You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुकाराम महाराज आणि बाबा अनगडशाह यांच्या मैत्रीची गोष्ट
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी देहूहून
अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे।।
अल्ला बिगर नहीं कोय । अल्ला करे सोहि होय ।।
हे शब्द आहेत जगद्गुरू तुकोबारायांचे. विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली आहे.
जगतगुरू तुकारामांच्या 333व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाप्रसंगी देहू नगरीत भक्तांचा जनसागर लोटलाय. पहिल्या दिवशी तुकोबारायांची पालखी देहूमध्येच इनामदारवाड्यात मुक्कामास थांबते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पालखी आकुर्डी गावाकडे प्रस्थान करते.
विशेष म्हणजे हे प्रस्थान करत असताना देहू गावाबाहेर असलेल्या हजरत सैययद अनगडशाह बाबा यांच्या स्मृतिस्थळी एक थांबा ठरलेला असतो.
बाबा अनगडशाह आणि तुकोबा यांची जिथे भेट व्हायची, त्या ठिकाणी त्यांचे अभंग गायले जातात आणि त्यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. हा प्रसंग हिंदू-मुस्लीम सलोख्याचं महत्त्वाचं प्रतीक मानला जातो.
या संपूर्ण सोहळ्याबद्दल अधिक माहिती संत तुकारामांचे नववे वंशज प्रकाश मोरे देतात. प्रकाश मोरे गेल्या चौदा वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. "तुकाराम महाराजांचे नाव लौकीक ऐकून अनगडशाह देहू या गावी आले होते... तेव्हा त्यांना तुकोबांची प्रचिती आली."
पुढे अनगडशाह बाबा आणि तुकाराम यांच्यात मैत्रीचं नातं प्रस्थापित झालं. देहूतील अंधेरीबाग या ठिकाणी अनगडशाह राहत असत, असं मोरे सांगतात.
याच ठिकाणी मागील 300 पेक्षा जास्त वर्षांपासून तुकोबारायांची पालखी थांबते आणि तिथेच त्यांची पहिली आरती होते. तसंच लाखोंच्या संख्येने हिंदू भाविक अनगडशाह यांचंही दर्शन घेतात. "या हिंदू-मुस्लीम ऐक्याचं असं प्रतीक या देहू गावातच पाहायला मिळतं," मोरे सांगतात.
देहू गावातून बाहेर पडतानाच डाव्या बाजूला हे ठिकाण आहे. पालखीच्या विसाव्यासाठी एक छोटंसं मंडप बांधला आहे. या भेटीच्या ठिकाणाची देखभाल (ज्याला चिला असं म्हणतात) गेल्या आठ वर्षांपासून गोविंद मुसुडगे करतात.
तुकाराम-अनगडशाह यांच्या या भेटीबद्दल आम्ही गोविंद यांना बोलतं केलं. ते म्हणाले "इनामदारवाड्यात पहिल्या दिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता तुकोबारायांची पालखी निघते. ही पालखी खांद्यावर आणली जाते. पालखी इथपर्यंत पोहोचायला साधारणतः एक दीड तास लागतो. बारा-साडेबारापर्यंत पालखी इथे पोहोचल्यानंतर तुकोबांची आरती होते, अभंग म्हटले जातात. त्यानंतर पालखी पुढे जाते."
या धार्मिक सलोख्याच्या प्रसंगाबद्दल मुसुडगे सांगतात, "मे महिन्यात अनगडबाबांचा उरूस भरतो. त्यावेळी सर्व जातीधर्मांचे लोक इथे येतात. या सर्व धर्मीयांच्या पुढाकारातून हा उरूस भरवला जातो. तसेच अन्नदानाचा कार्यक्रमही असतो."
पुण्यात समाधी
हजरत अनगडशाह बाबा यांची समाधी पुण्यात भवानी पेठ इथे आहे. शरीफुद्दीन उर्फ रोशन दिलशाह हे बाबांचे वंशज इथल्या ट्रस्टचे प्रमुख आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले, "ईश्वर एक आहे आणि वैश्विक बंधुभाव महत्त्वाचा आहे, हे लोकांना समजायला हवं. मी तुकारामांचे अभंग वाचतो आणि त्यामुळे मला मनःशांती मिळते."
तुकारामांच्या पालखीतले वारकरी पुण्यात भवानी पेठेत येऊन अनगडशाह बाबांच्या समाधीचं दर्शन घेतात, असंही शरीफुद्दीन सांगतात.
(या बातमीमध्ये आधी उल्लेख करण्यात आला होता की अनगडशाह बाबा हे तुकारामांचे शिष्य होते. वास्तवात दोघांमध्ये मैत्रीचे नाते होते. तसंच देहूजवळ बाबांची समाधी आहे, असंही लिहिण्यात आलं होतं. वास्तवात समाधी पुण्यात भवानी पेठेत आहे.)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)