राजीव सातव यांच्या पार्थिवावर हिंगोलीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचं रविवारी (16 मे) पहाटे निधन झालं. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड या त्यांच्या मुळगावी आज (17 मे) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

22 एप्रिल रोजी राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन दिवसांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटवर ठेवावे लागले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. 10 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.

कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची तब्येत सुधारेल अशी अपेक्षा होती पण त्यांना सायटोमेगॅलो या नवीन विषाणूचा संसर्ग झाला होता अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

रविवारी (16 मे) पहाटे सातव यांचं निधन झालं. ते 47 वर्षांचे होते.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून ही सातव यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी म्हटलं, "आज मी एक सहयोगी गमवला ज्याने युवक काँग्रेसपासून माझ्यासोबत सुरुवात केली आणि आजपर्यंत साथ दिली. राजीव सातव यांचे हसणे, त्यांचे नेतृत्व, जमिनीवर असलेला व्यक्ती, पक्षाशी निष्ठा आणि मैत्री कायम आठवणीत राहिल."

राजीव सातव यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, "खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

'आम्ही आमचा हुशार सहकारी गमावला'

राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी सातव यांच्यासंबंधीची आपापली भावना व्यक्त केली आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "राजीव सातव यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. ते खूप ताकदीचे नेते होते. हा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे."

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं, "आम्ही आमचा हुशार सहकारी गमावला आहे. ते मनानं अगदी निर्मळ होते. काँग्रेस पक्षाच्या मूल्यांशी ते घनिष्ठ होते. तसंच भारताच्या जनतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं. माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांसाठी मी प्रार्थना करते."

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, "काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.

"गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!"

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे."

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केलं की, "राजीववर ईश्वर प्रसन्न आहे, जे मागितले त्याला ईश्वर तथास्तु म्हणतो अशी नेहमी आमच्या सहकाऱ्यांमध्ये चर्चा असायची. पण ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला.

"हॉस्पिटलमधून मला माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा कायम माझ्या हेलावलेल्या हृदयात कोरलेल्या राहतील."

सायटोमेगॅलो व्हायरस नेमका आहे तरी काय?

दरम्यान, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॅा इश्वर गिलाडा यांनी सायटोमेगॅलो व्हायरसबद्दल सविस्तर माहिती दिली.

"सायटोमेगॅलो व्हायरस हा एक संधीसाधू रोग म्हणून ओळखला जातो. गरोदर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे महिलांची TORCH टेस्ट केली जाते.

यातील C म्हणजे हा व्हायरस आहे. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या व्हायरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येतं", असं डॉ. गिलाडा यांनी सांगितलं.

या व्हायरसची लागण झाल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात यावर डॉ. गिलाडा म्हणाले, "या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकतात. रॅटिनावर याचा परिणाम होतो. काही लोकांमध्ये याचं इन्फेक्शन फुफ्फुसात होतं. याला सीएमई न्यूमोनिया म्हणतात.

काही रुग्णांना यामुळे डायरियाचा त्रास होण्याची शक्यता असते. मेंदूमध्ये देखील या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते".

या व्हायसवर कोणते उपचार उपलब्ध आहेत याबाबत डॉ. गिलाडा म्हणाले, "या आजारावर आता काही औषधं नियंत्रण आणि प्रतिबंध यासाठी आहेत. याचे उपचार सहा ते आठ आठवडे करावे लागतात".

काही लोकांमध्ये कोरोना संसर्गात या व्हायरसमुळे आजार होतो. रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं.

कोण होते राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पदही होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.

राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.

राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं.

पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.

कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)