'कोरोना टाळता आला नसता आणि कुंभमेळा देखील,' साथीबाबत संत-महंत काय म्हणत आहेत?

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या महिन्यात हरिद्वारच्या कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी गर्दी जमली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करण्यात आल्यानंतरही अनेक साधूंना कोरोनाची लागण झाली.

ही स्थिती इतकी गंभीर होती की काही आखाड्यांनी अंतिम स्नानाच्या दोन आठवडे आधीच कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याची घोषणा केली. याप्रकारे कुंभमेळ्यातून आखाडे आणि साधू-संतांची घरवापसी सुरू झाली.

पण, कोरोनाची लागण झालेल्या साधूंमध्ये याचा परिणाम नंतरही पाहायला मिळाला. आतापर्यंत अनेक साधूंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

असं असूनही कोरोनाचा प्रसार होण्यास कुंभमेळा कारणीभूत ठरला किंवा कुंभमेळा नसता तर कोरोनाचा संसर्ग इतक्या वेगानं झाला नसता, याविषयी सांधूंना काहीच पश्चात्ताप नाहीये.

दोन दिवसांपूर्वी कुंभमेळ्यातून परतलेले जुना आखाड्याचे साधू प्रज्ञानंद गिरी यांचा मृत्यू झाला आहे.

हरिद्वारहून आल्यानंतर ते वृंदावनमध्ये होते. पण, कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना प्रयागराजमधील स्वरूपरानी नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापूर्वी वेगवेगळ्या आखाड्यांमधील जवळपास 12 साधूंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि हे सगळे साधू हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सहभागी होते.

कुंभमेळ्यात प्रमुख स्नानादरम्यान 13 एप्रिल रोजी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरानामुळे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या आखाड्यांमधील मोठ्या संख्येनं साधूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

काही जणांना आखाड्यातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण काही जणांचा मृत्यू झाला.

कुंभमेळ्यादरम्यान निरंजनी आखाड्याचे महंत आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती आणि तब्येत गंभीर झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.

नरेंद्र गिरी यांची तब्येत आता ठीक आहे, पण कोरोनाची लागण झाल्यामुळे ते त्यावेळी शाही स्नानात सहभागी होऊ शकले नव्हते.

बीबीसीशी बोलताना नरेंद्र गिरी म्हणाले, "कोरोनाची साथ सगळीकडेच पसरत आहे त्यामुळे तो सगळ्यांनाच होत आहे. कुंभमेळा होत आहे की निवडणूक होत आहे, याने काही फरक पडत नाही. जिथं या दोन्ही गोष्टी होत नव्हत्या, तिथं कोरोना पसरला नाही का? आता कोरोना सगळ्यांना होत आहे तर साधू-संतही त्याला अपवाद ठरले नाहीत. पण सरकारनं चांगली व्यवस्था केली होती त्यामुळे सगळ्यांना उपचार मिळाले. आमच्याकडे तर आखाड्यात डॉक्टर उपलब्ध नसतात."

नरेंद्र गिरी स्पष्टपणे सांगतात की, कुंभमेळा रद्द केला असता तरी कोरोना संसर्गाच्या वेगावर त्याचा काही परिणाम पडला नसता. कुंभमेळ्याचा कालावधी कमी करायला नव्हता पाहिजे, असंही ते पुढे म्हणतात.

ते सांगतात, "माझ्यासहित आमच्या आखाड्यातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली होती. 5 साधूंचा मृत्यू झाला. इतर आखाड्यातही अनेक साधूंना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास 10 साधूंचा मृत्यू झाला आहे, इतर सगळे व्यवस्थितपणे परतले आहेत."

महानिर्वाणी आखाड्याच्या अनेक साधूंना कोरोनाची लागण झाली होती. पण आखाड्याचे प्रमुख रामसेवक गिरी याला परमेश्वराची कृपा असं संबोधतात आणि पुढे म्हणतात की, "कोरोनाही टाळता येऊ शकत नव्हता आणि कुंभमेळ्याचं आयोजनही!"

ते पुढे म्हणतात, "संत मंडळी काही बाहेर राहात नाहीत, ते भारतामध्येच राहतात. त्यामुळे जे संकट आलं आहे ते सगळ्यांप्रमाणे त्यांच्यासाठीही आलं आहे. ते काही साधूंना सोडणारं नाहीये. जी परमेश्वराची इच्छा आहे, त्याला थांबवता येऊ शकत नाही. याविषयी जास्त विचार करणं निरर्थक आहे. "

"गंगेच्या मूळ धारेत स्नान केलं असतं तर कुणाला कोरोनाची लागण झाली नसती," असं गिरी सांगतात.

