सध्या गाजणारा निष्कर्ष आहे.
➢ भारतातले सगळे नागरिक त्यांच्या डीएनएनुसार हिंदुच आहेत असे सरसंघचालक मोहन भागवत अलीकडेच म्हणाले. हा डीएनए त्यांना जैविक अर्थाने अभिप्रेत होता की संस्कृतिक अर्थाने ते कळायला मार्ग नाही, पण देशात हिंदू किंवा मुस्लीम कोणाचेच वर्चस्व असू नये, हे सांगतानाच त्यांनी गोसंरक्षण हे व्हायला पाहिजे--फक्त ते कायद्याने व्हावे असेही म्हटले. शिवाय झुंडींनी केलेल्या हिंसेच्या घटना काहीवेळा अतिरंजित असतात हे सांगायला ते विसरले नाहीत.
➢ ज्या दिवशी सरसंघचालकांच्या भाषणाची बातमी आली त्याच दिवशी हरयाणा भाजपाच्या प्रवक्त्यांनी गावागावातून मुस्लिमांना भारतातून हाकलून देण्याचा ठराव महापंचायतींनी पास करावा असे आवाहन केले! आणि लागोपाठ जेव्हा दिलीपकुमार यांचे निधन झाले तेव्हा स्वतःला हिंदुत्वाचे समर्थक म्हणवणार्या अनेक फुटकळांनी एक मुसलमान कमी झाला, असे म्हटले तर हरयाणा भाजपाच्या नेत्यांनी 'पैसे कमावण्यासाठी त्यांनी हिंदू नाव धरण केले'वगैरे सुविचार सामाजिक माध्यमातून मांडले. त्यांचा भाजपाने, संघाने किंवा मोहन भागवतांनी निषेध केल्याचे काही ऐकिवात नाही.
सारांश, भारतातील धार्मिकता ही धर्मश्रद्धा आणि स्वधर्मप्रेम यांच्या पलीकडे उतू जाते आहे का आणि त्यातून धर्म, देश, आणि राज्यसंस्था यांच्या संबंधांचा गुंता आणखी वाढत चालला आहे का, हे प्रश्न उभे राहतात आणि सगळ्यांना दुसर्यांच्या धर्माचा आदर करणे मान्य आहे एवढ्यावर समाधान मानण्याची वेळ आता उरलेली नाही, असा निष्कर्ष काढता येतो.

फोटो स्रोत, Getty Images
या गुंत्याचे मर्म दोन मुद्द्यांमध्ये आहे. एक म्हणजे उत्तरोत्तर, हिंदू असण्याचा सार्वजनिक अर्थ मुस्लिम-विरोधी असणे असा होतो आहे, झाला आहे आणि दुसरा म्हणजे भारतीय (राष्ट्रवादी-राष्ट्रप्रेमी) असणे हे फक्त हिंदूंचे वैशिष्ठ्य आहे असे अनेक लोकांना वाटू लागले आहे. हा दुसरा मुद्दा PEWच्या सर्वेक्षणात देखील आलेला आहे. बहुसंख्य हिंदूंना (64 टक्के हिंदूंना) असं वाटते की खर्या अर्थाने भारतीय असण्यासाठी हिंदू असणे आवश्यक आहे.
म्हणजे एका अर्थाने आपण भारत नावाच्या स्वप्नाची पुनर्रचना करतो आहोत किंवा रिमेक म्हणा!
हिंदूंचा देश?
आता हे सर्वेक्षण एका आंतरराष्ट्रीय संस्थेने वगैरे केलेलं असल्यामुळे माध्यमांनी त्याच्या या निष्कर्षाचा गाजावाजा करणे स्वाभाविक आहे; पण ही भावना आज अचानक निर्माण झाली आहे अशातला काही भाग नाही.
एका अप्रत्यक्ष मार्गाने हेच वास्तव 2004 मध्ये मी एका लेखात मांडले होते: त्याचा संबंध भारतीय असण्याशी थेट नव्हता, पण एकूण बहुसंख्याक समाजाच्या भारतावरील मालकी असण्याच्या भावनेशी नक्कीच होता. तेव्हा 30 टक्क्यांपेक्षा जास्त लोक अशी भावना बाळगून होते की बहुसंख्य असलेल्या समुदायाच्या मर्जीने सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत.

