Corona: महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ थांबली, 'कोव्हिड-मुक्ती' किती दूर?

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोव्हिड रुग्णांची संख्या शून्यावर आली म्हणजे जिल्हा कोव्हिडमुक्त झाला का?

महाराष्ट्रात एकीकडे कोव्हिड अनलॉकचे नियम शिथील करण्यावरून कुठे तक्रारी तर कुठे वाद होताना दिसतायत. महाराष्ट्राचा कोव्हिड रुग्णांचा आलेख एका पातळीवर स्थिरावलाय. पण असं असतानाही महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांनी नवीन रुग्णांचा आकडा शून्यावर आणण्यात यश मिळवलं आहे.

धुळे, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये जवळपास आठवडाभर नवीन रुग्णांचा आकडा शून्यावर आहे. या जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या कमी-अधिक आहे.

आठवड्याभराच्या यशावरून या जिल्ह्यांना कोव्हिड-मुक्त घोषित करणं अर्थातच घाईचं ठरेल, पण एकीकडे राज्यातल्या 11 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर राज्याच्या सरासरीच्या वरती असताना या जिल्ह्यांनी ही प्रगती कशी साधली हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

टेस्ट-ट्रेस-ट्रीट कोव्हिडवर मात करण्यासाठीचे तीन 'टी' कोणते आहेत?

  • टेस्टिंग- कोरोना चाचण्या
  • ट्रेसिंग- पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास काढणं
  • ट्रीटमेंट - लाक्षणिक किंवा अलाक्षणिक रुग्णांवर योग्य ते उपचार करणं

कोव्हिड संसर्गाला आळा घालण्यात या मूलभूत तत्त्वाचं काटेकोर पालन महत्त्वाचं ठरल्याचं विविध जिल्ह्याच्या यंत्रणांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

धुळे जिल्ह्याचे नोडल ऑफिसर डॉ. विशाल पाटील यांनी सांगितलं की रुग्णसंख्या कमी होत गेल्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातलं कोव्हिड टेस्टिंग कमी केलं नाही. "रुग्णसंख्या दोन आकडी असताना आम्ही दीड ते दोन हजार चाचण्या करत होतो, आज आम्ही 1000 ते 1200 च्या घरात चाचण्या करतोय.

यापैकी जवळपास 60 टक्के चाचण्या RTPCR आहेत. टेस्टिंग सेंटर्सची संख्या वाढवण्याबरोबरच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन मोबाईल टेस्टिंग पथकंही पाठवली गेली. गर्दीच्या ठिकाणहून सँपल कलेक्शनचं काम त्यांनी केलं."

विदर्भात भंडारा जिल्ह्यानेही कोरोना-मुक्तीच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याबद्दल बोलताना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितलं, "कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर सुरवातीला आम्ही लोकांचं टेस्टिंग करून त्यांच्या विलगीकरणावर भर दिला. आमचा प्रयत्न होता की प्रत्येक रुग्ण हा 'सूक्ष्म नियंत्रणाखाली' असावा. याचा आढावा दररोज घेतला जायचा."

सापडलेल्या रुग्णांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करणं, तसंच रँडम टेस्टिंग करण्याचा फायदा झाल्याचं या विविध जिल्ह्यांच्या कार्यपद्धतीतून समोर आलं आहे.

लसीकरणावर जोर

दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात लशींचा तुटवडा अनेक ठिकाणी भासला. पण पुरवठ्याची बाजू सुरळीत झाली तरी अनेक ठिकाणी लस घेण्याबाबतचं औदासिन्यही पाहायला मिळालं. यावर मात करून अधिकाधिक लोकांपर्यंत लस पोहोचवणं हे सुद्धा रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात कामी आल्याचं पाहायला मिळालं आहे.

वर्धा जिल्ह्याचे नोडल अधिकारी सुरेश बगळे यांनी बीबीसी मराठीला याबद्दल माहिती दिली, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर जास्त भर दिला. जिल्ह्यात जनजागृती आणि लस घेण्यासाठी फार विरोध झाला नाही. जवळपास 10 लाख लोकांचं लसीकरणाचं लक्ष्य होतं. त्यात 4.5 लाखापर्यंत पहिला डोस देण्यात आला. दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या दीड लाखाच्या जवळपास आहे."

0 रुग्ण म्हणजे कोव्हिड मुक्त?

वर्धा किंवा भंडारासारख्या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णांची संख्या सातत्याने शून्य येते आहे. राज्यातल्या इतर अनेक शहरांमध्ये किंवा उपनगरांमध्येही अनेकदा दैनंदिन रुग्णसंख्या 0 असते.

धुळे जिल्ह्यात 9 ऑगस्टला जसा एकही नवा रुग्ण नव्हता तसंच एकही सक्रीय रुग्णही नव्हता. पण म्हणून या जिल्ह्यांना किंवा शहरांना कोव्हिडमुक्त असं लेबल लावायचं का?

महाराष्ट्राचे राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "सक्रीय केसेस 0 झाल्या किंवा काही दिवस नवीन केसेस येणं थांबलं म्हणून 'कोव्हिड मुक्त' म्हणणं चुकीचं ठरेल.

दुसऱ्या लाटेत या ठिकाणांनी संसर्गाची न्यूनतम पातळी गाठलीय असं आपण म्हणू शकतो. तिसऱ्या लाटेची शक्यता कायम आहे त्यामुळे कोव्हिड मुक्त म्हणणं चुकीचं ठरेल.

सलग 28 दिवस जर या जिल्ह्यांनी टेस्टिंगचं प्रमाण न घटवता, सर्व्हेलन्समध्ये कुठलीही बेपर्वाई न होऊ देता असाच आलेख कायम राखला तर ते कोव्हिडमुक्तीच्या जवळ आहेत असं म्हणता येऊ शकेल."

काय सांगतो महाराष्ट्राचा आलेख?

राज्याच्या कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेतला तर आलेख सपाट झाला असल्याचं दिसतं.

दुसऱ्या लाटेत 24 तासांत एक लाखापेक्षाही जास्त रुग्णांचा 'पीक' पाहिल्यानंतर आता आकडे 7 ते 10 हजारांच्या घरात स्थिरावलेले दिसतात.

राज्यात रुग्णदुपटीचा काळ 718.8 दिवसांवर गेलाय. संपूर्ण देशाचा रुग्णदुपटीचा सरासरी काळ 563.7 दिवस इतका आहे.

महाराष्ट्राचा मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा वरती आहे. भारताचा कोव्हिड मृत्यूदर 1.34% असताना महाराष्ट्रात मात्र हा दर 2.11% आहे.

सध्या देशातल्या दररोज येणाऱ्या नवीन रुग्णांपैकी जवळपास निम्मी रुग्णसंख्या एकट्या केरळ राज्यातून येत आहे.

सक्रीय रुग्णांच्या बाबतीत केरळ पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु एकूण रुग्णसंख्येच्या रकान्यात महाराष्ट्र अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

(नितेश राऊत यांच्या इनपुट्ससह)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)