You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र अनलॉक: 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यातील नवी नियमावली काय आहे?
राज्यातील शाळा-कॉलेज सुरू करण्यास टास्क फोर्सचाच विरोध आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (11 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहे. पण तरीही टास्क फोर्सने विरोध दर्शवला आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्वांना माहिती दिली.
लोकल ट्रेनबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात येईल.
त्यासाठी त्यांचं ओळखपत्र आणि दोन डोस झालेलं प्रमाणपत्र दाखवल्यास मासिक किंवा त्रैमासिक पास देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत.
या नियमाचं पालन न केल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंड तसंच साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
काय आहेत ब्रेक द चेनचे नवे नियम?
लोकल ट्रेन प्रवासास परवानगी
- आरोग्य सेवा देणारे अधिकारी / कर्मचारी / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा (डोस) घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे.
- रेल्वे तिकिट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. नियम मोडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार कारवाई, 500 रुपये दंड.
उपहारगृहे
खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे.
- उपहार गृहांना रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी.
- उपहारगृह बारमध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील.
- उपहारगृह बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. लशीचे दोन डोस घेतलेलेच कर्मचारी उपाहारगृहात काम करू शकतील. मास्कचा वापर बंधनकारक.
- वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील.
- प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील.
- उपहारगृह बारमध्ये विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.
दुकाने
- राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.
- दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक.
शॉपिंग मॉल्स
- राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.
- शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन डोस पूर्ण झालेले आवश्यक
- लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणं बंधनकारक आहे.
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा
- वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी.
- वातानुकूलित असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.
इनडोअर स्पोर्टस
- इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील.
- हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील.
- बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलल्खांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडूंसाठीचे खेळ सुरू करण्याची अट.
कार्यालय/औद्योगिक/सेवाविषयक आस्थापना
- सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे.
- ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
- सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक.
- कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.
- तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.
- राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाटया, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील.
विवाह सोहळे
- खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/ लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
- खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तींना परवानगी.
- बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्तींची मर्यादा.
- कोणत्याही परिस्थितीत कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी कार्यक्रमाचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक.
- नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/ कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल/मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- मंगल कार्यालय/हॉटेल/लॉन व्यवस्थापन/भोजन व्यवस्थापन /बँडपथक/भटजी/फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स
राज्यात सिनेमागृह/नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
धार्मिक स्थळे
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
आंतरराज्य प्रवास
ज्या नागरिकांचे कौविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल.
अन्य प्रवाशांसाठी 72 तासांपूर्वीची RTPCR चाचणी निगेटिव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.
सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम
- कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे.
रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा कडक लॉकडाऊन
मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता मर्यादित असल्याने, जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन 700 मेट्रिक टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तत्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील.
तिसऱ्या लाटेबद्दल केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं बोलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक संसर्ग असणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक घेतली.
त्यातही त्यांनी घाईघाईनं निर्बंध शिथिल करुन नका असं जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं. नव्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारनं अधिक निर्बंधांची तयारी सुरू केली आहे, असंही या सल्ल्याकडे पाहिलं जात आहे.
निर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी मात्र वाढली आहे - मुख्यमंत्री
कोव्हिड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे.
आपण निर्बंध शिथिल केले असेल आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे तर देशासमोर कसे आव्हान उभे ठाकले आहे ते अजून ताजे आहे. आणि म्हणूनच यावेळी आम्ही राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे.
यापुढे राज्यातील कोव्हिड रुग्णांसाठी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल. आपणास माहीत आहे की, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते.
दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची कोव्हिड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की ( सुमारे 30 हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
गेल्या पावणे दोन वर्षांत कोव्हिडने खूप काही शिकवले आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो आहोत, आणि मला खात्री आहे शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य कराल.
मी परत सांगतो, निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. कोव्हिडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटनमध्ये सुद्धा परत मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे.
अशा परिस्थितीत आपल्यालाही सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. परवा आपण मर्यादित प्रमाणात का होईना पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत.
इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)