You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आषाढी एकादशीः 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस', असं आपण का म्हणतो?
- Author, डॉ. सदानंद मोरे
- Role, संतसाहित्याचे अभ्यासक आणि लेखक
महाराष्ट्रात जोपर्यंत ज्ञानोबा - तुकारामाचा गजर सुरू आहे, तोपर्यंत इथे जातीपातीला थारा नाही, असं मला मनापासून वाटतं. आपण तुकारामांना ज्ञानेश्वरांपासून वेगळं करू शकत नाही आणि ज्ञानेश्वरांना तुकारामापासून वेगळं करू शकत नाही, हे महाराष्ट्राने लक्षात घ्यायला हवं. काही लोक त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी विनाकारण हे वाद निर्माण करत आहेत पण महाराष्ट्रातली भागवत धर्माची परंपरा त्याहूनही मोठी आहे.
ज्यांना जातीच्या आधारावर राजकारण आणि अर्थकारण करायचं आहे, ते भागवत धर्माची परंपरा दूर ठेवू पाहतात. सनातनी लोक ज्ञानेश्वरांना तुकोबांपासून विलग करू पाहत आहेत आणि पुरोगामी लोकांना तुकोबांना ज्ञानेश्वरांपासून वेगळं करायचं आहे. कारण ही एकत्रित परंपरा आपल्या हितसंबंधाना घातक आहे, असं त्यांना वाटतं.
मनू आणि संतांची तुलना चुकीची
मनू हा तुकोबा-ज्ञानोबांपेक्षा श्रेष्ठ, असं विधान श्रीशिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मनू हा राजऋषी होता आणि कर्मयोगाच्या परंपरेचा तो एक प्रवक्ता होता. पण काळाच्या ओघात कर्मयोगाचं तत्त्वज्ञान लुप्त झालं आणि कृष्णानं गीतेच्या रूपाने त्याचं पुनरुज्जीवन केलं.
संभाजी भिडेंना जो मनू अभिप्रेत आहे तो मनुस्मृती लिहिणारा मनू आहे. पण मनुस्मृती ही त्या कर्मयोगी मनूने सांगितलेली नाही. ती भार्गव वंशातल्या पुरोहितांनी तयार केली आहे, असा अनेक अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. वारकरी हे संतांना देवापेक्षाही श्रेष्ठ मानतात. त्यामुळे मनूची संतांशी तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.
आषाढी, कार्तिकी वारीच्या काळात खरंतर वारकरी संप्रदायातल्या संतांची शिकवण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच काळात वेगवेगळे वादविवाद वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आणले जातात आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या नावाखाली याला जातीपातीचा रंग येतो. यात संतांची शिकवण बाजूलाच राहते.
तुकोबांची खरी शिकवण कोणती?
महाराष्ट्रातल्या भागवत धर्माची शिकवण तुकोबांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. संत तुकाराम हे मोठे कवी असले तरी ते एक स्वतंत्र कवी नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्रातल्या भागवत परंपरेचं आणि वारकरी संप्रदायाचं सार आहेत.
'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस', असं आपण म्हणतो. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, कबीर या सगळ्या संतांची शिकवण तुकोबांनी आत्मसात केली होती. म्हणूनच आपण तुकोबांचा शब्द अंतिम मानतो.
धर्माचे पालन । करणे पाखंड खंडन ।।
हेचि आम्हां करणे काम । बीज वाढवावे नाम ।।
हा तुकोबांचा खरा धर्म होता आणि त्यांचा हा धर्म आजच्या काळातही पूर्णपणे लागू होतो.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ।।
भेदाभेद -भ्रम अमंगळ म्हणजेच भेदाभेद हा भ्रम आहे, तो अमंगल आहे, असा संदेश ते देतात.
माझ्या मते, तुकोबांची शिकवण ही समतेवर आणि मानवतेच्या प्रेमावर आधारित आहे.
'कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचे 'असं ते म्हणतात ते समतेसाठीच.
सकारात्मक विद्रोह
संत तुकारामांनी प्रस्थापित यंत्रणेला आव्हान दिलं म्हणून आपण त्यांना विद्रोही कवी म्हणतो, पण त्यांचा विद्रोह हा सकारात्मक आहे. कशाचा तरी नाश करणं हे त्यांचं उद्दिष्ट नाही.
येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं, 'आय हॅव कम टू फुलफिल अँड नॉट टू डिस्ट्रॉय.' हेच तत्त्व मला तुकोबांच्या बाबतीतही वाटतं.
मी परंपरा पूर्ण करण्यासाठी आलो आहे, मोडण्यासाठी नाही, असाच तुकोबांचा अविर्भाव होता. प्रस्थापित यंत्रणेमध्ये जे जे समतेच्या आणि प्रेमाच्या विरोधात असेल त्यावर ते थेट टीका करतात.
प्रस्थापित परंपरेमध्ये धर्म सांगण्याचा अधिकार हा उच्चवर्णीयांकडे होता. तुकोबांनी त्याला आव्हान दिलं आणि धर्म सांगण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला. ते म्हणतात,
वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।
जे ब्राह्मण अर्थ न समजता वेदांचा घोक करतात, त्यांना त्यांनी आव्हान दिलं आणि ब्राह्मण नसूनही आम्हाला वेदांचा अर्थ कळतो, असंही सांगितलं. या एका वाक्यातून त्यांनी जातीपातीला, भेदाभेदाला मिळणारं धर्माचं समर्थन काढून घेतलं.
