You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: कोरोनाच्या साथीतही मुंबईत आयपीएलच्या मॅचेस होणार?
मुंबई शहरात दररोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि वानखेडे स्टेडियमशी निगडीत ग्राऊंडस्टाफपैकी आठजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबईत आयपीएलच्या मॅच होणार का? याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान यासंदर्भात बीसीसीआय, आयपीएल प्रशासन, मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी माहिती दिलेली नाही. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात बातमी दिली आहे.
गेल्या वर्षी कोरोना तसंच लॉकडाऊन आयपीएलचा तेरावा हंगाम पुढे ढकलण्यात आला होता. दुबईत ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात तेरावा हंगाम पार पडला.
यंदाच्या स्पर्धेवरही कोरोनाचं सावट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे.
एकटया मुंबईत दररोज 8,000 पेशंट्स आढळत आहेत. डॉक्टर, नर्सेस, अम्ब्युलन्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्यावर प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत आयपीएल मॅचेस खेळवण्यात येणार का? हा प्रश्नच आहे.
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातले अशा 10 मॅचेस होणार आहेत. 10 ते 25 एप्रिल या कालावधीत मॅचेस होणार आहेत.
सर्व मॅचेस न्यूट्रल ठिकाणी होणार असल्याने मुंबई इंडियन्सचा संघ यंदा मुंबईत खेळणार नाही. बाकी संघांचे सामने मुंबईत आहेत.
सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अंपायर्स, मॅचरेफरी, प्रशासकीय अधिकारी, फ्रँचाईज कर्मचारी हे सगळे बायोबबलमध्ये आहेत. त्यांच्यासाठी कठोर अशी नियमावली आहे. त्या नियमावलीचं पालन करणं अनिवार्य आहे. गेल्या वर्षी दुबईत अशा पद्धतीने स्पर्धेचं यशस्वी आयोजन झालं होतं. मात्र भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आयोजनावर शंकाकुशंकाचे ढग जमा झाले आहेत.
वानखेडे स्टेडियमशी निगडीत ग्राऊंडस्टाफपैकी आठजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबईत शुक्रवारी 8,832 कोरोना रुग्ण आढळले होते. सलग दुसऱ्या दिवशी शहरात 8,000 पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री नागरिकांशी संवाद साधला होता. दोन दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
याआधी राज्याच्या विविध भागात जिथे मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत तिथे लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन सदृश कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नितीश राणाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. गोव्याहून संघात दाखल झाल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं. त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो कोलकाता संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला आहे.
काही दिवसांपूर्वी इंग्लंड संघाचा भारत दौरा आटोपला. या दौऱ्यातील मॅचेस चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे इथे खेळवण्यात आल्या. चेन्नईत आणि अहमदाबादला मैदानाच्या पन्नास टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रिकाम्या स्टेडियममध्येच मॅचेस खेळवण्यात आल्या.
आयपीएलचं आयोजन मुंबईत करणं धोक्याचं ठरू शकतं, असं ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी सांगितलं. ते म्हणाले, "रोम जळत असताना नीरो राजा फिडल वाजवत बसला होता, अशी दंतकथा आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईत मॅचेस झाल्या, तर त्याचीच पुन्हा आठवण होईल. आपल्याला एक ठरवावं लागेल, क्रिकेट महत्त्वाचं की कोव्हिडपासून संरक्षण महत्त्वाचं. मुंबईत साथीचा जोर कमी झालेला असतानाही रणजी ट्रॉफी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाकीचे अनेक देशांतर्गत सामने रद्द झाले. पण आयपीएलमधून मिळणारा नफा पाहता, कोणी तसा (रद्द करण्याचा) निर्णय घेणार नाही".
"लोकांना सांगणार सगळं बंद करा आणि मॅचेस खेळवणार, हा दुटप्पीपणा झाला. मुंबईत परिस्थिती अशी बिकट असताना हे सामने दुसरीकडे हलवता येऊ शकतात", असं ते म्हणाले.
दरम्यान मुंबईत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातील अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट होतं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात बातमी दिली आहे. मात्र आयपीएल, बीसीसीआय, दिल्ली कॅपिटल्स संघव्यवस्थापन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
डावखुरा फिरकीपटू आणि उपयुक्त फलंदाजी करणारा अक्षर दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)