जेरुसलेम: 700 वर्षं जुना 'स्पा' पुन्हा सुरू

    • Author, सारा स्टोथ टब
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

अल-एन हमाम... साध्या भाषेत सांगायचं तर स्नानगृह. मात्र, हे साधं-सुधं स्नानगृह नाही. तर इ. स. 1336 साली हे बांधण्यात आलं होतं. म्हणजे हा हमाम तब्बल 700 वर्षं जुना आहे.

विसाव्या शतकात त्याची मोड-तोड झाली होती. आता अनेक वर्षांच्या दुरुस्तीनंतर हा हमाम नव्याने उभारण्यात आला आहे.

जेरुसलेमच्या गल्ल्यांच्या मागे लपलेला हा हमामचा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

हे सार्वजनिक स्नानगृह 1970च्या दशकापासूनच बंद पडलं आणि अगदी मोडकळीला आलं होतं.

14व्या शतकात बांधलेला अल-एन हमाम, त्याच्या वर बांधलेला खान टंकीज प्लाझा आणि जवळचाच अल-शिफा हमाम या सर्वांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली आहे.

अल-एन हमामला याचवर्षी पूर्णपणे सुरू करण्यात आलं आहे. इथे येणारे पाहुणे इथे स्टीम बाथ घेऊ शकतात. शिवाय स्पाच्या इतर सुविधांचाही आनंद लुटता येतो.

या सम हा

इ. स. 1336च्या आसपास हा हमाम बांधण्यात आला. आजूबाजूच्या अल-अक्सा मशीद आणि कुबत्तुल सखरह (डोम ऑफ द रॉक) या ठिकाणी प्रार्थनेच्या आधी ज्यांना वजू (नमाज पठणाआधी हात-पाय धुणे) करायचा असायचा, त्या मुस्लीम बांधवांसाठी हा हमाम बांधण्यात आला होता.

व्यापारी आणि स्थानिक रहिवाशीदेखील इथे स्नान करायचे. जवळपास एका शतकापूर्वी इथल्या घरांमध्ये पाईपद्वारे पाणी पोहोचवण्याची सोय आली. त्यानंतर या हमाममध्ये स्नान करायला येणाऱ्यांची संख्या घटू लागली.

विसाव्या शतकाच्या मध्यात असे स्नानगृह हद्दपार झाले.

जेरुसलेममधल्या काही हॉटेल्सनी त्यांच्या स्पा कॉम्प्लेक्समध्ये आधुनिक स्नानगृह उभारली आहेत. त्याव्यतिरिक्त पुन्हा सुरू करण्यात आलेला अल-एन हमाम हा एकमेव हम्माम सध्या अस्तित्वात आहे.

जवळचा अल-शिफा हमाम आता आर्ट गॅलरी आणि इव्हेंट स्पेस म्हणून वापरला जातो.

अल-कुद्स विद्यापीठातल्या सेंटर फॉर येरुशलेम स्टडीजचे डायरेक्टर अमन बशीर म्हणतात, "हा हमाम म्हणूनच पुन्हा नव्याने सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सांस्कृतिक वारशांचं जतन करण्याची हीच योग्य पद्धत आहे."

इथली डागडुजी करणं आणि ते पुन्हा वापरात येण्यायोग्य बनवण्यामध्ये या सेंटरचा वाटा महत्त्वाचा आहे.

भेटीगाठीचं ठिकाण

रिसेप्शन रुममध्ये लाकडाच्या जाळ्या आणि लाल, पांढऱ्या आणि काळ्या रंगाची बनावट हम्मामच्या मूळ शैलीची आठवण करून देतात.

डागडुजी करताना या वास्तूचं डिझाईन बदलण्यात आलं नाही. मात्र, उजेडासाठी नव्याने लाइटिंग करण्यात आलं आणि शॉवरही नवे बसवण्यात आले आहेत.

हा हमाम पहिला पाऊस आणि डोंगरांमधल्या झऱ्यांच्या पाण्यावर चालायचा. पावसाचं पाणी गोळा करण्यासाठी मोठे हौद बनवण्यात आले होते.

डोंगऱ्यातल्या झऱ्यांचं पाणी या हमाममध्ये आणण्यासाठी शहराच्या बाहेरून इथपर्यंत चर खणण्यात आले होते. मात्र, आता इथल्या शॉवर आणि कारंज्यांमध्ये पाईपद्वारे पाणी पुरवलं जातं.

पाहुणे इथे विश्रांती करू शकतात आणि स्पा करण्याआधी लोकांच्या भेटीगाठी घेऊ शकतात. इथे खास कार्यक्रमही करता येतात.

बशीर सांगतात, "भूतकाळात या हम्मामने महत्त्वाची सामाजिक भूमिका बजावली होती. तीच भूमिका पुन्हा जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुन्या शहरात यासाठी जागा नाही."

