ग्रामपंचायत निवडणूक निकाल : महाराष्ट्रात नक्की कोणाची सरशी, नक्की कुणाला धक्का?

महाराष्ट्रातल्या 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज (18 जानेवारी) निकाल जाहीर झाला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवली जात नाही पण ग्रामपंचायतींमध्ये मोठे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होत आहे.

या 3 बहुचर्चित ग्रामपंचायतीत कोण जिंकलं?

अनेक नेते, वेगवेगळे पक्ष स्वत:च्या विजयाचा दावा करत आहेत. ते आपण क्रमाने पाहू. तत्पूर्वी, महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये काय निकाल लागला, हे पाहूया.

अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथे बिनविरोध निवडणुकीला विरोध झाला. त्यामुळे इथल्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

पाटोदा :भास्कर पेरे पाटील यांची मुलगी पराभूत

पाटोदा इथला निकाल हाती आली असून आदर्श सरपंच भास्कर पेरे यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा पराभव झाला आहे. त्यांना 187, तर विरोधी उमेदवाराला 204 मतं मिलाली आहेत.

पाटोदा इथं 8 वॉर्ड बिनविरोध, तर 3 वॉर्डांमध्ये निवडणूक झाली.

हिवरे बाजार:पोपटराव पवार यांच्याकडे पुन्हा एकहाती सत्ता

हिवरे बाजारची ग्रामपंचायत तब्बल 30 वर्षं बिनविरोध राहिली. आता मात्र इथं ग्रामपंचायतची निवडणूक झाली. इथली ग्रामपंचायत 7 जण सदस्यांची असून सगळ्या जागांसाठी निवडणूक झाली.

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता, सर्व जागा जिंकल्या आहेत. पोपटराव पवार यांच्या वॉर्डातील विरोधी उमेदवाराला 44 मते. तर पवारांचा 282 मते घेऊन विजय झाला आहे.पाटोद्याचे निकाल आले.

राळेगणसिद्धी : अण्णांच्या पॅनलचा विजय

राळेगण सिद्धीत 3 वॉर्ड असून 9 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. सद्यस्थितीला इथले 2 उमेदावर बिनविरोध ठरले असून 7 जागांसाठी निवडणूक झाली.

यात विद्यमान सरपंच लाभेष औटी यांच्या ग्रामविकास पॅनेलनं सगळ्या 7 जागांवर विजय मिळवला आहे. हा पॅनल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांचा आहे.

साताऱ्यातल्या धनगरवाडीत 'नोटा'ला सर्वाधिक मतं

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावामध्ये दोन प्रभागांमध्ये सर्वाधिक मते ही नोटाला देण्यात आली आहेत.

पहिल्या प्रभागात 217 दुसर्‍या प्रभागात 211 मतं ही नोटाला देण्यात आली आहेत.

या गावात एकूण नऊ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यावेळी सात सदस्य बिनविरोध निवडून आले होते. मात्र दोन जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

यावेळी गावकऱ्यांनी समजावून देखील उमेदवार आपल्या मतावर ठाम असल्याने ही निवडणूक झाली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकी दाखवत नोटाला मतदान करण्याचा निर्णय घेतला. आता या प्रभागांमध्ये कोणाला विजयी करायचं, याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून विनंती केली आहे.

सर्वाधिक जागांच्या विजयाचे दावे-प्रतिदावे

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तीन पक्ष असल्यामुळे आम्हाला चांगली स्पेस मिळाली. यापुढेही आम्हाला चांगली स्पेस मिळेल."

मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांनीही सर्वाधिक जागांच्या विजयाचा दावा केलाय.

महाविकास आघाडीवर विश्वास, भाजपची पिछेहाट - थोरात

"ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात. महाविकास आघाडीवर जनतेनं विश्वास दाखवलंय. आमच्या कामावर लोक समाधानी आहेत," असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

"विदर्भात 50 टक्के जागा काँग्रेसला मिळालंय. विदर्भात काँग्रेसला निर्विवाद यश मिळालंय. मराठवाड्यातही आम्हाला चांगलं यश मिळेल, अशी आशा आहे. चार हजार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्यात," असा दावा थोरातांनी केला.

भाजपवर टीका करताना थोरात म्हणाले, "भाजपची पिछेहाट हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि माजी प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातच भाजपचा पराभव झालाय."

कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा- अजित पवार

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना केले आहे.

"स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा," असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

6 हजार ग्रामपंचायतीमध्ये भाजप 1 नंबर - भाजप

महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. सत्ताधारी पक्षांनी साम, दाम, दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत. 14 हजार पैकी 6 हजार पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर 1 असेल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले व यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यभरात सगळ्यांचं लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीत आदर्श सरपंच भास्कर पेरे यांच्या मुलीचा पराभव झाला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या खानापूर गावात शिवसेनेची बाजी

कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तातुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकत बाजी मारली आहे. 9 जागांपैकी 6 जागावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता येणार यासाठी चुरस होती.

खानापूर गावाच्या ग्रामपंचायत निकालावर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं जन्मगाव आहे. या गावात आधी भाजपची सत्ता होती. मात्र निवडणूकीआधी झालेल्या पक्षांतरातून वेगळी समीकरणं समोर आली. या गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस, आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले होते. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना खानापूरमध्ये मात्र भाजप प्रणित आघाडीसोबत दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या.

शिवसेनेच्या झेंड्याखाली बाळासाहेब पोपळे, राजू पाटील, मानसिंग दबडे यांची रांगणा माऊली आघाडी होती. तर भाजपचे प्रविण सावंत, राष्ट्रवादीचे संजय रेडकर आणि कॉंग्रेसचे भूजंगराव मगदूम यांची तळेमाऊली आघाडी होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार चंद्रकांत पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या राधानगरी - भूदरगड या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.

त्यावेळी निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. त्यामुळं या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सध्या प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे जिल्ह्यातील एरमेव आमदार आहेत. निवडणूकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातली दरी वाढत गेली.

स्थानिक पातळीवर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस भाजपसोबत गेल्याने खानापूरकडे सर्वाचं विशेष लक्ष लागलं होतं. त्यात प्रकाश आबिटकर यांनी सत्ता खेचून आणल्याने शिवसेनेचं पारडं जड झाल्याचं मानलं जातं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का

अहमदनगरमध्ये माजी मंत्री, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे. त्यांच्या शेजारच्या लोणी खुर्द गावात विखेंच्या संबंधित पॅनेलचा पराभव झाला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकत विरोधकांनी विजय मिळवला आहे.

विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.

स्वबळाचा नारा

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं.

या निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितल्यानुसार, "राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे."

"गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं."

आताचे दोन बदल

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत यंदा दोन बदल करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याआधी ही सोडत निवडणुकीपूर्वी जाहीर होत असे.

आता नवीन निर्णयानुसार, सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसंच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसांच्या आत राबवण्यात यावी, असे निर्देश सरकारनं दिले आहेत.

दुसरा बदल म्हणजे राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मतदानानंतर एका वर्षाच्या जात पडताळणीचं प्रमाणपत्र सबमिट करावं लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)