राजीव सातव: पंचायत समिती सदस्य ते काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राजीव सातव यांचा राजकीय प्रवास?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच पक्षातील नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या छोट्याशा शहरातून पुढे येत ते दिल्लीतील महत्त्वाच्या राजकारण्यांपैकी एक बनले. त्यांचा राजकीय प्रवास कसा होता?

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना सायटोमेगॅलो या विषाणूचा संसर्ग झाला होता. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते 47 वर्षांचे होते.

राजीव सातव म्हणजे दिल्लीतला महाराष्ट्रातला सर्वांत तरुण चेहरा. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी अशी राजीव सातव यांची ओळख होती. पण 2014 आणि 2017 मधील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांची राजीव सातव हे नाव सर्वदूर पसरले.

राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य म्हणून संघटनेसाठी काम पाहिले.

राजकीय वारसा, पण पंचायतीपासून सुरूवात

सातवांनी आपली राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून सुरू केलेली पण तरी फार कमी काळात त्यांनी दिल्लीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले. त्यातले हिंगोलीतून निवडून आलेले राजीव सातव एक. त्यामुळेच त्यांच्या विजयाची दखल महाराष्ट्रातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेण्यात आली. त्यानंतर राजीव सातवांनी कधी मागे पाहिलेच नाही.

राजकारणाचा वारसा तसा त्यांना घरातूनच मिळालेला होता. त्यांची आई रजनी सातव या काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र तरीही राजीव सातवांनी निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात पंचायत समितीपासून केली होती. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील तळागाळातल्या प्रश्नांची जाण होती.

राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. त्यामुळेच लोकसभेचे खासदार असताना 2017 मध्ये आधार विधेयकावर विरोधी पक्षाकडून सर्वांत आधी बोलण्याची संधी त्यांना देण्यात आली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "माझ्या मंत्रिमंडळात त्यांच्या आई होत्या. ते पंचायत समितीत होते. त्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणात थोड्याच काळात जम बसवला. दिल्लीत कामाचा झपाटा वाढवला. सर्व धर्म सम भाव जपला. काम पूर्ण झाल्यावर सारखे कृतज्ञता व्यक्त करायचे. त्यांनी हाय कमांडचा विश्वास मिळवला होता."

मनरेगा, दुष्काळ, शेती, रेल्वेपासून ते IIM आणि कंपनी कायद्याच्या प्रश्नांवरही त्यांनी लोकसभेत प्रभावीपणे आपली भूमिका मांडली होती. काँग्रेसकडून निवडणुकीच्या राजकारणातली एक एक वरची पायरी चढत असताना त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरही आपली वाटचाल तेवढ्याच जोमाने सुरू ठेवली.

राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राजीव सातव नव्या पीढीचे एक संवेदनशील नेते होते. जमिनीपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंतचा ते दुवा होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा स्वभाव होता.

"महत्त्वाचे म्हणजे सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे तळागाळताला फिडबॅक त्यांच्यापर्यंत पोहचत होता. आधीच गांधी कुटुंबाची जमिनीशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळे अहमद पटेल यांच्यानंतर राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे," चावके सांगतात.

राहुल गांधींचे विश्वासू सहकारी

2008 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक जिंकली. त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे 2010 मध्ये त्यांच्याकडे युवा काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपवण्यात आली.

तब्बल चार वर्षं ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांची राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले. सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.

राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राजीव सातव यांचे वय कमी होते पण तरीही काँग्रेसची कार्यपद्धती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आत्मसात केली. हीच त्यांच्या जमेची बाजू होती. ज्याप्रमाणे सोनिया गांधी यांच्यासोबत अहमद पटेल काम करायचे. काम सांभाळायचे त्याच प्रमाणे राहुल गांधी यांच्या टीममध्ये राजीव सातव यांचे स्थान होते. राहुल गांधी यांच्या ते अत्यंत जवळचे होते. त्यामुळे पडत्या काळात राजीव सातव यांच्या जाण्यामुळे काँग्रेसची मोठी हानी झाली आहे."

2014 साली त्यांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मात्र महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह केवळ राजीव सातवांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.

देशपातळीवर काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यामुळे संघटनात्मक पातळीवर काम करण्याची गरज निर्माण झाली. विशेष म्हणजे केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर मोदींच्याच गुजरातमधली पहिली विधानसभा निवडणूक होती. गेल्या दोन दशकांपासून गुजरातवर भक्कम पकड असलेल्या भाजपला आव्हान देणं सोपं नव्हतं. मात्र हे आव्हान देण्याची जबाबदारी युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या राजीव सातवांकडे देण्यात आली.

