You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद: 'कोव्हिडच्या नावाखाली ठाकरे सरकारकडून लोकशाहीला कुलूप लावण्याचं काम'
कोव्हिडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप लावण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
"कमीत कमी अधिवेशन घेण्याचा रेकॉर्ड हे सरकार करतंय. एकूण 7 अधिवेशनं पार पडली. त्याचा एकूण कालावधी 36 दिवस आहे. उद्याचं आठवं अधिवेशन आहे. त्याचा एकूण कालावधी 38 दिवस होती. कोव्हिड काळात या सरकारची 14 दिवस अधिवेशनं झाली. तर संसदेची 69 दिवस अधिवेशनं चालली. कोव्हिड देशातही आहे," असं फडणवीस म्हणाले.
"सदस्यांना कोणतंही आयुध वापरता येणार नाही अशी व्यवस्था या सरकारने केली आहे. 35 दिवस आधी टाकलेले प्रश्न घेणार नाही. हे लोकशाहीला कुलूप ठोकणारे काम आहे."
"उद्याचा दिवस सर्व प्रथा परंपरांना छेद देत, शोक प्रस्ताव मांडून उद्याचं बिलं मांडण्यात येतील. परवा पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. इतर कुठल्याच विषयावर बोलता येणार नाही," असं फडणवीस म्हणाले.
'अधिवेशनाचा कालावधी कमी केला'
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. कोव्हिडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम ठाकरे सरकार करत असून या सरकारच्या काळात पाच दिवसही अधिवेशन झालेलं नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, "जे साठ वर्षांत घडलं नाही ते आता घडत आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण याचे प्रश्न पुरवणी मागणीत नसेल तर ते मांडता येणार नाही, शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न, वारकऱ्यांचे प्रश्न गुंवणूक थांबली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचार सुरू आहे. यावर आम्ही बोलू नये अशी व्यवस्था सरकारने केली आहे."
सरकार जे विषय आम्हाला अधिवेशनात मांडू देणार नाही ते प्रश्न आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मांडू अशी भूमिका भाजपने मांडली आहे. राज्य सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे असाही आरोप फडणवीस यांनी केला.
'तिन्ही पक्षांत समन्वय नाही'
महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांत समन्वय नसल्याने अध्यक्षपदाची नियुक्ती रखडली अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते म्हणाले, "तीन पक्षात एकमत नाही. बहुमत असूनही अध्यक्षपदाची नेमणूक का होत नाही?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं'
शिवसेना आणि भाजप पुन्हा युती करणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढलो त्यांचा हात पकडून ते गेले. त्यामुळे आमच्यात वैचारिक मतभेद आहेत."
शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुमची मुलाखत घेणार होते त्याचे काय झाले? यावर उत्तर देताना ते हसत हसत म्हणाले, "आशिष शेलार आणि त्यांची भेट कदाचित यासाठीच झाली असावी."
'ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केवळ महाराष्ट्रातच कसा?'
देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसी आरक्षण सुरक्षित आहे. मग केवळ महाराष्ट्रातच प्रश्न का निर्माण झाला? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ते म्हणाले,"दोन दिवसापूर्वीपर्यंत केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी करत होते. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल चौकशी ही मागासवर्गीय आयोगाकडून करा असं म्हटलं आहे. ही कार्यवाही राज्याला करायची आहे. तरीही केंद्राने डेटा दिला याकडे राज्य सरकार बोट दाखवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागवलेला रिपोर्ट राज्य सरकारला द्यायचा आहे."
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याचंही म्हटलं आहे. "जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग मराठा समाजाला मागास ठरवत नाही तोपर्यंत आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्य सरकारने आजही असा रिपोर्ट तयार करण्यास सुरुवात केलेली नाही. केंद्र सरकारकड बोट दाखवत किती दिवस खोटं बोलणार?"