फोटो स्रोत, Getty Images
तेव्हापासून मी या भावनेला 'बहुसंख्याकवाद' असे म्हणत आलो आहे आणि आता तो शब्द अनेकजण सरसकट वापरतात. आता 2019 मध्ये अशी भावना बाळगणार्यांचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आहे असे आम्ही लोकनीतीच्या मार्फत केलेल्या सर्वेक्षणात दिसते.
तेव्हा भारतात हिंदू बहुसंख्य आहेत या वास्तवाच्या पलीकडे भारत हा 'हिंदूंचा'देश आहे आणि बाकीचे सगळे हे बाहेरचे आहेत आणि त्यांनी आपले भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी जास्त देशप्रेम दाखवले पाहिजे किंवा किमान काही बाबतीत तरी हिंदूंच्यासारखे वागले पाहिजे, असा आग्रह किती तरी हिंदूंच्या मनात असतो.
अशी मानसिकता साकारण्याच्या मागे तीन घटक करणीभूत आहेत.
बिगरहिंदू आले कुठून?
पहिला घटक म्हणजे भारताच्या सामाजिक-धार्मिक इतिहासाचे अपुरे आणि चुकीचे आकलन.
एक तर ज्याला आज हिंदू धर्म असे ढोबळ नाव आहे, त्यात अनेक वैचारिक संप्रदाय आजही आहेत आणि पूर्वी देखील होते. ते सगळे एकेका टप्प्यावर स्वतंत्र आध्यात्मिक भूमिका घेऊन आणि 'वैदिक' धर्मविचारापासून फारकत घेऊन उभे राहिले. काळाच्या ओघात त्यातील अनेकांचा एका व्यापक हिंदू नावाच्या धार्मिक समूहात अर्धामुर्धा समावेश झाला, कधी देवाणघेवाण झाली, कधी दडपेगिरी झाली, आणि त्यातून भिन्न पंथ हे हिंदू बनले.
तेव्हा या अर्थाने 'भारतवर्ष' हा भौगोलिक परिसर हिंदू होता असे म्हणण्यापेक्षा त्यात अत्यंत समृद्ध आणि बहुविध आध्यात्मिक, धार्मिक आणि (कर्मकांडप्रचुरदेखील) परंपरा होत्या असे म्हणणे योग्य ठरेल. पण तो इतिहास गुंडाळून वेगळे हिंदू पॅकेज तयार केले जाते आणि त्यात एका मोठ्या समूहाला कोंबून टाकले जाते. वसाहतकाळात हे मोठ्या प्रमाणावर झाले आणि नंतर त्याचे राजकारण सातत्याने चालू राहिले. शीख असोत की बौद्ध, त्यांचे वेगळे अस्तित्व दीर्घ काळ टिकले पण ते हिंदूच आहेत हा आग्रहदेखील चालू राहिलाच.
तरीही एक युक्तिवाद उरतोच. हे सगळे 'इथले' धर्म आहेत, बाहेरून आलेल्यांचे काय?
पवित्र भूमीचा मुद्दा
म्हणून तर सावरकरांनी ज्यांची पवित्र भूमी इथे आहे ते हिंदू अशी व्याख्या प्रचलित केली. तिचे इंगित हेच की ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम त्यातून आपोआप वगळले जावेत! पण ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम यांच्या स्थापनेनंतर अगदी लगेचच अनेक कारणांनी त्या धर्मांचे लोक (व्यापार, लढाया,धर्मप्रसार, या कारणांनी) भारतात आले. म्हणजे हे 'बाहेरून' आलेले लोक आता आज रोजी इथे येऊन किती शतके लोटली आहेत हे समजून घेतले पाहिजे.
अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये गेलेल्या पहिल्या पिढीच्या भारतीयांना किंवा दुसर्या पिढीच्या भारतीयांना तिथे सगळे मिळते. इंग्लंडमध्ये तशी व्यक्ती मंत्री झाली की आपण जल्लोष करतो, पण इथे अनेक शतकांच्या पूर्वी आलेल्या लोकांच्या आजच्या पिढीला बाहेरचे मानतो ही काय भानगड आहे?
शिवाय, बाहेरून आलेले लोक थोडेच होते. पण इथले अनेक त्या धर्मांमध्ये गेले (पुन्हा सक्तीने किती, लोभाने किती आणि स्वेच्छेने किती हा वादाचा विषय आहेच). म्हणजे ते 'इथलेच' आहेत! तेव्हा सच्चा भारतीय असण्यासाठी हिंदू असण्याची गरज असते असे समजणे निरर्थक नाही का?पण 'भारत हिंदूंचा आहे', सगळे बिगर-हिंदू बळजबरीने दुसर्या धर्मात गेले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसर्या धर्मांची शिकवण भारत-विरोधी असते या सगळ्या समजुतींमुळे 'हिंदू असणे' ही भारतीय असण्याची मुख्य किंवा खरी खूण मानली जाते.