जेव्हा एखादी गोष्ट अलंकारिक पद्धतीने सांगितली जाते, तेव्हा लोक जे सांगायचं आहे त्याकडे दुर्लक्ष करून त्यातल्या अलंकारिक पद्धतीवरच भर देतात. पण संत तुकारामांच्या अभंगात थेट विचार मांडलेला असतो. त्यामुळे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करताच येत नाही.
समता आणि मानवता
महाराष्ट्रात धर्माच्या, जातीच्या नावाने जो भ्रष्टाचार चालत होता, त्याला तुकोबांनी थेट विरोध केला होता. त्यांची हीच शिकवण 19 व्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या प्रबोधनाचा पाया ठरली.
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ।
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।
जो समानतेच्या, मानवतेच्या धर्माने पुढे जाईल त्याला देव मानावं, असं ते म्हणतात. म्हणूनच तुकोबा हे न्या. महादेव गोविंद रानडे यांचा प्रार्थना समाज किंवा महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज यांची प्रेरणा बनले.
धर्म हा माणूस आणि ईश्वर यांच्यातल्या संबंधांबद्दल आहे तसाच तो माणसांमाणसांतल्या संबंधांबद्दलही आहे यावर तुकोबांचा भर होता.
तुकोबांची ही 17 व्या शतकातली शिकवण समाजसुधारकांनी पुढे नेली आणि आजही आपल्याला ती अंगीकारावी वाटते, याचाच अर्थ तुकोबा त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते.
जागतिकीकरण आणि तुकोबा
तुकोबांच्या वाङ्मयात अध्यात्मासोबतच ऐहिक विचार आहे. स्वर्ग किंवा मोक्षाच्या मागे लागून इहलोकांतल्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करणं त्यांना मान्य नाही. व्यावहारिक जगामध्ये कसं जगावं याचं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या शैलीत अचूकपणे केलं आहे.
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी।।
नैतिक व्यवहारातून धन मिळवा आणि खर्च करताना विचार करा, याइतका व्यवहारी विचार आणखी कोणता असू शकतो?
किंवा
बळ बुद्धी वेचुनिया शक्ती । उदक चालवावे युक्ती ।।
पाण्याचा वापर युक्तीने करावा हा त्यांनी दिलेला मंत्र कोणत्याही काळात लागू पडेल, असाच आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे... हा त्यांचा संदेश तर वैश्विक पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरण चळवळीला पूरक आहे.
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात विविध सांस्कृतिक परंपरांचं सपाटीकरण होत चाललं आहे. आपल्या खऱ्या अस्तित्वाला त्यामुळे बाधा येत आहे. अशा वेळी आपली ओळख न पुसता जगासोबत कसं राहावं हे तुकोबा नेमकेपणाने सांगतात.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही ।मानियेले नाही बहुमता ।
सोशल मीडियाच्या या काळात वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्यापर्यंत अनेक मतप्रवाह पोहोचतात. त्यावेळी आपली भूमिका काय असावी याचा हा वस्तुपाठच आहे.
तुकाराम-ज्ञानेश्वर यांसारख्या वारकरी संप्रदायातल्या संतांची ही शिकवण आपल्याला आधी कीर्तनं, प्रवचन यातून मिळत होती. वारकरी संप्रदायाचे हे उपक्रम वर्षभर सुरू असतात. पण सामान्य माणसांमध्ये याबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
आपल्याकडे आषाढी, कार्तिकी वारीच्या काळात ज्ञानोबा-तुकारामाचा गजर सामान्य माणसांपर्यंत पोहोचतो, वारीच्या काळात संतांची शिकवण, वारकरी संप्रदायाची परंपरा याबद्दल आपण भरभरून बोलतो. पण याही व्यतिरिक्त आत्ताच्या लोकप्रिय माध्यमांतून ही संतांची शिकवण पुढे न्यायला हवी.
संतसाहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार, वारकरी संप्रदायातले कीर्तनकार यांची ही मुख्य जबाबदारी आहे, असं मला वाटतं. शालेय अभ्यासक्रमात आपण तुकारामाची वचनं गिरवलेली असतात पण नेहमीच्या व्यवहारात आपण तुकोबांची ही वचनं किती आठवतो आणि त्याचा खरा अर्थ समजून घेतो का, हा प्रश्न आहे.
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण।।
तैसे चित्त शुद्धी नाही । तेथे बोध करील काई।।
या तुकोबांच्याच वचनाचा दाखला द्यावा लागेल.
आमचे मित्र दिलीप चित्रे यांनी तुकारामांचे अभंग इंग्रजीत भाषांतरित केले आणि जागतिक पातळीवर पोहोचवले. तुकोबांचे अभंग सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनीच एक कल्पना मांडली होती.
पहिलीपासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वयोगटांना अनुसरून तुकोबांच्या अभंगांचं समीक्षण करावं, असं त्यांचं म्हणणं होतं. अभ्यासक्रमाला पूरक वाचन म्हणून तुकोबांचे अभंग असावेत, असं त्यांना वाटायचं. त्यांची ही कल्पना महाराष्ट्र सरकारने विचारात घ्यावी.
आपल्या प्रत्येकाच्या वाचनात आणि आचरणात तुकोबा पोहोचावेत हेच त्यामागचं उद्दिष्ट आहे.
(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. शब्दांकन : आरती कुलकर्णी)
हेही वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)