CBSE Board Exam: 10 वी, 12 वी'च्या परीक्षा 2 सत्रांत होणार, कसं असेल या परीक्षांचं स्वरूप?

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 दोन सत्रांत विभागले आहे.

आरोग्य संकटात ऐनवेळी बोर्डाची परीक्षा रद्द करावी लागत असल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोन परीक्षा होणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीच्या आजारामुळे बोर्डाच्या परीक्षांवर परिणाम होत आहे. यंदा तर सरसकट परीक्षा रद्द कराव्या लागल्या आणि म्हणूनच सीबीएसई बोर्डाने चालू वर्षाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सविस्तर नियोजन जाहीर केलं आहे.

सीबीएसई बोर्डाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. यात परीक्षा कशा होणार? प्रश्नपत्रिकेचे स्वरुप काय असेल? अभ्यासक्रमाची विभागणी कशी केली जाईल? गुणांचे गणित कसे जुळवणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये होणार आहे. पहिली परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार असून यासाठीचे प्रश्न 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत.

तर दुसऱ्या टर्मच्या परीक्षेत उर्वरित अभ्यासक्रमाचे प्रश्न विचारले जातील.

परीक्षेत काय विचारलं जाईल?

या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहे. या परीक्षा घरून द्यायच्या आहेत की परीक्षेसाठी शाळेत जावं लागणार आहे?

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

परीक्षेचे स्वरूप नेमके कसे आहे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा रद्द होऊ शकतात का? यासंदर्भात सीबीएसईने सांगितलं,

• शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी पहिल्या टर्मची बोर्डाची परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणार.

• ही परीक्षा 90 मिनिटांची असून परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी (OMR) असणार आहे.

• या परीक्षेत 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.

• सीबीएसई बोर्ड परीक्षा आणि मूल्यांकन पद्धतीची माहिती शाळांना पाठवणार आहे.

• या परीक्षेत मिळालेले गुण विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जाणार.

कोरोनामुळे या परीक्षा रद्द होऊ शकतात का?

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा होऊ शकल्या नाहीत तर सीबीएसई बोर्ड काय निर्णय घेणार?

याबाबत बोर्डाने सांगितलं की पहिल्या टर्मची परीक्षा म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात शाळा प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नाहीत तर ऑनलाईन माध्यमातून या परीक्षा घेतल्या जातील.

लहान मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

परंतु या परिस्थितीत या परीक्षेच्या गुणांचे महत्त्व कमी होईल आणि दुसऱ्या टर्मच्या परीक्षेचे महत्त्व वाढेल.

जर पहिल्या टर्मची परीक्षा शाळेत पार पडली आणि दुसऱ्या टर्मची परीक्षा होत असताना शाळा बंद कराव्या लागल्या तर अशा परिस्थितीत पहिल्या टर्मचे गुण आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बोर्डाचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

जर दोन्ही टर्मच्या परीक्षा शाळेत होऊ शकल्या नाहीत तर अंतिम निकालासाठी अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट वर्क, टर्म 1 आणि 2 परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातील.

शाळांना दहावी आणि बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे एक प्रोफाईल तयार करण्याती सूचना करण्यात आली आहे. ज्यात युनिट टेस्ट, प्रात्यक्षिक आणि प्रोजेक्टच्या आधारे गुण दिले जातील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)