You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना : 'आमचा पेशंट तर जिवंत करून देणार नाही, मग त्यांच्या मृत्यूची जबाबदारी तरी घ्या'
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"काय मागणी करणार आम्ही? आमचा पेशंट तर जिवंत करून देणार नाही कोणी? आमची एकच मागणी आहे की आमचे पेशंट गेले आहेत, याची जबाबदारी घ्या कोणीतरी," नाशिकमधल्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या बाहेर विकी जाधव बोलत होते.
त्यांच्या आजीचा, सुगंधा थोरात यांचा नाशिकमधल्या झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीनंतर मृत्यू झालेला आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
"काल रात्रीपासून इथे ऑक्सिजनची कमतरता होती. आज सकाळी मी तिच्यासाठी सूप आणायला गेलो. तर त्यांचा (हॉस्पिटलचा) मला 9-9.30 वाजता फोन आला की तुमच्या पेशंटची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे. मी धावतपळत पुन्हा इथे आलो. आजीची ऑक्सिजन लेव्हल डायरेक्ट 38 झाली होती. तिला दिला जाणाऱ्या O-2 ची लेव्हल डायरेक्ट शून्य झाली होती," जाधव सांगतात.
"मी त्यांना म्हटलं अहो टाकी बदला. तर ते म्हणे टाकी आमच्याकडे शिल्लक नाही. मी खाली येऊन त्या डॉक्टर मॅडमला विचारलं, म्हटलं मॅडम O-2 नाहीये, त्यामुळे आमच्या पेशंटची क्रिटिकल कंडिशन झालेली आहे. तर त्या म्हणाल्या की ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये शिल्लक नाहीये. ऑक्सिजन शून्य झालेला आहे.
"खरं सांगायचं तर काल रात्रीपासून यांच्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. सकाळी चौकशी केली आणि मोजून पाच दहा मिनिटांत कळालं की इथे ऑक्सिजन लीक झालेला आहे. मी सांगतो जवळपास 50 पेशंट तरी इथे गेले असणार आहेत," विकी एका दमात सांगतात.
ही बातमी लिहित असताना एका मित्राचा फोन आला आणि म्हणाला, "अगं परिक्षितीचा भाऊ गेला. कोरोनाने नाही, ऑक्सिजन बंद पडल्याने."
आपल्या ओळखीतल्या कोणीतरी अशा दुर्घटनेत गेलं हे कळालं की काय करावं?
आमच्या ओळखीतला अजून एक जण, प्रकाश कांबळे तिथे होते. त्यांना विचारलं नक्की काय झालं, तर ते म्हणाले, "प्रमोद (वाळूकर) गेल्या 10 दिवसांपासून तिथे अॅडमिट होते. त्यांची आई पण अॅडमिट होती. परवा त्यांना डिस्चार्ज मिळणार होता आणि आज असं झालं. सकाळी 6 पासून थोडी थोडी गळती होत होती. पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही."
आता दुपारी झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये शोकमग्न वातावरण आहे, लोक हॉस्पिटल तसंच प्रशासनावर चिडलेत. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये जी ऑक्सिजनची सेंट्रलाईज टाकी होती, ती लिक झाली. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रेशर एकदमच कमी झालं. त्यामुळे व्हेंटिलेटरवर जितके लोक होते त्यांना ऑक्सिजन मिळणं बंद झालं. यामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला आहे."
ती टाकी अर्ध्या तासात सुरू झाली. आता त्याच टाकीने सप्लाय होतोय असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.
टेक्निकल इंजिनियर पाठवून लिकेज थांबवलंय. 25 टक्के ऑक्सिजन शिल्लक आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे 22 लोक दगावले आहेत. ऑक्सिजनवरच्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालतं. पण व्हेंटिलेटरवर असलेल्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालत नाही. चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं आहे.
हा तांत्रिक विषय आहे. एका ठिकाणहून लीक झालं, त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि अपघात झाला. आता वेल्डिंग करत आहोत. हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. मी डॉक्टर आहे, मला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशी प्रतिक्रिया झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी दिली.
रुग्णालय परिसरात नातेवाईंकांचा आक्रोश
रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहेत. दोन तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमच्या कुटुंबीयांना प्राण गमवावे लागले असं त्या परिसरातील नातेवाईक म्हणत आहेत.
अमोल व्यवहारे यांची आजी लीला शेलार ( वय - 60 वर्षं) याचं या घटनेत निधन झालं. ऑक्सिजनअभावी आजीचा मृत्यू झाला असं व्यवहारे यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)