चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय का घेतला?

चंद्रपूर जिल्ह्यातली दारू बंदी उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय झाला होता. चंद्रपूरच्या शेजारच्या गडचिरोलिमध्ये मात्र दारूबंदी कायम आहे.

दारुबंदीच्या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री वाढली होती, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार पालकमंत्री झाल्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त निवेदनं दारूबंदी उठवण्यासाठी आली होती, तर 33 हजार निवेदनं ही बंदी कायम ठेवण्यासाठी आली होती.

त्यानंतर राज्य सरकारनं सनदी अधिकारी श्री झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. या समितीने परिस्थितीची समिक्षा केली आणि त्यांचा अहवाल दिला.

"दारूबंदीनंतर या भागात गुन्हेगारी वाढला आहे, निकृष्ट आणि अवैध दारूचे प्रकार वाढले आहेत, असा अहवाल या समितीने दिला. तसंच अवैध दारू विक्री प्रकरणी 4042 महिला आणि 322 लहान मुलांवर गुन्हे दाखल झालेत. दारूबंदीचे दुष्परिणाम दिसून येत होते. त्यामुळे मग लोकांची आणि विविध माहिती घेऊन झा समितीने अहवाल दिला. त्यानंतर आता चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असं पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

सरकारला साजेसा निर्णय - मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हा निर्णय लोकांनी घेतला होता. 588 ग्रामपंचायतींनी हा ठराव केला होता. 5000 पेक्षा जास्त महिला त्यासाठी अणवाणी चालत गेल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यात अभय बंग आणि विकास आमटेसुद्धा होते. त्यांच्या समितीने दारूबंदीची शिफारस केली होती. फडणवीस सरकारनं फक्त त्याची अमंलबजावणी केली होती."

एबीपी माझाशी बोलताना ठाकरे सरकारवर टीका करताना मुनगंटीवार पुढे म्हणाले "या सरकराने कायमच दवा की दारू यापैकी कायम दारूला महत्त्व दिलं आहे. आरोग्यासाठी दारू चांगली असल्याचा त्यांचा समज असावा. म्हणून गेल्या वर्षभरात त्यांनी 4 मोठे निर्णय घेतले. लॉकडाऊनमध्ये कुणाला सूट देण्यात आली नाही. पण दारू विक्रेत्यांना सूट देण्यात आली. कोरोनाच्या संकटातही वाईन प्रमोशनसाठी तरतूद करण्यात आली. या सरकारच्या वृत्तीला साजेचा असा हा निर्णय आहे."

"दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी ऊभी बाटली आडवी करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवट रिचवलीचं. भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा. परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर," अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे.

आताच हा निर्णय का घेतला - पारोमिता गोस्वामी

राज्यात कोरोनामुळे लोकांचे बळी जात असतांना कडक लॉकडाऊन आहे. पण अशात चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने का घेतला, प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवे आहे. असं दारूबंदी विरोधी आंदोलनाच्या प्रणेत्या आणि श्रमिक एल्गार संघटनेच्या प्रमुख अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी म्हटलंय.

"कोरोनामुळे लोकांच्या हाताला काम नाही. नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविल्यानंतर दारु पिणारे दारुच्या नशेसाठी आहे ते ही विकून मोकळे होतील अशी भीती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना काळात दारु पिण्यावर नागरिकांनी बंधनं आणावीत असं जाहिर केलं आहे. दारु पिणाऱ्यांवर कोरनाचा प्रभाव जास्त दिसतो असंही जागितक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. पण अशा परिस्थित चंद्रपुरातील दारुबंदी उठविण्याचा प्रकार निंदनीय आहे, असं गोस्वामी यांनी सांगितलं आहे.

चंद्रपुरातील दारूबंदी उठवल्यानंतर शेजारील गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातून अवैध दारू जाईल त्यामुळे त्या जिल्ह्यातील दारुबंदीही अडचणीत येईल असंही गोस्वामी म्हणाल्यात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )