मराठा आरक्षण : मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत - संभाजीराजे, #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत' - संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल.

या आंदोलनाची टॅगलाईन 'आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय' अशी असेल.

त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले.

कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

याशिवाय मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली.

"36 जिल्ह्यात आंदोलनं करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका," असंही ते म्हणाले.

2. दि. बा. पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल - एकनाथ शिंदे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होत आहे. या मागणीवरून सध्या वाद होत आहे.

त्यावर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला यापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले होते, त्यात वाद नको, असं म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"नवी मुंबईतील विमानतळाला यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचं ठरलं होतं. त्यामध्ये आता वाद नको आहे. दि. बा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे हे महान नेते आहेत. त्यावरून वाद न होता आता विमानतळाला नाव देण्याचे ठरलं आहे. दि. बा. पाटील यांचं नाव इतर ठिकाणी देता येईल," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

3. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

राज्यातील शेतकऱ्यांना आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती.

त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

यामुळे आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदरानं मिळू शकणार आहे.

याआधी शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतच बिनव्याजी कर्ज मिळत होतं.

4. उच्च शिक्षणाच्या प्रवाहात मुली मागेच

उच्च शिक्षणाच्या प्रवाहात राज्यातील मुला-मुलींचं प्रमाण अद्यापही समतोल झालं नसल्याचे दिसत असून अद्याप मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी आहे. राष्ट्रीय उच्चशिक्षण सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राष्ट्रीय उच्चशिक्षण सर्वेक्षणाचा गेल्यावर्षीचा (2019-20) अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार 18 ते 23 वयोगटातील म्हणजेच उच्चशिक्षण घेण्याच्या वयातील विद्यार्थ्यांचं राज्यातील प्रमाण फारसं वाढल्याचं दिसत नाही.

2019-20 मध्ये ते 32.3 टक्के नोंदवले गेलं. त्यापूर्वी म्हणजेच 2018-19 मध्ये हे प्रमाण 32 टक्के होतं. देशपातळीवर उच्चशिक्षणात लैंगिक समतोल साधला जात असल्याचे दिसत असलं तरी राज्यात मात्र उच्चशिक्षणाच्या प्रवाहात मुलांचंच प्रमाण अधिक आहे.

या सर्वेक्षणानुसार उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण हे 45.8 टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण 54.2 टक्के असल्याचं दिसत आहे.

5. मुंबईत सगळं ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठं काय केलं? - चंद्रकांत पाटील

मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर भाजपनं टीका केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेतील कारभारावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबईत सगळं ब्रिटिशांनी केलं, शिवसेनेनं मुंबईत काय केलं? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. ब्रिटिशांनीच सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं? याआधी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनीही काही केलं नाही. मुंबईकर जनता यावेळी शिवसेनेला माफ करणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)