You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला: 'सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही - अजित पवार
राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणं हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
बुधवारी (14 एप्रिल) पंढरपूर येथील प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केलं.
"तुम्ही मला एक आमदार दिला की राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा," असं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात बोलताना म्हणाले होते.
या वक्तव्याचा समाचार घेत अजित पवार म्हणाले, "राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?"
"आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कुणी करू नये. हे सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही," असंही ते पुढे म्हणाले.
2. बेळगावसंदर्भात नेहरूंनी केलेली चूक मोदींनी दुरुस्त करावी - संजय राऊत
काश्मीरमध्ये जवाहरलाल नेहरूंनी कलम 370 लावलं होतं. ती चूक तुम्ही दुरुस्त केली. त्याचप्रमाणे बेळगावच्या सीमाप्रश्नी काँग्रेसने आणि जवाहरलाल नेहरूंनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरुस्त करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
बेळगाव लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते.
"बेळगावात कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकातील महाराष्ट्र एकीकरण समितीचं व्यासपीठ तोडण्यात आलं. गोळ्या चालवल्या तरी सभा होईल," असं राऊत म्हणाले.
"माझं आणि कर्नाटक सरकारचं काहीच भांडण नाही. तुम्ही न्यायाची बाजू घेत असाल तर मराठी जनतेचं आणि मराठी अस्मितेचं हे विराट दर्शन पाहा," असं राऊत यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.
3. 'संस्कृतला अधिकृत भाषा बनवण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव होता'
संस्कृत भाषेला भारताची अधिकृत भाषा बनवण्याचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला होता, पण या प्रस्तावाचं पुढे काहीच होऊ शकलं नाही, असा दावा भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केला आहे. ही बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नागपूर येथील 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे बोलत होते.
"मराठी बोलावं की इंग्रजी बोलावं या संभ्रमात मी नेहमीच असतो. देशात अशी संभ्रमावस्था गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. कोर्टाचं कामकाज कोणत्या भाषेत चालावं, हा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जातो. हायकोर्टात इंग्रजी आणि हिंदीत कामकाज चालतं.
"काही प्रमाणात तामिळ आणि तेलुगू भाषेत कामकाज व्हावं, असं काहींना वाटतं. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक प्रस्ताव तयार केला होता, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. हा प्रस्ताव मांडण्यात आला की नाही, हे मला माहीत नाही. पण भारताची अधिकृत भाषा संस्कृत असावी, असा तो प्रस्ताव होता,"असं सरन्यायाधीश म्हणाले.
"तामिळ भाषा उत्तरेकडे स्वीकारली जाणार नाही. तर दक्षिण भारतात हिंदी स्वीकारली जाणार नाही, त्यामुळे दोन्ही ठिकाणी स्वीकारली जाईल अशी संस्कृत भाषा अधिकृत भाषा करण्याचा त्यांचा विचार होता. पण हा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला नाही," असंही बोबडे यांनी सांगितलं.
4. लॉकडाऊन झालं तरी रेल्वे बंद होणार नाही - मध्य रेल्वे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पण राज्यांमध्ये लॉकडाऊन झालं तरी सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे नियोजित वेळेनुसार धावतील, असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलं आहे.
राज्यात लॉकडाऊनची घोषणा होण्याची चाहूल लागल्यापासूनच मुंबईच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची गर्दी उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
पण लॉकडाऊन लागला असला तरी लोकांनी घाबरू नये. लोकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये, असं आवाहन
सध्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून विशेष रेल्वे देशात धावत आहेत. या नियोजित वेळेनुसार धावतील. लोकांना फक्त कन्फर्म तिकीट असेल तरच रेल्वेत प्रवेश मिळेल, असं सुतार म्हणाले. ही बातमी दैनिक जागरणने दिली आहे.
5. पोलिसांच्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सलून दुकान उघडता येणार नाही. पण औरंगाबाद येथे एका सलून व्यावसायिकाने दुकान उघडल्याने त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
औरंगाबाद येथील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. फिरोज खान असं मृत सलून व्यावसायिकाचं नाव आहे.
त्यांनी बुधवारी (14 एप्रिल) सकाळी आपलं सलून दुकान उघडलं होतं. याची माहिती पोलिसांना मिळताच दोन पोलीस कर्मचारी त्याठिकाणी गेले. त्यांनी फिरोज यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप परिसरातील नागरिक आणि कुटुंबीयांनी केला आहे.
यानंतर नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह घेऊन ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)