You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : राहुल गांधींचा केंद्राला सवाल, 'परदेशी मदत कुठे गेली?' #5मोठ्या बातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
1. परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने भारताने परदेशातून मदत मागवली होती. ती मदत कुठे गेली, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. याशिवाय इतर चार प्रश्नही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.
ट्वीट करून राहुल गांधी म्हणाले, "आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला? त्या गोष्टी कुठे आहेत? त्याचा फायदा कुणाला होत आहे? त्यांचं राज्यांना कशा पद्धतीने वाटप झालं? या सगळ्यात पारदर्शकता का नाही?" ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन
विविध हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे मुंबईत निधन झालं. त्या 47 वर्षांच्या होत्या.
अभिलाषा पाटील यांनी बद्रीनाथ की दुल्हनिया, छिछोरे, गुड न्यूज, मलाल यांच्यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
अभिलाषा या गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या बनारस शहरात एका वेब सिरीजचं शुटींग करत होत्या. पण तिथं त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्या मुंबईत परतल्या. मुंबईत त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण तब्येत आणखी बिघडल्याने अखेर अभिलाषा यांचं निधन झालं. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
3. सुजय विखे पाटील-रेमडेसिवीर खरेदी प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करा, कोर्टाचे आदेश
राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी हवाईमार्गे थेट दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. याप्रकरणी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी विमानतळावर आणला होता. या साठ्याच्या वाटपाबद्दलची माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली होती.
या प्रकरणी औरंगाबाद येथे अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेत डॉ. सुजय विखे यांचावर रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना तसेच अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती करण्यात आली होती. तीच याचिका आज कोर्टाने निकाली काढली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
4. जुने व्हीडिओ दाखवून भाजपचा हिंसाचाराचा बनाव - ममता बॅनर्जी
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार होत असल्याचा भाजपचा आरोप आहे. या मुद्द्यावर दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिलं असून भाजप जुने व्हीडिओ दाखवून हिंसाचाराचा बनाव करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भाजपा जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत.
तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
5. मुंबई इंडियन्स खासगी विमानाने परदेशी खेळाडूंना मायदेशी सोडणार
मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच परदेशी खेळाडू होते. या सर्व खेळाडूंना आपल्या मायदेशी पोहोचवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघ मदत करणार आहे.
परदेशी खेळाडूंना आता मुंबई इंडियन्स संघाच्या आपल्या खासगी चार्टड विमानांमधून मायदेशी सोडण्यात येणार आहे.
या संघात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशांचे खेळाडू आहेत.
या देशातील इतर संघांतील खेळाडूंनाही मुंबई इंडियन्सने मदत देऊ केली आहे. सर्वांना एकाच विमानात बसवून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)