You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे- 'कोरोनाची तिसरी लाट कदाचित लहान मुलांमध्ये येईल'
तिसरी लाट कदाचित बालकांमध्ये य़ेऊ शकेल. त्यामुळे बालकांच्या डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
बालकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. लहान मुलांमध्ये सौम्य लक्षणं आढळतात. डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे. संपूर्ण सज्जता करत आहोत. सर्व सोयीसुविधा करत आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 मे) जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधला.
राज्यात पुढील पंधरा दिवसांसाठी निर्बंध वाढवत असून काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करू, असं उद्धव यांनी सांगितलं.
आपलं राज्य सुरक्षित राहायला हवं, गोरगरिबांची आबाळ व्हायला नको. निर्बंध लादावे लागतात. हे वाईट काम. स्वत:च्या जनतेवर निर्बंध लादणं यासारखं कटू काम करावं लागतं. जीवाच्या काळजीपोटी मला हे करावं लागतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील निर्बंधांची आवश्यकता स्पष्ट केली.
राज्यात काही जिल्हे असे की तिथे रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आहे. शहरी भागात प्रमाण कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन नसला तरी निर्बंध कायम राहतील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्ताचे मुद्दे-
- अजूनही रुग्णसंख्या गेल्या लाटेच्या तुलनेत सारखीच आहे. आता संख्या थोडी कमी होऊ लागली आहे. सणासुदीच्या आधी सर्वोच्च टप्पा आला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत चार दिवसांपूर्वी आढळलेली रुग्णसंख्या यांची तुलना केली तर आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही.
- सक्रीय रुग्णांची संख्याही पहिल्या लाटेप्रमाणेच आहे.
- संसर्ग होण्याचा वेग प्रचंड आहे. झपाट्याने ग्रासून टाकतो आहे. रुग्णाला बरं व्हायला वेळ लागतो आहे. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली आहे. अनेकांना लाँग कोव्हिड झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे.
- आपल्या राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता. 1700 मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज लागत होता. उद्योगांना लागणारा ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरला. जामनगर, भिलाई, रुरकेला इथून ऑक्सिजन आणावा लागला. आजही आणतो आहोत. इथून रिकामे टँकर प्रकल्पाठिकाणी नेत होतो. रेल्वेने टँकर आणत होतो. ऑक्सिजनचं ऑडिट केलं.
- ऑक्सिजनची कमतरता भासली तर सावधगिरी पावलं उचलावी लागतील. म्यूकरमायकोसिसचा संसर्ग काळजीत टाकणारा आहे.
- माझा डॉक्टर म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर यांना आवाहन केलं. पावसाळा येतो आहे. सर्दी-ताप-खोकला ही नेहमीची लक्षणं. सुरुवातीला आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो. जर शक्य असेल तर विलगीकरणात राहा. नसेल तर सरकारी क्वारंटीनमध्ये राहा. ज्यांना सर्वाधिक आवश्यकता आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये यावं.
- सव्वा दोन कोटी नागरिकांचं लसीकरण केलेलं नाही. मधल्या काळात थोडी पंचाईत झाली होती. अनेकांना दुसरा डोस उपलब्ध नव्हता. मधल्या काळात 18-45 वयोगटाचं लसीकरण थांबवावं लागलं होतं.
- उच्च शिक्षणासाठी जे परदेशी जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी लशीकरणाची सुविधा केली आहे.
- दहावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकन व्यवस्था. बारावीचं काय करणार? आढावा घेत आहोत. लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घेऊ. बारावीच्या परीक्षेवर पुढचं शिक्षण अवलंबून असतं. त्याकरता केंद्राने धोरण ठरवायला हवं. परिस्थिती अभूतपूर्व आहे.
- पंतप्रधानांना पत्र लिहीन, बोलेनही. बारावीसंदर्भात केंद्राने एक धोरण ठरवायला हवं. केंद्राने मार्गदर्शन करायला हवं. एका राज्यात परीक्षा होते आहे, एका ठिकाणी परीक्षा झालेली नाही असं व्हायला नको.
- घर कोरोनामुक्त करायचं आहे. वस्ती कोरोनामुक्त करायचं आहे.पोपटराव पवार (हिवरे बाजार), तरुण मुलं- ऋतुराज देशमुख, कोमलताई करपे या तिघांनी आपापलं गाव कोरोनामुक्त केलं आहे.
वादळासारख्या संकटासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज
तौक्ते चक्रीवादळाच्या काळात आपल्या प्रशासनाने चांगलं काम केलं आहे. म्हणून वादळाचा धोका थोडक्यात निभावला. मी वादळ येण्याआधीपासूनच आढावा घेत होतो. नुकसान किती झालंय याची कल्पना आली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"मी वादळग्रस्त भागाचा धावता दौरा केला आहे. घरावर झाडं पडली होती, वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रत्यक्ष मदत द्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत मदतीसंदर्भात निकषांवर चर्चा झाली होती. हे निकष बदलायला हवेत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
संकटं वारंवार येणार असतील तर काही ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. बंधारे, भूमिगत तारांचं वहन, भूकंपरोधक घरं, पक्के निवारे यासारख्या उपाययोजनांसंदर्भात काम सुरू असून केंद्र सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)