चौफुल्यावर जेव्हा लावणी आणि अभंगाचा संगम होतो..

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

"भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मला बी दाखवा ना, विठुरायाची पंढरी."

अगदी भक्तिभावानं उषा केसकर विठ्ठलाचं कौतुक सांगणारं गाणं गातात. त्या लावणी कलाकार आहेत आणि गेली वीस वर्षं या व्यवसायात आहेत. दरवर्षी आषाढ सुरू झाला, की त्यांनाही वारीचे वेध लागतात.

"आपण जाऊ शकत नाही ना तिथे पंढरपूरला, तर ते आपल्यापाशी येतात. असं वाटतं की विठोबा आपल्याजवळ आला आहे."

उषा केसकर आणि त्यांच्यासारखेच जवळपास दोनशे कलाकार चौफुल्यातल्या न्यू अंबिका कला केंद्रात राहतात. संगीतबारीचं हे असं विश्व जिथला रोजचा दिवस ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर सजतो.

शीतल नागपूरकर आपल्या रोजच्या दिनक्रमाविषयी सांगते, "सकाळी उठणे, आवरणे. संध्याकाळी स्टेज प्रोग्रॅम करणे. रोज नऊवारी नेसून आमचा कार्यक्रम असतो स्टेजला. हे सगळं रोज होतं."

चौफुल्यातली रोजची संध्याकाळ लावणीच्या संगीताच्या साथीनं मावळते. पण आषाढात हे चित्र थोडं बदलतं. देहूवरून पंढरपूरकडे जाणारी तुकाराम महाराजांची पालखी इथून जाते आणि वारकरी आणि कलावंतांचा मार्ग एकत्र येतो. लावणी कलावंत स्वतःच्या हातानं वारकऱ्यांना जेवू घालतात, त्यांच्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रमही करतात.

टाळ आणि चाळांचा संगम

टाळ आणि चाळ ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची दोन वेगवेगळी प्रतीकं आहेत. दोन्हीचा साज आणि बाज अगदी वेगळा आहे. पण वारीच्या निमित्तानं दरवर्षी चौफुल्यात दोन्हीचा संगम पाहायला मिळतो.

पालखी येण्याच्या आदल्या दिवशी आम्ही कलावंतांना भेटलो, तेव्हा सर्वजण दुसऱ्या दिवशीच्या तयारीत गुंतले होते. न्यू अंबिका कलाकेंद्राचे संचालक अशोक जाधव आम्हाला या उपक्रमाविषयी सांगत होते.

"गेल्या जवळपास तीस वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत. आमच्या कलाकारांकडून भरपूर पैसे जमा होतात. त्याच्यातनं आठ-दहा हजार लोकांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो."

अशोक यांच्या पत्नी जयश्रीही कलाकेंद्राची जबाबदारी सांभाळतात. वारकरी येत असल्याचा आनंद आहेच, पण सकाळीच आलेल्या पावसानं दुष्काळाचं सावट दूर होईल अशी आशा त्यांना वाटते. "समाधानच आहे आम्हाला, वर्षभर या दिवसाची वाट पाहतो आम्ही. आता पाऊसही आला आहे."

लावणी आणि अभंगाची जुगलबंदी

पालखी येण्याच्या दिवशी सकाळीच सगळेजण पहाटेच उठतात. लावणी कलाकार नऊवारी साडी, केसांचा अंबाडा आणि पायात घुंगरू बांधून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयार होतात. तोवर बाहेर न्याहरीची तयारी होते.

पहाटे यवतवरून निघालेले वारकरी सकाळी सकाळी इथं पोहोचतात, तेव्हा त्यांचं प्रेमानं स्वागत होतं आणि त्यांना जेवण वाढलं जातं.

शीतल नागपूरकर "वारकरी येतात, तेव्हा खूप बरं वाटतं. आम्हाला दसरा दिवाळीसारखा, खूप आनंद होतो. आम्ही स्वतः हातानी त्यांना वाढतो, तर इथेच पांडुरंग भेटल्यासारखं वाटतं आम्हाला."

जेवणं झाली, की नऊ-साडेनऊ वाजता कलाकार स्टेजवर दाखल होतात. पण नेहमीसारखी लावणी नाही तर अभंग, पोवाडे अशी अशी जुगलबंदी सादर केली जाते. दोन्हीमध्ये काय फरक असतो? असं विचारलं असता लावणी कलाकार प्रिया नगरकर सांगतात, "लावणी आणि अभंग ही मराठी संस्कृती आहे. त्यात असं वेगळं काही नाहीये. अभंगाचा ठेका थोडासा स्लो असतो, लावणीचा थोडा फास्ट असतो. तरीपण तयारी केल्यामुळं काहीच अडचण येत नाही."

भक्तीरसातली लावणी

एरवी लावणी शृंगाररसानं नटलेली. पण इथे ती भक्तीरसात न्हाऊ लागते, आणि वारकरीही तिला दाद देतात.

खेडच्या टाकळकर वाडीतून आलेले अर्जुन टाकळकर सांगतात, "भक्त सगळे एकच सतात. एरवी त्या लावणी करतात, पण आज त्यांनी माऊलींच्याच गाण्यांवर कार्यक्रम केला. लोक त्यांच्याकडे कोणत्याही नजरेनं पाहू दे पण देवानं त्यांना कला दिली आहे, त्यांचा आदर आहे."