राष्ट्रकल्पनेतील गफलत
असं मानलं जाण्याला अर्थातच सामाजिक-ऐतिहासिक कारणाच्या पलीकडचे एक परकीय विचारातून आलेले वैचारिक कारण आहे. ते 'राष्ट्र'म्हणजे काय याच्याशी संबंधित आहे.
विसाव्या शतकात भारतात जेव्हा वसाहतवादाच्या विरोधातील सार्वजनिक भावना आकार घेत होती तेव्हा आपण सगळे भारतीय म्हणून इंग्रजांच्या विरोधात आहोत याचे भान येण्यास गती मिळाली. अप्रत्यक्षपणे ही जाणीव म्हणजे आपण भारतीय म्हणून एक आहोत ही जाणीव.
इथल्या सरंजामदार आणि राजेरजवाड्यांना एकोणीसाव्या शतकात (त्यांच्या सत्तेला धोका उभा राहिल्यामुळे) झाली आणि त्यातून 1857 मध्ये त्यांच्यातील अनेकांनी एकत्र येऊन लढा देण्याचा प्रयत्न केला. पण लोकसहभाग आणि सुस्पष्ट राष्ट्रभावना यांना गती मिळाली ती त्याच्या नंतर.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामागे सैद्धांतिक चौकट होती ती राष्ट्र नावाच्या संकल्पनेची. पण राष्ट्र म्हणजे काय हे ठरवताना काहींनी युरोपाची आणि त्यातही तिथल्या विकृत राष्ट्रकल्पनेची नक्कल केली. ती विकृत कल्पना बाजूला ठेवली तरी युरोपातील राष्ट्रे अगदीच तोकड्या सामाजिक आधारावर आणि फुटकळ भौगोलिक क्षेत्रात अस्तित्वात आली, त्यामुळे त्यांनी भाषा, वंश, धर्म, हे घटक राष्ट्रासाठी पायाभूत असतात असे मानले आणि तोच विचार जणू काही राष्ट्रवादाचा एकमेव सिद्धांत म्हणून प्रसृत झाला. आपल्याकडे अनेकांवर त्याचा प्रभाव पडला.
त्यातच भर पडली ती आक्रमक, परसंशयावर आधारित आणि 'दुसर्यांना'किंवा बाहेरच्यांना वगळण्यावर भिस्त ठेवणार्या राष्ट्र-विचाराची. त्याच्या नादी लागून आपणही भारत हा हिंदूंचा देश आहे, राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला एका संयुक्त आधाराची गरज आहे, म्हणून धर्म हा तो आधार मानावा असे मानणारे गट संघटित होऊ लागले. वसाहतवादी राजवटीला ही घडामोड सोयीची होती कारण त्यामुळे आपोआपच 1857 मध्ये होऊ घातलेली बहुधर्मीय एकजूट मागे पडून प्रत्येक धर्म खास करून हिंदू आणि मुस्लीम स्वतंत्रपणे संघटित होऊ लागले.
त्याला कडाक्याचा विरोध करून समावेशक, अनाक्रमक आणि बहुधर्मीय-बहुभाषिक असे राष्ट्र घडू शकते असा दावा केला गेला. भारत तसे राष्ट्र आहे कारण इथल्या प्रदीर्घ परंपरेत सर्वच पंथ, धर्म, यांच्या लोकांचा वाटा आहे आणि त्यातून आपण एक बनलो आहोत असे सांगणारा गांधी-नेहरूप्रणीत राष्ट्रवाद पुढे जास्त लोकप्रिय ठरला आणि त्यामुळे जणू काही संकुचित राष्ट्रवाद मागे पडल्याचे तात्पुरते चित्र तयार झाले. पण एकीकडे मुस्लिम अलगतावाद विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक भागांमध्ये पसरला आणि त्याच्या जोडीने भारत हा (फक्त) हिंदूंचाच देश आहे हा विचार बळावला.
देश आणि धर्म यांची अशी काही गल्लत या घडामोडीने करून ठेवली की कोणीही चटकन युक्तिवाद करताना असं म्हणतात की ख्रिश्चनांना युरोपातले देश आहेत, मुसलमानांना त्यांचे देश आहेत, हिंदूंना कुठे त्यांचा देश आहे? तेव्हा भारत 'हिंदूंचा देश असायला हवा' या भावनेच्या मागे देश हे धर्मावर आधारित असतात हे गृहित असतं आणि राष्ट्र ही संकल्पना संकुचितपणे विचारात घेतलेली असते.