ते म्हणतात, "जिथं भाव आहे तिथं देव आहे. गंगा तर संपुष्टात आली आहे. गंगा आहे कुठे? तिथं तर तुम्ही बांध बांधून धारा रोखली आणि त्याद्वारे मोक्ष मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेवत आहात? गंगेच्या निर्मळ धारेत स्नान केलं असतं सर सगळे आजार पळाले असते आणि पुण्यही मिळालं असतं. आता तर फक्त औपचारिकता निभवायची आहे, परंपरा पुढे न्यायची आहे, अजून काय करू शकतो?"

साधूंचा सगळ्यांत मोठ्या जुना आखाड्यात अनेक साधूंना कोरोनाची लागण झाली होती आणि तिघांचा मृत्यू झाला होता. या आखाड्याचे हरी गिरी महाराज म्हणतात, कोरोनाचं संकट आहे तर ते सगळ्यांवरच येणार आहे. पण काही लोक याचा राजकीय लाभ मिळवायचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणतात, "आम्ही जास्त काही बोललो तर त्याची मजाक उडवली जाईल. पण काही लोक आपापल्या पद्धतीनं कुंभमेळ्यावर टीका करत आहेत, जेणेकरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होईल."

महंत हरि गिरी महाराज पुढे सांगतात, "कोरोनामुळेच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलला. इथेही याचा परिणाम होईल, हे तुम्ही पाहाल. संकट तर तसंही येणारच होतं. पण कुंभमेळा आणि निवडणूक ही कारणं सांगत सरकारला घेरायचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींचा राजकीय परिणाम होईल. केवळ 2022च्या निवडणुकाच नाही, तर त्यानंतरही याचा परिणाम होईल.

"आखाड्यातील साधू-संत सामान्य माणसांपासून दूर, एकटे राहतात. पण, हवेत उडणाऱ्या व्हायरसला कुणी थांबवू शकत नाही. यामुळेच आखाड्यातल्या काही साधूंना कोरोनाची लागण झाली. पण साधूंचा दिनक्रम, जीवनशैली यामुळे त्यांना याचं जास्त नुकसान झालं नाही."

कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला नाही आणि यामुळे साधूंवर त्याचा काही विशेष परिणामही न झाल्याचं काही आखाड्यांच्या महतांचं म्हणणं आहे. दिगंबर आखाड्याचे महंत किशनदास सांगतात की, ते अजूनही हरिद्वारमध्येच आहेत आणि त्यांच्या आखाड्यातल्या एकाही साधूला कोरोनाची लागण झालेली नाहीये.

त्यांच्या मते, "कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रकोप नव्हता. बाहेरून आलेल्या काही लोकांना कोरोनाची लागण झाली असावी. त्यांच्या संपर्कात काही एक-दोन संत आले असतील. आमच्या आखाड्यात कुणाला संसर्ग झालेला नाहीये. अजूनही सगळे साधू इथंच आहेत."

निर्मोही आखाड्याचे प्रमुख राजेंद्र दास हेसुद्धा त्यांच्यापैकी एकाही साधुला कोरोनाची लागण झाल्याचं नाकारतात.

ते म्हणतात, "सगळं काही व्यवस्थित आहे. आखाड्यातले सगळे साधू आमच्यासोबत हरिद्वारमध्येच आहेत. माझ्या आखाड्यात कुणालाच काही झालं नाही."

असं असलं तरी अधिकृत आकडेवारीनुसार, हरिद्वारमध्ये कोरोनाचे एकूण 2,642 रुग्ण आढळले आणि यात अनेक धार्मिक नेते आणि साधू-संतांचा समावेश होता.

कुंभमेळ्यात येऊन गेल्यानंतर कोरोनाची लागण झालेलेही अनेक जण आहेत. यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, नेपाळचे माजी राजा आणि रानी ज्ञानेंद्र शाह आणि कोमल शाह यांचा यात समावेश होतो.

कुंभमेळ्याहून परतल्यानंतर मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचा मृत्यूही झाला.

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात ड्यूटी करत असलेल्या राज्य सरकारच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं होतं की, "आखाडे सोडा, भाविकांची तपासणीही योग्य प्रकारे होत नाहीये. जेव्हा लोक इथून आपल्या गावाकडे परत जातील, तेव्हा मात्र संसर्ग सोबत घेऊन जातील."

या अधिकाऱ्याच्या मते, "आखाड्यांनी त्यांच्या येथील साधूंची कोरोना चाचणी करण्याची परवानगी मोठ्या मुश्किलीनं दिली. तपासणीसाठी साधू लोक तयारच होत नव्हते. पण, जेव्हा महामंडलेश्वर यांचा मृत्यू झाला आणि आखाडा प्रमुखाला कोरोनाची लागण झाली तेव्हा कुठे थोड्या प्रमाणावर तपासणी सुरू झाली."

भाविकांनी दोन दिवसांपूर्वीचा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणावा, असे स्पष्ट निर्देश कुंभमेळ्यादरम्यान देण्यात आले होते. असं असतानाही कुंभमेळ्यात कोरोना संसर्गाची संख्या वाढली आणि त्यानंतर आता उत्तराखंडमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)