You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : गंगा आणि इतर नद्यांमध्ये आढळणाऱ्या मृतदेहांमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत
- Author, सीटू तिवारी आणि समिरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी
बिहारमधल्या बक्सर जिल्ह्यातील चौसा प्रखंडमधल्या गंगा नदीपात्रात काही दिवसांपूर्वी मृतदेह आढळले होते. मात्र, या एकाच ठिकाणी नाही तर जिल्ह्यातील सिमरी प्रखंडच्या केशोपूर गाव, वीस का डेरा, तिलक राय का हाता आणि मानसिंह पट्टी या भागातही गंगा नदीपात्रात मृतदेह फेकले जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
बक्सर जिल्ह्यातील सिमरीमध्येही मृतदेह आढळल्याचं सांगितलं जात आहे. याविषयी बीबीसीशी बोलताना स्थानिक नगरसेवक विजय मिश्र म्हणाले, "गरीब लोक आहेत. त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत. त्यात प्रशासनाकडूनही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत ते गंगाजीच्या पात्रातच मृतदेह प्रवाहित करतात. हे मृतदेह घाटांच्या किनारी येत आहेत. मानसिंह पट्टी, केशोरपूर पंचायत हे गंगाजीच्या अगदी जवळचे भाग आहेत. 100-150 मीटर अंतरावर. तिथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे."
मात्र, सिमरीचे प्रखंड विकास अधिकारी अजय कुमार सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "चौसा प्रखंडमध्ये मृतदेह आढळल्यानंतर 10 मेच्या संध्याकाळपासूनच अंचलाधिकारी आणि मी स्वतः इथल्या गंगा नदीच्या किनारी असलेल्या भागांमध्ये गेलो होतो. मात्र, आम्हाला कुठेही मृतदेह दिसले नाहीत. भविष्यात असे काही मृतदेह आढळल्यास त्यांच्यावरही प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येतील."
गावकरी काय म्हणतात?
चौसा व्यतिरिक्त इतर कुठल्याही भागात मृतदेह आढळले नसल्याचं प्रखंड विकास अधिकारी सांगत असले तरी गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे .
केशोपूर पंचायतचे योगेश कुमार यादव महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यांचं घर गावातील घाटाला लागून आहे.
ते सांगतात, "आमच्या संपूर्ण वॉर्डात दुर्गंधी पसरली आहे. जेवणही जात नाही. कोरोना काळात लोक असेच मृतदेह फेकून निघून जातात. त्यांना समजावलं तरी ऐकत नाही. इथे रोज मृतदेह दिसतात. प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही."
याच भागातील बलिहार पंचायतमध्ये राहणारे दिवाकर सांगतात, "आमच्या गावाला लागूनच वीस का डेराचा घाट आहे. 10 मेच्या संध्याकाळी या घाटाला लागून 10 ते 15 मृतदेह आढळल्याचं कळलं. त्यानंतर आम्ही लांब काठ्यांनी ते मृतदेह पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ढकलले. हे सगळे मृतदेह कोरोनामुळे येत आहेत."
याशिवाय या भागातील कपिल मुनी आणि बंटी कुमार यांनीही मृतदेहांमुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं.
सिवानमधलं चित्र
कोरोना संकटाच्या काळात मृतदेहांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत नदीत फेकण्याचा प्रकार केवळ बक्सर जिल्ह्यात दिसलेला नाही. सिवान जिल्ह्यातील गुठनी प्रखंडमधल्या योगीयाडीहतले गावकरीही त्रासले आहेत. गावकऱ्यांनी गावातील रस्त्यावर काठ्या टाकून मिश्र घाटाकडे (स्मशानघाट) जाणारा रस्ता बंद केला आहे.
गावात रहाणारे विनोद सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "ही गंडक नदी आहे. या नदीकाठी मिश्र घाटाच्या किनाऱ्यावर बनक्का, कटही, रामपूर, सोहनपूर, चिलमरवा या भागातूनही म्हणजे बिहारच नाही तर यूपीमधूनही लोक येऊन अंत्यसंस्कार करतात."
ते पुढे सांगतात, "सध्या अशी परिस्थिती आहे की अंत्यसंस्कारासाठी आलेले मृतदेहांना अग्नी देऊन पळून जातात. मृतदेह पूर्ण जळूही देत नाहीत. सध्या वाळलेली लाकडंही मिळत नाहीत. त्यामुळे मृतदेह पूर्ण जळत नाही."
"अर्धवट जळालेले मृतदेह असेच घाटाजवळ पडून असतात. कुत्रे तेच खावून गावात फिरतात. गावात अनेकांना सर्दी-खोकला आहे. गावातल्या एकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे."
तर गुठनीचे प्रखंड विकास अधिकारी धीरज कुमार दुबे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "घाटावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते तिथल्या व्यवस्थेवर देखरेख ठेवतात. कुठेच कुठल्याच वस्तूचा तुटवडा नाही."
71 मृतदेहांचं शवविच्छेदन
गंगा नदीच्या काठावर वसलेला बक्सर जिल्हा बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला उ. प्रदेशचा बलिया, दक्षिणेला बिहारचा रोहतास, पश्चिमेला उ. प्रदेशचा गाजीपूर तर पूर्वेला बिहारचा भोजपूर जिल्हा आहे.