युरोपीय अनुभव आणि सिद्धांत यांच्यानुसार राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी एकाच एक सांस्कृतिक-वांशिक-धार्मिक आधाराची गरज असते ही गैरसमजूत तेव्हापासून म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून आपल्या भारतीयत्वाच्या मानगुटीवर बसली आहे. जे थेट हिंदुत्ववादी राजकारणात पडत नाहीत, त्यांना सुद्धा या समजुतीने घेरलेले असते की भारत जर राष्ट्र म्हणून टिकून राहायचा असेल तर त्यासाठी हिंदू असणे महत्त्वाचे आहे आणि हिंदू असले की भारतीयत्व आपोआप सिद्ध होते.
या विचाराचा राजकीय रोख मग वळतो तो परधर्मीयांकडे.
परधर्मविरोधी राजकारण
स्वधर्म बाजूला पडून मग सुरू झाले ते संशय, स्पर्धा आणि विद्वेषाचे राजकारण.
एकदा भारत हा हिंदूंचा देश आहे असे मानले आणि 'भारतीय' असण्यासाठी म्हणजे राष्ट्रीय असण्यासाठी हिंदू असणे महत्त्वाचे किंवा आवश्यक आहे असे मानले की प्रश्न येतो की मग इतर धर्मांच्या लोकांचे करायचे काय?भारतात हिंदू आहेत 80 टक्के आणि तेही वर म्हटल्याप्रमाणे सगळया पंथांची गोळाबेरीज करून. उरलेल्यांचे काय करणार?
अर्थातच ज्यांना व्यवहार कळतो आणि वास्तवाचे भान असते ते हे मान्यच करतात की हिंदू नसलेले सुद्धा इथेच राहतील, आणि त्यांना काही किमान अधिकार आणि दर्जा द्यावाच लागेल. त्यामुळे सरसंघचालक जर असे म्हणाले असतील की हिंदू आणि मुसलमान इथेच राहतील तर त्यात थोर असे काहीच म्हटलेले नाही.
पण इतरांचे काय करायचे हा हिंदू राष्ट्रवादापुढे असणारा सनातन प्रश्न आहे.
त्यासाठी दोनतीन राजकीय रचितांचा वापर केला जातो.
'हिंदू खतरे में'
पहिलं म्हणजे आपण म्हणजे हिंदू धोक्यात येतो आहोत असे सतत सांगत राहायचे. भारतात हिंदूंची संख्या कमी होते आहे आणि एका टप्प्यावर इथे हिंदू अल्पसंख्य होणार आणि मुस्लिमांचे 'लाड' केले जातात इथपासून तर ठिकठिकाणी हिंदूंवर तिथले अल्पसंख्य समुदाय कशी दादागिरी करतात, प्रशासन कसे पक्षपाती आहे, कम्युनिस्ट हिंदूविरोधी आहेत, ममता हिंदूंच्या विरोधात कारस्थान करताहेत, जगनमोहन रेड्डी आंध्राला ख्रिश्चन-बहुल राज्य बनवताहेत, पेरियार आणि आता द्रमुक हे हिंदुविरोधी आहेत, अशा नाना तक्रारी जाहीरपणे आणि कुजबुजीच्या स्वरूपात चालू असतात. समाजात त्या पसरवल्या जातात.
त्यात आता सध्या भर पडली आहे ती आणखी एका जुन्या मुद्दयाची. तो म्हणजे धर्मबदल आणि धर्मप्रसार करण्याच्या अधिकाराचा. खरे तर हा अधिकार संविधानात आहे. तरीही वेळोवेळी त्याच्याविरोधात तक्रार केली जाते, तो अधिकार मर्यादित करण्याचे प्रयत्न केले जातात, पण ते सगळे झाले न्यायालयीन चौकटीत. सार्वजनिक विश्वात एक आकर्षक वाटणारा मुद्दा आता सध्या मांडला जातो आहे.