त्यांच्यासोबतच दिंडीतून चालणाऱ्या भीमाबाई पवार आम्हाला एक कहाणी सांगतात. "श्रीकृष्णाची मुरली रुक्मिणीनं चिडून खाली फेकली. ती जेजुरीत जाऊन पडली, तिचीच झाली मुरळी. त्या मुरळीच्या पायातही चाळ होते. ही कला आहे ना चाळ बांधून, देवाचीच आहे. ह्यो टाळ इठ्ठलाचा, चाळ भगवान श्रीकृष्णाचाय."

अशा कथा कहाण्यांमधून आणि परंपरांमधून वारीचं वेगळेपण दिसून येतं. वारी अशी अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून जाते आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहांना एकत्र आणते.

भक्ती आणि शृंगाररसाचं अद्वैत

लेखिका आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर म्हणतात, "आपल्याकडे एक कल्पना अशी आहे की देवाची सेवा करण्यापेक्षा देवाच्या भक्तांची सेवा ही जास्त परिणामकारक असते, देवाला ती जास्त आवडते."

पण व्यवसायानुसार व्यक्तीची प्रतिष्ठा ठरवणाऱ्या समाजात लावणी नर्तिकांना गौण, दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं, याकडे त्या लक्ष वेधतात आणि त्यासाठी संत कान्होपात्रा, महानंदा अशा स्त्रियांचं उदाहरण देतात.

"पांडुरंगाच्या एका भूपाळीत म्हटलं आहे, 'कान्होपात्रा कळवातीण नेली पायाशी.' कान्होपात्रा हा कलावंतीण असून सुद्धा पांडुरंगा तू तिला आपल्या पायाशी जागा दिलीस. कान्होपात्रा ही पांडुरंगाची भक्त होती आणि तिलाही उद्धरलं देवानं. त्यामुळं त्या कान्होपात्रेकडे पाहण्याचा भक्ती परंपरेचा दृष्टीकोनही एकप्रकारे गौणत्वाचाच होता आणि ती पांडुरंगाकडे गेली म्हणून तिला प्रतिष्ठा मिळाली."

"दुसरी आपल्या भक्ती परंपरेमध्ये एक कलावंतीण आहे महानंदा. तिला तर वेश्याच म्हटलं आहे. शिवलीलामृतामध्ये तिचं वर्णन करताना म्हटलं आहे 'वेश्या असूनही पतिव्रता, नेमेला जो पुरुष तत्वत:, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे.' पतिव्रता का, तर ती एखाद्या पुरुषाला शब्द दिला असला की आजचा दिवस मी तुझ्यासाठी तर त्या काळात ती इंद्रालाही वश होत नसे.

"म्हणजे तिची निष्ठा पुरुषाच्या ठायी असणं हे आपल्याकडे महत्त्वाचं मानलं आहे. गृहिणीच्या बाबतीत तर हे फार मोठ्या प्रमाणात आहे. ही पुरुषप्रधान संस्कृतीची दुहेरी नीती आहे"

व्यवहारापलीकडे, साहित्यात डोकावलं, तर शृंगार आणि भक्ती हातात हात घालून नांदत आलेली दिसते. संतसाहित्याविषयी बोलताना तारा भवाळकर सांगतात, "मीराबाई शृंगारयुक्त भक्ती करते आहे. आपण तिला मधुराभक्ती म्हणतो. पुरुष संत ज्यावेळेला अत्यंत उत्कटतेने परमेश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते स्वतःकडे समर्पित अशा स्त्रीची भूमिका घेतात आणि आपली रचना करताना दिसतात."

पुढे भवाळकर सांगतात, "ज्यांना आपण बालब्रह्मचारी म्हणतो ते संत ज्ञानेश्वर जेव्हा विराणी म्हणजे विरहिणी रचना करतात, तेव्हा ती संपूर्ण शृंगाररचना असते. एखादी विरहिणी जशी आपल्या प्रियकरापासून दूर गेल्यावर व्याकूळ होते, कासावीस होते, तसा मी कासावीस झालो आहे."

भक्तीमय रचनांमध्ये शृंगाररस डोकावतो, तसाच शृंगारिक लावण्यांतही भक्तीरस दिसून येतो.

"या सगळ्या या लावण्यांची रचना ही द्वयर्थी आहे. एक पातळी दर्शनी शृंगाराची आहे आणि त्याचा अंतस्तर हा भक्तीचा आहे. 'दे रे कान्हा चोळी अन लुगडी' या गीताचा शेवट कसा केला आहे? हाक मारिता बंधन तुटले, 'आता जीवाला मीपण कुठले. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी.' अशा प्रकारे भक्तीच्या एका उच्च पातळीवर ती लावणी आपल्याला घेऊन जाते," भवाळकर सांगतात.

भक्ती आणि शृंगार यांच्यामध्ये आपण कुठे द्वैत मानायचं कारण नाहीये कारण परंपरेनं ते कुठे द्वैत मानलेलं नाहीये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)