बक्सर प्रशासनाने 10 मेपर्यंत 30 ते 40 मृतदेह असल्याचं सांगितलं होतं. मात्र, चौसा स्मशानघाटावर मिळालेल्या एकूण 71 मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जितेंद्र नाथ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "71 मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. मृतदेह पूर्णपणे कुजले होते. त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण सांगता येणार नाही. मात्र, सर्व मृतदेहांचे डीएनए घेतले आहेत."
जिल्हा जनसंपर्क अधिकारी कन्हैय्या कुमार यांनी सांगितलं, "घाटावर आढळलेल्या सर्व मृतदेहांचं दफन करण्यात आलं आहे. तसंच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत."
चौसा स्मशान घाटावर गेलेले पत्रकार किशोर कपिंद्र सांगतात, "यूपीतून यापूर्वी मृतदेह वाहून यायचे. मात्र, यावेळी त्यांची संख्या खूप जास्त आहे. कोरोना काळात लोकांची आर्थिक परिस्थितीही डबघाईला आली आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत कुटुंबातील सदस्याच्या पार्थिवावर ज्या सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातात, त्याचं पालन होताना दिसत नाही."
मृतदेहांवरील अंत्यसंस्कार आणि हिंदू कर्मकांड
कोरोना काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणं अवघड आणि महागडं बनलं आहे.
दैनिक भास्कर या दैनिकाच्या बक्सर आवृत्तीत छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार अंत्यसंस्कारासाठी स्मशानांमध्ये 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च येतोय. अॅम्ब्युलंसमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी 2 हजार रुपये, लाकूड आणि इतर साहित्यासाठा 12 हजार रुपये घेतले जात असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
मात्र, चौसामध्ये गंगा नदीत मृतदेह वाहून आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर बक्सर प्रशासनाने एक पत्रक जारी करत आमच्याकडे ही पद्धत नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं.
याविषयी हिंदू कर्मकांडाचे जाणकार आणि बक्सरचे रहिवासी प्रभंजन भारद्वाज सांगतात, "बिहारमध्ये बहुतांश ठिकाणी मृतदेहांना अग्नी देतात. मात्र, कधी-कधी उदाहरणार्थ सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्यास किंवा कुष्ठरोगासारखा साथीच्या आजाराने मृत्यू झाल्यास मृतदेह नदीत सोडतात."
"अशावेळी मडक्यात पाणी भरून मृतदेहाला एका काठीने बांधून त्या काठीला हे मडकं बांधून नदीपात्रात मधोमध सोडलं जातं. त्याचप्रमाणे ज्यांचा मृत्यू स्पर्शदंशाने झाला त्यांना केळीच्या धडाला बांधून प्रवाहित करतात."
ते पुढे सांगतात, "बिहार आणि यूपीमधून कर्मनाशा नदी वाहते. या नदीच्या यूपीकडच्या भागात गेल्यास तिथे शेकडो गावांमध्ये पार्थिवाला केवळ मुखाग्नी देऊन नदीत प्रवाहित करण्याची परंपरा आहे."
यूपीतही गंगा नदीत आढळले मृतदेह
बिहारमधल्या बक्सरनंतर उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर जिल्ह्यातही गंगा नदीपात्रात अनेक मृतदेह तरंगताना आढळले आहेत. स्थानिकांच्या मते गेल्या दोन-तीन दिवसात दोन डझनहून जास्त मृतदेह आढळून आले. यापैकी काही मृतदेह नदी किनारी तर काही घाटांच्या किनारी आढळले आहेत.
हे मृतदेह कोरोना संक्रमित असल्याची भीती गावकऱ्यांना आहे.
यासंदर्भातली माहिती मिळताच तपासासाठी पथक नियुक्त केल्याचं गाजीपूरचे जिल्हाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "आमचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. तपास सुरू आहे. हे मृतदेह कुठून आले, याचा आम्ही शोध घेत आहोत."
गाजीपूर जिल्ह्यातलं गहमर गाव बिहारच्या बक्सर जिल्ह्याला लागून आहे. गंगा नदी गहमरहूनच बिहारमध्ये प्रवेश करते.
बक्सर जिल्ह्यात मोठ्या संख्येने मृतदेह आढळले त्यावेळीदेखील हे मृतदेह उत्तर प्रदेशातीलच वेगवेगळ्या भागातून वाहून आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
कोव्हिडची लागण आणि इतर प्रकारच्या तापांमुळे गावात अनेकांचा मृत्यू होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
गाजीपूरचे स्थानिक पत्रकार उमेश श्रीवास्तव सांगतात, "कोव्हिडच्या भीतीमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना गंगा नदीत सोडून दिलं जात आहे. आतापर्यंत जे मृतदेह आढळून आलेत ते इथले वाटत नाहीत. मृतदेह खूप खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे ते लांबून वाहून इथे आले असावे, असा अंदाज आहे."
यापूर्वी हमीरपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या यमुना नदीतही बरेच मृतदेह तरंगताना आढळले होते. त्यावेळीही हे मृत्यू कोव्हिड संसर्गाने झाले असावे, अशी शंका वर्तवण्यात आली होती.
मात्र, कोव्हिड संसर्गाने मृत्यू झालेल्यांचे पार्थिव पॅक करून त्यांच्या कुटुंबाला सुपूर्द केले जातात आणि म्हणूनच ते नदीत फेकण्याची शक्यता नाही, असं हमीरपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)