You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना शिक्षण : ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या एकटेपणात वाढ होत आहे का?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठी
''त्याचा फोन त्याला थोडा वेळ जरी नाही दिसला तरी त्याची आता चीडचीड होते. त्याचा फोनचा वापर खूप वाढलाय. त्याला उठता बसता आता फोन लागतो. त्यामुळे त्याचा आमच्याशी संवाद कमी झालाय.''
''मध्ये दोन तीन दिवस कोलेजला गेला तर तो खुश होता, पहिल्यांदा एकट्याने बसने प्रवास करून एवढ्या लांब गेला मित्र भेटतील याचा त्याला आनंद होता. पण आता परत कोरोनामुळे कॉलेज बंद झाल्याने त्याला घरात बसावं लागतंय,'' अकरावीत असलेल्या विघ्नेशची आई सांगत होती.
कोरोनाचा भारतात शिरकाव होऊन एक वर्ष झालं. या वर्षात जसं अनेकांनी 'वर्क फ्रॉम होम' केलं तसंच विद्यार्थ्यांनाही घरुनच अभ्यास करावा लागला.
मधल्या काळात काही दिवस शाळा आणि कॉलेजेस सुरु झाले, पण पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने त्यांना बंद करावं लागलं. परिणामी ऑनलाईन शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय उरला नाही.
ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण मिळणं शक्य झालं असलं तरी शाळेत असलेलं वातावरण आणि घरून शिक्षण घेणं यात फरक आहे. शाळा कॉलेजांमध्ये होणाऱ्या अॅक्टिव्हिटी, संभाषण, डिस्कशन ऑनलाईनमध्ये होत नाही. त्यातच ऑनलाईन वर्गामध्ये प्रत्येकाचं लक्ष शिकवण्याकडे असेलच हे सांगता येत नाही.
वर्षभर घरी राहून शिक्षण घेण्याने मुलांच्या सामाजिक जीवनावर याचा परिणाम होतोय. त्यातूनच या मुलांचा एकटेपणा आता वाढू लागला आहे.
एकलकोंडेपणा वाढला
एकटा विघ्नेश नाही तर त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची सारखीच परिस्थिती आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये जास्त लक्ष दिलं जात नाही. अभ्यास देखील फार सिरिअसली केला जात नाही. त्यातच कोरोनाच्या काळात बाहेर न पडता आल्याने मुलांचा त्यांच्या मित्रांशी संवाद कमी झाला आहे. त्यामुळे त्यांच्यात एकलकोंडेपणा अधिक वाढल्याचं, तसेच व्यवहारिक ज्ञान न मिळाल्याचं पालक सांगतात.
सहावीत शिकणाऱ्या निसर्गच्या आई वडीलांना त्याच्या शिक्षणाची आणि सर्वांगीण वाढीची चिंता सतावत आहे. शाळा नसल्यामुळे त्याचं रुटीन बिघडल्याचं आणि सातत्याने फोनच्या वापरामुळे शारिरीक मानसिक स्वास्थ बिघडल्याचं ते सांगतात.
निसर्गची आई म्हणते, ''शाळेत जात होता तेव्हा तो मस्तीखोर होता. आता बराच शांत झालाय. शाळेत वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी व्हायच्या तर तो खूष असायचा. त्याचं फुटबॉल टीममध्ये सिलेक्शन देखील झालं होतं. आता घरातच राहावं लागत असल्याने बसून बसून त्याचं वजन वाढायला सुरुवात झाली आहे. त्याला इतक्या लहान वयात मोबाईल द्यायची आमची इच्छा नव्हती. पण ऑनलाईन शिक्षणामुळे आम्हाला द्यावा लागला. मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय.''
एकटेपणाची घुसमट
सातवीत शिकणाऱ्या अथर्वची सुद्धा घरात घुसमट होत आहे. रोज ऑनलाईन क्लासेस त्याला नको वाटतात. शाळेत जाऊन मित्रांसोबत मजा करण्याची त्याची इच्छा आहे. दिवसभर घरी काय करायचं असा प्रश्न त्याला पडतो. याचा त्याच्या मनावर देखील परिणाम होतोय. त्याची घुसमट त्याला व्यक्तही करता येत नाहीये.
''ऑनलाईन क्लासमध्ये काही कळत नाही. काही अडलं तर विचारता येत नाही. शाळेचे मित्र ऑनलाईन क्लासमध्ये दिसतात पण त्यांच्याशी बोलता येत नाही. नुसतं बसून रहायला बोअर होतं,'' अथर्व सांगतो.
'मुलांशी संवाद हवा'
मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी मानसोपचार तज्ञ दीपा राक्षे म्हणतात ''कोरोनामुळे मुलांना शाळेत जाता येत नसल्याने ते चीडचीड करू शकतात. मुलं आळशी देखील होऊ शकतात. या काळात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. सारखं मोबाईलवर असल्याने त्यांच्या एकाग्रतेवर देखील परिणाम होतो. तसंच आरोग्याच्या समस्या देखील वाढतात.
''शाळेत मुलांची बौद्धिक, शारिरीक आणि भावनिक वाढ होत असते. ती आता तुलनेने कमी होतीये. मुलांचं शेअरिंग होत नाहीये. यातून मुलं एकलकोंडी होण्याची शक्यता आहे आणि हे आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवायला हवा. मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. त्यांची भावनिक गरज समजून त्यांचं ऐकून घेणं सध्या गरजेचं आहे.''
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)