तो म्हणजे मुस्लिम तरुण कारस्थान करून हिंदू तरुणींना प्रेमात पाडतात (हा युक्तिवाद स्त्री स्वातंत्र्य-विरोधी आहे आणि स्त्रियांना मूढ मानणारा आहे हे देखील लक्षात घेतले जात नाही!) आणि त्यांना धर्म बदलण्यास भाग पाडतात असा प्रचार करून आणि त्याला 'लव्ह जिहाद' असे भावनिकदृष्ट्या लोकांच्या मनाला आवाहन करणारे नाव देऊन हिंदू समाजात अस्वस्थता वाढवली जाते. त्या विषयीचे कायदे न्यायालय कधीतरी पाचपंचवीस वर्षांनी विचारात घेईल, पण आज लोकमत त्यावरून भडकते हा मुद्दा शिल्लक राहतोच.
धार्मिकतेच्या जागी राजकीय कार्यक्रम
एकीकडे अल्पसंख्य धार्मिक समुदाय मुद्दाम धर्मांतरे घडवतात असे सांगत राहून परधर्मद्वेष पसरवणे चालू असतानाच दुसरीकडे सतत हिंदूंच्या भावनांना आवाहन केले जाईल अशा प्रतीकात्मक मुद्द्यांवर हिंदू समाजात प्रचार केला जातो. याचा थेट संबंध हिंदू धर्म, त्याचे तत्त्वज्ञान याच्याशी नसतो, तर हिंदूंना संघटित करणे, त्यांच्या धार्मिकतेचे सार्वजनिक अस्वस्थतेमध्ये रूपांतर करणे आणि हिंदूच कसे 'त्यांच्या' देशात पिडले जातात याचे कथानक समाजात पसरवणे याच्याशी असतो.
म्हणूनच हल्ली अभ्यासक कटाक्षाने हिंदू धार्मिकता आणि 'हिंदुत्व' यांच्यात फरक करतात. कारण एखादी व्यक्ती श्रद्धेने हिंदू असणे वेगळे आणि राजकीय-सामाजिक दृष्ट्या तिने स्वतःची आक्रमक, परधर्मविरोधी अशी ओळख स्वीकारणे हे वेगळे आहे. पण हिंदुत्वाला विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध असे समीकरण लोकांमध्ये ठसवले जाते, कारण ते केल्याशिवाय हिंदू असणे आणि भारतीय असणे अशी सांगड बसवता येणार नाही.
चार दशकांची देण
रामजन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने या वाटचालीला गती आली. या अर्थाने, गेली किमान चाळीस वर्षे ही वाटचाल जोमाने चालली आहे. त्यामुळे PEW च्या सर्वेक्षणात हिंदू आणि भारतीय यांची जी संलग्नता दिसते तिला गेल्या चार दशकांचा इतिहास ही थेट पार्श्वभूमी आहे.
आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या सर्व हिंदूंवर कमीअधिक प्रमाणात या चार दशकांच्या सांस्कृतिक उलथापालथीचा प्रभाव तर पडलेला असणारच. त्यातून ही भावना हिंदू माणसात खोल रुजू लागली आहे.

फोटो स्रोत, NurPhoto
याच चार दशकांमध्ये काँग्रेस पक्षाने त्याचा प्रतिवाद करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही आणि तो पक्षही स्वतः खंगत गेला. राज्यवार जे पक्ष उभे राहिले त्यांना या व्यापक मुद्द्यापेक्षा आपले प्रादेशिक अस्तित्व आणि त्यासाठीची प्रादेशिक अस्मिता जास्त महत्त्वाची वाटत राहिली, त्यामुळे काही प्रमाणात मुलायम आणि मोठ्या प्रमाणात लालू प्रसाद यांचा अपवाद सोडला तर बिगर-काँग्रेस नेत्यांना या सांस्कृतिक वादात फारसे स्वारस्य कधीच नव्हते.
परिणामी ऐंशीच्या दशकाच्या मध्यापासून हिंदुत्व आणि भारतीयत्व यांच्या समीकरणाला राजकीय प्रतिकार अजिबात झाला नाही.
हिंदू असणे हे भारतीय असण्यासाठी आवश्यक आहे या नव्याने पुढे आलेल्या निष्कर्षाच्या मागील गुंता या सगळ्या वैचारिक आणि राजकीय घडामोडींत अडकून पडलेला आहे.
सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी भारत नावाचं एक स्वप्न इथल्या समाजाला पडलं, पण सिनेमाचे रिमेक होतात तसा या स्वप्नाचा रिमेक गेल्या सुमारे अर्ध शतकात साकारत गेला. रिमेक आवडण्याच्या जमान्यात तो सध्या लोकप्रिय झाला आहे यात नवल ते काय?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता..)








