नाशिक ऑक्सिजन गळती: अपघात की 'खून' यावरून सुरू झालं राजकारण ?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरवर एकूण 131 रुग्ण होते. त्यापैकी 22 रुग्ण ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यामुळे दगावले.

रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात मोठा आक्रोश होताना दिसतोय. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आणि मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली.

ऑक्सिजन टाकीतून गळती झाली. ऑक्सिजनवर आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचं ऑक्सिजन प्रेशर कमी झालं आणि 22 जणांचा मृत्यू झाला. ही बाब तांत्रिक असल्याचं सांगितलं जात असलं तरी या घटनेला जबाबदार कोण? या मुद्यांवरून आता राजकारण पेटताना दिसतय.

"ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करा" ...!

एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन गळतीच्या घटना घडून रुग्णांचे मृत्यू होण्याच्या घटना घडतायेत. हा ठाकरे सरकारचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणतात, "ही घटना ठाकरे सरकारचा हलगर्जीपणा आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेली कोव्हिड हत्या आहे."

सोमय्या यांनी ट्विटरवर ऑक्सिजन पुरवठ्यामधल्या त्रुटींवरून राजेश टोपे यांना लक्ष्य केलंय. ते म्हणतात, "नाशिकला 22 कोव्हिड रुग्णांचे मृत्यू, 12 एप्रिल नालासोपारा येथे 62 मृत्यू, 10 एप्रिल ठाणे येथे 26 रुग्णांचा जीव धोक्यात, 19 एप्रिल मुंबई येथे 163 रुग्णांना दुसरीकडे हलवलं. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जबाबदारी स्वीकारणार का?"

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात, "नाशिकची ही घटना अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही आठवी घटना आहे. कुठे शॉर्ट सर्कीटमुळे लहान मुलं दगावतात. तर कुठे कोव्हिड रूग्ण दगावतात. आता ऑक्सिजनची गळती होऊन मृत्यू होतात. याची चौकशी करण्यात आली पण, कारवाईचा पत्ता नाही."

महाविकास आघाडीचं प्रत्युत्तर?

नाशिक झाकिर हुसैन रुग्णालय हे नाशिक महापालिकेचं जुनं रुग्णालय आहे. नाशिक महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांना प्रत्युत्तर द्यायला पुढे आले.

नाशिक महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर म्हणतात, "प्रशासन काम करत असलं तरी नाशिक महापालिकेतील सत्ताधारी काम करताना दिसत नाहीयेत. या घटनेची जबाबदारी महापौरांनी घ्यावी." तर नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी "दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी केली आहे."

शिवसेनेच्या मागणीनंतर राष्ट्रवादीनेही या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "या रुग्णालयाची क्षमता 150 रुग्णांची क्षमता असताना या रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

ते पुढे म्हणतात, " 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते तर 15 जण व्हेंटिलेटरवर होते. सध्या 63 जणांची स्थिती अतिशय नाजूक आहे." त्यामुळे ही दुर्घटना कशी घडली याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. या तर्कवितर्कांमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना बघायला मिळतोय.

राजकारणी सजगता कधी दाखवणार?

नाशिक दुर्घटनेची राज्य सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एक डॉक्टर यांचा समावेश आहे. याची चौकशी होऊन दोषी समोर येतील. पण कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सुरू असलेलं राजकारण कधी थांबणार?

ज्येष्ठ पत्रकार दिप्ती राऊत सांगतात, "ही घटना खूप मोठी आहे. ऑक्सिजनच्या या यंत्रणेवर इतक्या लोकांचे जीव अवलंबून आहेत. त्या यंत्रणेची जबाबदारी काही तांत्रिक कर्मचार्‍यांवर कशी सोपवून दिली जाऊ शकते? याला जबाबदार कोण आहे? इतक्या दिवसांत, ही गळती कुठून होऊ शकते? काही अपघात होऊ शकतो का? या शक्यता पडताळल्या गेल्या नाहीत?"

अनेक रुग्णांना दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळणार होता. त्यांचेही जीव गेले. यात मायक्रो लेव्हलचं काम करणं गरजेचं होतं. पण प्रशासन आणि त्यांना चालवणारे राजकारणी हे आरोप प्रत्यारोपात व्यस्त आहेत. सध्याच्या परिस्थितीत राजकारण थांबवून जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. ती जबाबदारी घेण्याची सजगता हे राजकारणी कधी दाखवणार कोण जाणे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात येत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)