कोरोना : आकडे कमी होत असूनही 'या' 5 कारणांनी वाढला लॉकडाऊन

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला आहे. कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा प्रसार हळूहळू नियंत्रणात येत असूनही, सरकारने निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

कोव्हिड पॉझिटीव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यात, लॉकडाऊन कायम ठेवण्यात आलाय. तर, "काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करू", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

त्यानुसार आता रत्नागिरीमध्ये 2 जूनपासून 7 दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकांना दूध आणायला बाहेर पडण्याससुद्धा मनाई करण्यात आली आहे.

तर नांदेड, नाशिक आणि अमरावतीमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.

अर्थचक्राला चालना देण्यासाठी कोरोना पॉझिटिव्हीटी दर 10 टक्के किंवा कमी असलेल्या जिल्ह्यात, निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचं सरकारने ठरवलंय. पण, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "सद्यपरिस्थिती पहाता, सरसकट लॉकडाऊन उठवता येणार नाही."

कोरोनासंसर्ग नियंत्रणात असताना, सरकार लॉकडाऊन का उठवत नाही? सामान्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाऊन सुरू ठेवण्याची पाच प्रमुख कारणं

राज्यात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरली होती. तज्ज्ञांच्या मते, कोव्हिड-19 ची लाट ओसरताना दिसत असली तरी, परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात, "आपण रिलॅक्स झालो, तर कोरोनासंसर्ग पुन्हा डोकं वर काढेल. सुधारणारी परिस्थिती बिघडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे निर्बंध हळूहळू कमी केले पाहिजेत."

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सरकारने लॉकडाऊन सुरू ठेवण्यामागे प्रमुख पाच कारणं आहेत,

  • लसीकरणाचा मंदावलेला वेग
  • दुसऱ्या लाटेआधी आलेला बेसावधपणा आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती
  • अचानक निर्बंध शिथिल केल्यास कोरोनासंसर्ग पसरण्याची भीती
  • शहरात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असला तरी ग्रामीण भागात चिंता कायम
  • राज्याचा मृत्यूदर

कॅबिनेटच्या बैठकीत सर्व मत्र्यांनी लॉकडाऊन हटवू नये असा पवित्रा घेतला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, "काही जिल्ह्यांमध्ये आकडे कमी झाले असले. तरी, इतर ठिकाणी दुप्पट-तिप्पट वाढले आहेत. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे."

1. लसीकरणाचा मंदावलेला वेग

राज्यात आजमितीला, 2 कोटी 23 लाख नागरिकांना कोव्हिडविरोधी लस देण्यात आलीये. याचा अर्थ, फक्त 18 टक्के लोकांनी लशीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले होते, "राज्यात आणि मुंबईत लसीकरण 50 टक्क्यावर जात नाही, तोपर्यंत निर्बंध कमी करणं म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे."

लशींच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लस उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटासाठीची लसीकरण मोहिम स्थगित करण्यात आलीये. तर, प्राधान्याने दुसरा डोस बाकी असणाऱ्यांना लस दिली जातेय.

लसीकरणाचा मंदावलेला वेग लॉकडाऊन सुरू ठेवण्याचं कारण आहे का? यावर बोलताना डॉ. वानखेडकर सांगतात, "लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. राज्यातील बहुसंख्य लोकांचं लसीकरण झाल्याशिवाय सरकारने लॉकडाऊन उघडू नये."

आरोग्यमंत्रालयातील अधिकारी म्हणाले, लसीकरण मोहिमेने वेग पकडल्याशिवाय निर्बंध जास्त शिथिल करू नयेत अशा तज्ज्ञांच्या सूचना आहेत. त्यानुसार, परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येत आहेत.

नानावटी रुग्णालयाच्या संसर्गजन्यआजार तज्ज्ञ डॉ. हेमलता अरोरा म्हणतात, "लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा पहाता सरकारने 70 ते 80 टक्के लोकांना लस मिळाल्याशिवाय लॉकडाऊनचे निर्बंध उठवू नयेत."

2. दुसऱ्या लाटेआधी आलेला बेसावधपणा आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती

महाराष्ट्रात धडकलेली कोरोनाची दुसरी लाट, त्सुनामीपेक्षा भयंकर होती. काही दिवसातच राज्याला कोरोनाने विळखा घातला. तर, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनासंसर्ग होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर सांगतात, "दुसऱ्या लाटेत आपण बेसावध होतो. पहिल्या लाटेचा परिणाम कमी होत असतानाच, लॉकडाऊन उघडण्यात आला. त्यामुळे दुसरी लाट अत्यंत गंभीर बनली."

तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनचे निर्बंध एकाचवेळी उघडले तर, कोरोनासंसर्ग पुन्हा पसरण्याची भीती आहे. टास्सफोर्सचे डॉ. शशांक जोशी सांगतात, "मुंबईत अजूनही हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) आलेली नाही. निर्बंध हटवले तर, झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता आहे."