ओळखीची वास्तूरचना

अल-एन हमाममध्ये वेगवेगळ्या आकाराचे घुमट आहेत. त्यांना छिद्रं आहेत. या छिद्रांच्या निळ्या आणि पिवळ्या काचांमधून उजेड आत येतो.

दमास्कस शहरातल्या (सीरियाची राजधानी) स्नानगृहात होते, अगदी तसेच हे घुमट आहेत. सीरियाच्याच राजदरबारातले मिस्त्री आणि कलाकार यांनी जेरुसलेममध्ये येऊन हे घुमट बांधले असावे, असं जेरुसलेममधल्या हिब्रू विद्यापीठातले पुरातत्व शास्त्रज्ञ तौफिक डाडली यांना वाटतं.

दुरुस्ती करताना खोदकामादरम्यान एका तिसऱ्या स्नानगृहाचाही शोध लागला. हा तिसरा हमाम ज्यू धर्मियांच्या ओहेल यित्जाक या प्रार्थनास्थळाखाली आहे.

हा तिसरा हमाम सध्या सामान्य जनतेसाठी उघडण्यात आलेला नाही. मात्र, या हमाममुळे मूळ वास्तूचा विस्तार आणि त्याची भव्यता लक्षात येते, असं पुरातत्व शास्त्रज्ञांना वाटतं.

प्राचीन वास्तुकला

दगड आणि संगमरवराने बनलेली हम्मामची मूळ बनावट कायम आहे.

स्नान करण्यासाठी आलेले पाहुणे इथे प्राचीन दगडाच्या बेंचवर बसून वाफ घेऊ शकतात आणि विशाल मेहराब (कमान असलेले दरवाजे) आणि संगमरवराने सजवलेल्या टाईल्स बघू शकतात.

जेरुसलेममधल्या अल-कुद्स विद्यापीठातले प्राध्यापक आणि जेरुसलेम इस्लामिक वक्फमध्ये पुरातत्व विभागाचे संचालक युसूफ नात्शेह सांगतात, "या स्नानगृहाचे मालक अनेकदा बदलले. मात्र, हमामची मूळ रचना कायम आहे."

खान टंकीज साईट आणि जेरुसलेमची भिंत असलेल्या जुन्या शहरातल्या इतर मुख्य मुस्लीम ठिकाणांची देखरेख इस्लामिक वक्फकडून केली जाते.

दीर्घ आणि आव्हानात्मक प्रक्रिया

स्नानगृहाची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करणं, सोपं नव्हतं. वक्फने 1980च्या दशकातच योजना आखली होती. मात्र, त्यासाठी निधी जमवता येत नव्हता.

नात्शेह सांगतात युरोपीय संघाने जेरुसलेमचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या मोठ्या उपक्रमांतर्गत निधी दिला आणि तेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

हा हमाम मूळ रूपात पुन्हा सुरू करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. इस्राइल अँटिक्विटीज अथॉरिटीने या कामावर देखरेख ठेवली.

विश्रांतीगृह

अल-एन हमामच्या शेजारचा परिसर जेरुसलेमच्या कॉटन मर्चेंट्स मार्केटच्या अगदी समोर आहे.

हा बाजार एकेकाळी कापूस व्यापाऱ्यांचं आर्थिक केंद्र होतं.

प्रवासी आणि जायरीन (हज करणारे) शहरात आल्यावर पाणी आणि आपल्या उंटांना चारा देण्यासाठी इथे थांबायचे. आजही इथे प्रवासी विश्रांती घेऊ शकतात.

इथल्या खोल्या अल-कुद्स विद्यापीठाचे अकॅडमिक प्रोग्राम आणि अरबी भाषेच्या अभ्यासासाठी वापरल्या जातात.

छप्परवाल्या गल्लीतला बाजार

जवळच्या कॉटन मर्चेंट्स मार्केटला मोठं करणं आणि अल-अक्सा मशीद कॉम्प्लेक्सपासून बाजाराचा भाग वेगळा करणारा मोठा दरवाजा उभारणं, हा देखील या हमाम दुरुस्ती योजनेचा भाग होता.

छप्परवाल्या या गल्लीत आजही बाजार भरतो. ज्यात कब्बतुल सखरह (डोम ऑफ द रॉक) आणि अल-अक्सा मशिदीत जाणाऱ्या हज यात्रींसाठी मिठाई, स्मृतीचिन्हं, प्रार्थना करण्यासाठीची चटई आणि स्कार्फसारख्या वस्तू मिळतात.

हमाम परिसर चालवणाऱ्या अल-कुद्स विद्यापीठाला बाजारातले व्यापारी लवकरच टॉवेल, स्पंज, साबण आणि स्पाशी संबंधित वस्तूही विक्रीला ठेवतील, अशी आशा आहे. त्यामुळेच विद्यापीठ स्वतः या सगळ्या वस्तूंची विक्री करणार नाही.

बशीर म्हणतात, "हमाम पुन्हा सुरू करण्याचा अर्थ बाजाराची व्याप्ती वाढवणं, हा देखील आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)