#5मोठ्याबातम्या : ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू एक पाऊल पुढे - संभाजी भिडे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पाहूया.

1. ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनु श्रेष्ठ - संभाजी भिडे

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनु एक पाऊल पुढे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.

शनिवारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी दुपारी धारकऱ्यांना (संभाजी भिडे यांचे पाठीराखे) जंगली महाराज मंदिरात संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून चांगलंच वादळ निर्माण झालंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. नागपुरात पोहोचताच भुजबळ म्हणाले, "सर्व संतांनी मानवतेत एकता आणली, कधीही भेद केला नाही. मात्र, मनुस्मृतीने काहींनाच श्रेष्ठ मानलं."

"मनुस्मृतीने 97 टक्के लोकांना क्षुद्र ठरविलं. त्यामुळेच महात्मा फुलेंनी मनुस्मृती जाळून टाका, असं आवाहन केलं होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळलीही," असंही भुजबळ यांनी सांगितलं.

2. धुळे हत्याकांडात आणखी एक आरोपी अटकेत

धुळ्यातील राईनपाडा गावात जमावाकडून झालेल्या पाच लोकांच्या हत्याप्रकरणात धुळे पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, दशरथ पिंपळसे याला रविवारी दुपारी अटक करण्यात आली. दशरथ या प्रकरणातील मुख्य आरोपी असण्याची शक्यता धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी वर्तवली आहे.

या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या आता 26 झाली आहे. पिंपळसेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सोमवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

3. घराणेशाही देशाचं भले करू शकत नाही - अमित शाह

घराणेशाही देशाचं भलं करू शकत नाही, अशी संकल्पना चाणक्यांनी 2,300 वर्षांपूर्वी मांडल्याचं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने 'आर्य चाणक्य - जीवन और कार्य : आज के संदर्भ में' या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं.

तेव्हा बोलताना शाह यांनी चाणक्य नीतीचा हवाला देत गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला. भाजपचा घराणेशाहीला विरोध असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्य चाणक्यांप्रमाणे काम करत आहेत. ते स्वत:ला पंतप्रधान न समजता प्रधानसेवक मानतात, असंही ते म्हणाले.

"राजाचा एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना 2,300 वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती," असा दाखला देत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

4. आगामी निवडणुकांत विकलांगांसाठी विशेष सुविधा

आगामी निवडणुकांमध्ये विकलांगांसाठी काही विशेष सोयींचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने ठेवल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मागच्या आठवड्यात National Consultation on Accessible Elections या परिषदेत विकलांग व्यक्तींना वेळेआधी किंवा लवकर मतदान करणं, पोस्टल बॅलेट, घरून मतदान, मोबाईल पोलिंग स्टेशन, असे पर्याय पुरवण्यात येणार आहे. असं करताना त्यांची मतं गुप्त राहतील, याची पूर्ण दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

मतदान प्रक्रियेत विकलांगांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

5. 122 पैकी 119 IPS अधिकारी नापास

हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पोलीस अकादमीत भावी अधिकाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षेत 122 पैकी 119 अधिकारी नापास झाल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

नापास झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या असून त्यांना वेगवेगवेगळ्या कॅडरमध्ये सेवेत रुजू करून घेण्यात आलं आहे.

ही परीक्षा पास होण्यासाठी आता त्यांना आणखी तीन वेळा संधी देण्यात येणार आहेत. तीन प्रयत्नांनंतरही परीक्षा पास न झाल्यास त्यांना सेवेतून बरखास्त केलं जाईल, असं या बातमीत म्हटलं आहे.

हे पाहिलंत का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)