उद्धव ठाकरे : ऋतुराज देशमुख यांनी गाव कोरोनामुक्त कसं केलं?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 मे) राज्यातील जनतेला संबोधित करताना तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांच्या कार्याचा उल्लेख केला.

ते म्हणाले, "सगळ्या घरांनी ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होऊ शकतं. झालंही आहे. पोपटराव पवार यांनी गाव कोरोनामुक्त केलंय. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांनी गाव कोरोनामुक्त केलं. हे दोन तरुण गाव कोरोनामुक्त करू शकतात, तर आपण का नाही करू शकत?"

ते पुढे म्हणाले, "मी या तिघांशीही बोलणार आहे. शक्य झालंय तर तुमच्याशीही संवाद घ़डवून आणेल. राज्यातल्या इतर सरपंचांनीही या सरपंचांनी गाव कसं कोरोनामुक्त केलं ते पाहायला पाहिजे."

ऋतुराज देशमुख कोण आहेत?

ऋतुराज देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावाचे सरपंच आहेत. वयाच्या 21व्या वर्षी त्यांची सरपंचपदी निवड झाली.

18 जानेवारी रोजी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांत ऋतुराज रवींद्र देशमुख यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कारण, 21 वर्षांचे ऋतुराज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे राहिले आणि जिंकूनही आले. इतकंच नाही तर त्यांनी निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं आणि ते सुद्धा जिंकून आणलं.

गावाच्या कोरोनामुक्तीचा पॅटर्न

सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गावात 'बी पॉझिटीव्ह, गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम राबवली.

बीबीसी मराठीला याविषयी माहिती देताना ते म्हणाले, "मार्चपर्यंत गावात कोरोनाचा रुग्ण नव्हता. पण एप्रिलमध्ये 14 रुग्ण सापडले, तसंच 2 जणांचा मृत्यूही झाला, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे मग आम्ही गावात 'बी पॉझिटीव्ह, गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम हातात घेतली आणि गावाला कोरोनामुक्त केलं."

या मोहिमेअंतर्गत त्यांनी पुढील पंचसुत्रीचा वापर केला.

  • गावातील नागरिकांच्या अँटीजन टेस्ट केल्या.
  • आशासेविकांच्या मदतीनं गावात घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासली.
  • प्रत्येक कुटुंबाला कोरोना सेफ्टी किट दिली. त्यात मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा समावेश.
  • बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्तीसाठी सक्तीचं 3 दिवसांचं क्वारंटाईन.
  • गावातील 45 वर्ष वयावरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित केला.

निवडणूक जाहीरनाम्याची चर्चा

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऋतुराज यांनी गाव विकासाचा तयार केलेला जाहीरनामा सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला होता.

आपलं पॅनेल निवडून आल्यास गावासाठी काय काय उपक्रम राबवणार, याची सविस्तर माहिती त्यानं या जाहीरनाम्यात दिली होती.

'तरुणांनी राजकारणात यावं, कारण...'

ग्रामीण भागात आजही ग्रामपंचायत निवडणूक किंवा राजकाणात उतरायचं म्हटलं की त्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जातं.

पण, ऋतुराज यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच राजकारणात प्रवेश केलाय.

राजकारणात का यावंसं वाटलं, या प्रश्नावर बीबीसीला त्यांनी सांगितलं होतं, "आमच्या गावात आतापर्यंत काहीच काम झालेलं नाही. अजून पाण्याची टाकीसुद्धा नाही गावात. गावात हापसे आहेत आणि त्यावरून पाणी आणावं लागतं. ना चांगले रस्ते आहेत आणि ना घनकऱ्याचं व्यवस्थापन होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्वत: राजकाणात यायचं ठरवलं आणि पॅनेल उभं केलं.

"शिकलेल्या पोरांसाठी विकास महत्त्वाचा आहे, खुर्ची नाही. ही जुनी खोडं खुर्चीला धरून बसायची आणि विकासाच्या नावानं मात्र बोंब होती. तरुण पोरांकडे विकास कसा करायचा याचा दृष्टिकोन असतो म्हणून अधिकाअधिक तरुणांनी राजकारणात यायला हवं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)