आरोग्य विभागातील अधिकारी सांगतात, दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झालीये म्हणजे, आपण धोक्यातून बाहेर आलो असं समजता कामा नये.

दुसऱ्या लाटेतून सावध झालेल्या सरकारने तिसऱ्या लाटेचा विचार करून लॉकडाऊन वाढवला का? यावर डॉ. पाचणेकर म्हणतात, "कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येतेय. यामुळे सरकार आत्तापासूनच सावध झालंय. त्या दृष्टीकोनातून लॉकडाऊन वाढवण्यात आलाय."

3. अचानक निर्बंध शिथिल केल्यास कोरोनासंसर्ग पसरण्याची भीती

तज्ज्ञ म्हणतात, लॉकडाऊन सरसकट उघडला तर बाजारपेठात पुन्हा गर्दी होईल. लग्न समारंभ, राज्यांतर्गत प्रवासाची मोकळीक मिळाल्याने लोकांचा वावर वाढेल. ज्यामुळे कोरोनासंसर्ग पसरण्याची भीती आहे.

डॉ. वानखेडकर म्हणाले, "सरकारने पहिल्या लाटेत केलेली लॉकडाऊन अगोदर उघडण्याची चूक, पुन्हा करू नये." तर, कोव्हिड टास्कफोर्सनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लॉकडाऊनचे निर्बंध एकाचवेळी शिथिल करू नका, अशी सूचना केली आहे.

तज्ज्ञ म्हणतात, सरकारने जिल्हांतर्गत प्रवास बंद ठेवावा. सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची घाई करू नये.

डॉ. अनिल पाचणेकर मुंबईतील धारावीत आरोग्यसुविधा देतात. ते सांगतात, "लॉकडाऊन उठवला की लोकांना वाटतं कोरोनाची लाट संपली. लोक मोठ्या संख्यने गरज नसताना घराबाहेर पडतात. मास्क, सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नाही. लॉकडाऊन असेल तर लोकांवर वचक राहातो. लोक नियम पाळतील आणि संसर्गाचा प्रसार कमी होईल. "

4. शहरात कोरोना नियंत्रणात पण ग्रामीण भागाची चिंता

कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत राज्यात रुग्णांची एका दिवसातली सर्वोच्च संख्या 24 हजारापार पोहोचली होती. पण, दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या 67 हजारापेक्षा जास्त नोंदवण्यात आली.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "कोरोनाच्या पहिल्या लाटेतील उच्चांक आणि राज्यातील सद्याची स्थिती जवळपास सारखीच आहे. अजूनही आपण म्हणावं तसं खाली आलेलो नाही." राज्यात 26 मे ला कोरोनारुग्णांची संख्या 24 हजारापेक्षा जास्त नोंदवण्यात आली होती.

राज्यातील कोव्हिड पॉझिटिव्हीटी दराबाबत माहिती देताना डॉ. वानखेडकर सांगतात, "राज्यातील काही जिल्हे सोडले तर, कोव्हिड पॉझिटीव्हिटी दर पाचच्या वर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा 5 पेक्षा कमी पाहिजे. त्यामुळे कोरोनाचा धोका टळण्यासाठी अजूनही दीड-दोन महिने नक्कीच लागतील."

राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार, (26 मे)

  • राज्यातील 14 जिल्ह्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त
  • सिंधुदुर्गात 21.16 टक्के, तर साताऱ्यात 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी दर
  • नांदेड, भंडारा, नंदुरबार, गोंदिया आणि जळगावमध्ये पॉझिटीव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी
  • मुंबई, नागपूर, औरंगाबादसह 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी
  • राज्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.46 टक्के

तज्ज्ञ सांगतात, लॉकडाऊन उघडताना सरकारने शास्त्रीय आधाराला सिरो-सर्वेक्षणाची जोड दिली पाहिजे. जेणेकरून, संसर्ग किती पसरलाय हे कळण्यास मदत होईल. "त्यानंतर आपण अनलॉक सुरू करू शकतो. ज्या भागात हर्ड इम्युनिटी निर्माण झालीये तो भाग उघडू शकू," असं डॉ. वानखेडकर सांगतात.

राज्याचा मृत्यूदर

सद्यस्थितीत राज्याचा मृत्यूदर 1.65 टक्के असल्याची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तज्ज्ञ सांगतात, "देशाच्या तूलनेत महाराष्ट्रातील मृत्यूदर थोडा जास्त आहे."

राज्यात दुसरी लाट पसरण्यामागे लग्न संमारंभ, ग्रामपंचायत निवडणुका, राजकीय सभा कारणीभूत असल्याचं डॉ. पाचणेकर सांगतात.

सरकारने गेल्यावर्षीसारखी कोव्हिड रुग्णालयं बंद करू नयेत. ही रुग्णालयं डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात यावीत, अशीही आता मागणी होत आहे.

राज्यात आत्तापर्यंत 94 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)