सुनील चावके सांगतात, "ते ट्रबल शूटर होते. समोपचाराने विषयाकडे पहायचे. त्यांच्यात काँग्रेसमधील अहमद पटेल यांचे स्थान घेण्याची क्षमता होती. 2011 पासून काँग्रेसनेही त्यांच्यात गुंतवणूक केली. पण नियतीला ते मान्य नव्हते असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील चांगल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे महाराष्ट्राचेही नुकसान झाले आहे."

ते पुढे सांगतात, "राहुल गांधी यांच्यासोबत सहा महिने किंवा वर्षभरापेक्षा जास्त कोणता नेता टिकत नाही पण राजीव सातव याला अपवाद होते."

विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी पण पोटनिवडणुकीत पराभव

गुजरातमधल्या सौराष्ट्रच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला जोरदार टक्कर तर दिलीच. पण काँग्रेसला सर्वाधिक जागा या सौराष्ट्र प्रांतातून मिळाल्या. त्यानंतर सातवांकडे संपूर्ण गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे."

2017 गुजरात निवडणुकीतील राजीव सातव यांच्या कामगिरीची उणीव काँग्रेसला पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भासेल असंही रशीद किडवई सांगतात. ते सांगतात, "2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. गेल्या वेळेस राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने गुजरातमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे पक्षाला त्यांचा नक्कीच फायदा झाला असता."

2017 मध्ये राजीव सातव यांनी गुजरातमध्ये काँग्रेसला कधीही न मिळालेलं यश मिळवून दिलं. तेव्हा गुजरात काँग्रेसची जबाबदारी अशोक गहलोत यांच्याकडे होती. पण त्यांच्याकडून राजीव सातव यांना प्रभारी पद देण्यात आलं.बीबीसी गुजरातचे प्रतिनिधी रॉक्सी गागदेकर छारा सांगतात, "त्यावेळी काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट होती. पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. राजीव सातव यांनी हे मतभेद शांत केले. शिवाय, हार्दिक पटेल यांनाही काँग्रेसने सोबत घेतले. त्यामुळे पटेल मतांना आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसला यश आले."पण 2021 मधील गुजरात पोटनिवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. यामुळे राजीव सातव यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. उमेदवारांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.रॉक्सी गागदेकर छारा सांगतात, "यावेळी मात्र काँग्रेसचा अंतर्गत कलह आणि सादरीकरण राजीव सातव हाताळू शकले नाहीत. ग्रामीण भाग हे काँग्रेसचे शक्तिस्थान आहे. मात्र तिथेही भाजपने काँग्रेसचा दारूण पराभव केला. पंचायत समित्याही भाजपकडे गेल्या."

महाराष्ट्रात ठसा का नाही उमवटता आला?

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात निवडणुकीच्या मैदानात अनुभवी नेत्यांची गरज होती. मात्र राजीव सातवांनी विद्यमान खासदार असतानाही हिंगोलीतून निवडणूक लढवली नाही. या जागेवरच नव्हे तर राज्यात काँग्रेसची केवळ एकच जागा आली. राज्यात काँग्रेसची एवढी पीछेहाट होत असताना राजीव सातवांनी मात्र राज्यातील संघटनेत विशेष रस दाखवल्याचे दिसून येत नाही.

राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राजीव सातव यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली नाही कारण त्यांना विरोध होता. राज्यातल्या नेत्यांचा विरोध असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवली नाही."

ते सांगतात, "पक्षाने महाराष्ट्रात संघटनेसाठी जबाबदारी दिली असती तर ती त्यांनी चांगली पार पाडली असती. गुजरातमध्ये ते प्रभारी होते. महाराष्ट्रात मात्र तशी संधी मिळाली नाही."

राजीव सातव यांच्याकडे राज्याबाहेरील जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांचा विचार राज्यासाठी झाला नसावा असं नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांना वाटतं. ते सांगतात, "राजीव सातव यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील जबाबदाऱ्या सातत्याने आल्या कदाचित त्यामुळे त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली नसावी. त्यांचा वय आणि अनुभव देखील महाराष्ट्रातील नेत्यांच्या तुलनेत कमी होता. याची जाणीव सातव यांना सुद्धा होती त्यामुळे त्यांनी देखील महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी फारसे प्रयत्न केले नसावेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)