You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
SSC CET : अकरावी सीईटी परीक्षेत मराठी विषय वगळल्याने वाद का होतोय?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या चार विषयांची असणार आहे. यात मराठी विषय नसल्याने मराठी भाषेला का डावलण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. पण अकारावी प्रवेशासाठी मात्र सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य हवे असल्यास विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
सीईटी परीक्षेसाठी निवडलेल्या चार विषयांमध्ये मराठी विषयाचा समावेश करावा किंवा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता विविध संघटनांनी केली आहे.
तेव्हा राज्य सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध का होतोय? या परीक्षेत मराठी विषय नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते का? एसएससी बोर्डाने चार विषयांमध्ये मराठी भाषेचा समावेश का केला नाही? आणि याचा परिणाम सीईटी परीक्षेवर होऊ शकतो का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत.
'मराठीला दुय्यम स्थान दिलं जात आहे'
अकरावी सीईटीसाठी मराठी विषयाचा समावेश करावा या मागणीसाठी मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे.
संघटनेचे प्रमुख सुशील शेजुळे यांनी सांगितलं, "अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेत मराठी विषय नसल्याने राज्य सरकार लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे. राज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी दहावीसाठी प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडतात. अशा सर्व विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करत आहे."
ते पुढे सांगतात, "लाखो विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी असताना इतर चार विषय त्यांच्यावर लादले जात आहेत. शिवाय, मराठी विषयाचा समावेश न केल्याने हा निर्णय मराठीला दुय्यम स्थान देणारा आहे."
अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या चार विषयांची प्रत्येकी 25 गुणांची परीक्षा होणार आहे.
या चार विषयांची निवड विद्यार्थ्यांवर बंधनकारक का केली जात आहे? असाही प्रश्न मराठी शाळा संस्थाचालक संघाने विचारला आहे. विद्यार्थ्यांना मराठीसह कोणतेही चार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेकडूनेही सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असताना केवळ इंग्रजी विषयाची सक्ती का केली जात आहे? असा प्रश्न संघटनेकडून विचारण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
याविषयी बोलताना संघटनेचे प्रवक्ते संजय डावरे यांनी सांगितलं, "मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी विषयात अधिक गुण मिळवता येतात. इंग्रजी विषय मोठ्या संख्यने विद्यार्थ्यांना कठीण वाटतो. अकरावी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. त्यामुळे केवळ इंग्रजी विषयामुळे विद्यार्थ्यांच्या सीईटी निकालावर परिणाम होऊ शकतो. मराठी विषयाचा किमान पर्याय द्यायला हवा अशी आमची मागणी आहे."
'जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठीही मराठी विषयाचा आग्रह धरता का?'
या सर्व आक्षेपांसंदर्भात आम्ही एसएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांना संपर्क साधला.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सीईटी परीक्षेसाठी चार विषयांची निवड करत असताना आम्ही सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांचा विचार केला आहे. एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यासक्रम वेगळा असला तरी संकल्पना सारख्या आहेत. त्यामुळे हे विषय निवडले."
ते पुढे सांगतात, "इंग्रजी विषयाचंही तसंच आहे. राज्यात मराठी, गुजराती, उर्दू, मल्ल्याळम, हिंदी, तमिळ अशा अनेक माध्यमांच्या शाळा आहे. विविध बोर्डाच्या शाळा आहे. तेव्हा सर्वांसाठी इंग्रजी सामाई भाषा असून भाषेच्या व्याकरणावर आधारित परीक्षा असणार आहे."
"मराठीचा अभिमान आम्हालाही आहे. परंतु ही सीईटी परीक्षा आहे. जेईई, नीट या प्रवेश परीक्षा देताना तुम्ही मराठीचा आग्रह धरता का?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मराठी विषय सक्तीचा नव्हे तर पर्याय म्हणून द्यावा अशी मागणी आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, "मराठी भाषेचा पर्याय दिला म्हणजे इतर माध्यमांच्या शाळा सुद्धा मागणी करतील. तेव्हा प्रत्येक भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल."
सीईटीची ही परीक्षा जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. दहावीचा निकाल साधारण 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
एसएससी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या वादाचा परिणाम नियोजित सीईटी परीक्षेवर होणार नसून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांना काय वाटतं?
सीईटी परीक्षा पद्धती या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. म्हणजेच प्रश्न आणि त्याला उत्तर देण्यासाठी चार पर्याय दिलेले असतात. अशावेळेला विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहिण्याची संधी मिळत नाही. उत्तर देण्यासाठी पर्याय निवडायचा असतो.
"त्यामुळे कोणत्याही विषयाची निवड केली तरी प्रचलित पद्धतीप्रमाणे गुण मिळवता येणार नाहीत." असं मत दहावीचे शिक्षण विलास परब यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणतात, "परीक्षेसाठी विषय मराठी असो वा इंग्रजी प्रश्न व्याकरणावर आधारित असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. मराठी भाषेचा समावेश करून विद्यार्थ्यांना भरपूर लिहिता येईल आणि गुण मिळतील असा अनेकांचा गैरसमज झालेला दिसत आहे. तेव्हा या परीक्षेत अशी संधी मिळणार नाहीय."
यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सेमी इंग्रजीचा विद्यार्थी विनायक पोतदार सध्या अकरावी सीईटी परीक्षेचा अभ्यास करत आहे.
तो सांगतो, "माझी प्रथम भाषा मराठी विषय आहे. त्यामुळे सीईटीसाठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असता तर मला अधिक गुण मिळवण्याची संधी होती. सीईटीमुळे आम्ही मध्येच अडकलो आहोत असं वाटतं. ही परीक्षा दिली नाही तर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही आणि निकाल कमी लागला तर प्रवेशावर त्याचा परिणाम होणार आहे."
कशी असेल सीईटी परीक्षा?
अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा एसएससी बोर्ड, सीबीएसई, सीआयएससीई आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
सीईटी परीक्षा एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
परीक्षा 100 गुणांची असेल. बहुपर्यायी (OMR) पद्धतीने परीक्षा होणार असून दोन तासांची परीक्षा असेल.
इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील.
ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्रांची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना सीईटीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार नाही. एसएससी बोर्ड वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे.
ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही. परंतु अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.
जे विद्यार्थी अकरावी सीईटी परीक्षा देणार नाहीत त्यांचे प्रवेश सीईटी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात करण्यात येतील. दहावीच्या निकालाच्या आधारावर या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)