आषाढी वारी पंढरपूर : मानाच्या 10 पालख्या यंदाही बसने रवाना होणार

सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी मर्यादित स्वरुपात साजरी केली जाणार आहे. यंदाची आषाढी वारी एसटीनेच करण्याची परवानगी राज्य सरकानं दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पायी वारी होणार नाहीये.

आज पुण्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली.

यंदा सर्व मानाच्या 10 पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. पालखीच्या प्रस्ठानासाठी देहू आणि आळंदीमध्ये 100 जणांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उरलेल्या 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

प्रत्येकी 2 बसमधून यंदाही मनाच्या पालख्या रवाना होणार आहेत. मानाच्या पालख्यांना 'वाखरी'मध्ये पोहोचल्यावर दीड किलोमीटर प्रातिनिधीक पायी वारी करायला परवानगी देण्यात आली आहे.

तसंच शासकीय महापूजा गेल्या वर्षीप्रमाणे होणार आहे. सोबतच यंदा सर्व सहभागी वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

भाजप आध्यात्मिक आघाडीनं पायी वारीची मागणी केली होती.

याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, "ज्यांना पायी वारी हवी आहे त्यांना कोरोनाशी देणं घेणं नाही. कोरोनामुळे वारीवर हे निर्बंध घालावे लागत आहेत. इतके वर्षं आम्ही सत्तेत होतो, कधीच निर्बंध घातले नाही. उलट वारीत सोयी-सुविधआ उपलब्ध करून दिल्या. वारीची परंपरा टिकली पाहिजे, ती टिकवताना इतरांना कोरोनानं ग्रासलं नाही पाहिजे हा प्रयत्न सरकरानं केलेला आहे. "

भाविकांसाठी मंदिर बंद

यंदा वारीदरम्यान सर्वसामान्य भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार आहे. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील.

रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.

मानाच्या 10 पालख्या

  • संत एकनाथ महाराज ( पैठण, औरंगाबाद )
  • संत निवृत्ती महाराज ( त्र्यंबकेश्वर, नाशिक )
  • संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड, पुणे )
  • संत सोपानदेव महाराज ( सासवड, पुणे )
  • संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर, जळगाव )
  • रुक्मिणी माता ( कौडन्यपूर, अमरावती )
  • संत तुकाराम महाराज ( देहू, पुणे )
  • संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी, पुणे )
  • संत नामदेव महाराज ( पंढरपूर, सोलापूर )
  • संत निळोबाराय महाराज ( पिंपळनेर,अहमदनगर )

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)