पश्चिम बंगालः असदुद्दीन ओवेसी यांना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

ओवेसी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, सागरदिघी, पश्चिम बंगालमधून

27 मार्चची सकाळ... वेळ 5 वाजून 45 मिनिटं. हावडा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सहावर अचानकपणे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं आगमन झालं.

प्लॅटफॉर्मवर काही मुस्लीम युवक पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. प्लॅटफॉर्मवर घोषणा दिल्या जात होत्या- 'देखो-देखो कौन आया, शेर आया, शेर आया.'

ओवेसी हावड्यावरून मुर्शिदाबादला जाणाऱ्या गणदेवता एक्सप्रेस या ट्रेनच्या सी-1 कोचमध्ये जाऊन बसले. ट्रेन सहा वाजता सुटली. त्याच कोचमध्ये ओवेसी यांचे अनेक समर्थकही होते. एकजण तर त्या संपूर्ण प्रवासात ओवैसी यांच्या शेजारी काही न बोलता शांतपणे बसून होता.

थोड्या वेळाने ओवेसी यांनी मोबाइलवर कुराण पठण करायला सुरूवात केली. जवळपास 40 मिनिटं ते कुराण वाचत होते. ओवैसी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पहिल्यांदा सभा करण्यासाठी मुर्शिदाबादहून सागरदिघीला चालले होते.

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

कुराण पठणानंतर त्यांनी सभेतील भाषणाची तयारी केली. वेगवेगळी आकडेवारी काढली. वाचता-वाचता कागदांवर मुद्दे अधोरेखित केले.

'शेर आया, शेर आया'

दरम्यान, मधूनच त्यांचे समर्थक येत होते आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेत होते. 11 वाजण्याच्या सुमारास ट्रेन सागरदिघी इथं पोहोचली. ओवेसी यांची वाट पाहत स्टेशनवर काही तरूण थांबले होते. ओवेसी खाली उतरताच त्यांनी घोषणा द्यायला सुरूवात केली- 'देखो-देखो कौन आया, शेर आया, शेर आया. हैदराबाद का शेर आया, शेर-ए-हिन्दुस्तान ज़िंदाबाद.'

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

स्टेशनवरून ओवेसी आपल्या समर्थकांसह थेट हॉटेलवर गेले आणि अडीचच्या सुमारास स्टेशन जवळ असलेल्या सुरेंद्र नारायण हायस्कूलच्या मैदानावर उभ्या केलेल्या व्यासपीठावर आले.

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

पुन्हा एकदा तीच घोषणा दिली गेली- 'हैदराबाद का शेर आया, शेर-ए-हिन्दुस्तान ज़िंदाबाद.' मैदानात 10 हजारापर्यंत लोक बसू शकतात. पण मैदान पूर्ण भरलेलं नव्हतं.

ओवेसी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केलं की, त्यांचा पक्ष दोनच जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांच्या या घोषणेचंही जमलेल्या गर्दीनं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

ओवेसी

फोटो स्रोत, Getty Images

बंगालमध्ये बंगाली भाषा न येणारे जे नेते सभा घेत आहेत, लोकांना संबोधित करत आहेत, त्यांच्यासाठी भाषा एक अडचण ठरत आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना हिंदी किंवा उर्दू समजत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष पण ही गोष्ट मान्य करतात की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेव्हा हिंदीमध्ये भाषण देतात, तेव्हा 20 टक्के लोकांनाच ते समजतं.

'मुसलमानांनो, तुम्ही गाय आहात का?'

ओवेसी आपल्या सभेत ममता बॅनर्जी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा हवाला देत म्हणतात, ''जेव्हा भाजपने 2019 मध्ये 18 जागांवर विजय मिळविला, तेव्हा मीडियानं ममता बॅनर्जींना मुसलमानांनी मतदान केलं नाही का? असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना ममता यांनी म्हटलं की, गाय दूध देते, तेव्हा लाथही मारतेच. मुसलमानांनो, तुम्ही गाय आहात का? मला आज या प्रश्नाचं उत्तर द्या. मग ममता बॅनर्जींनी असं का म्हटलं?''

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ट्रेनमध्ये ओवेसी यांनी केलेली भाषणाची तयारी स्पष्टपणे दिसून येत होती. ओवेसी मुसलमानांच्या स्थितीवर प्रसिद्ध झालेल्या अनेक अहवालांचा दाखला देत होते. मुसलमान नोकरी, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत अजूनही कसे मागास राहिले आहेत याची आकडेवारी सांगत होते.

लोकसंख्येत मुसलमानांची संख्या 30 टक्के असेल तर त्याहिशोबाने विधानसभेत किमान 100 आमदार हवे होते. पण असं का झालं नाही? असा प्रश्नही ओवेसी विचारतात. ममतांनी 40 जणांना आमदार बनवलं, तरी सभागृहात ते मूग गिळूनच बसतील. पण त्यांचे दोनच आमदार सिंहाप्रमाणे गर्जना करतील, असंही आश्वासन त्यांनी दिलं.

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

सभा संपल्यानंतर ओवेसी त्याच ट्रेननं कोलकात्याला निघून गेले. याच प्रवासादरम्यान त्यांनी बीबीसी हिंदीसोबत बंगालची निवडणूक आणि मुस्लिमांची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा केली. तुम्ही सामान्य नागरिकांप्रमाणे ट्रेननं का जात आहात, हाच प्रश्न आम्ही पहिल्यांदा विचारला.

ओवेसी यांनी म्हटलं,'' त्यात काय हरकत आहे? नेत्यांनी ट्रेननं जायला हवं. लोक त्यांच्याकडे 'लार्जर दॅन लाइफ' दृष्टिनं पाहतात. तसं नसायला हवं. यात काहीच चुकीचं नाही. जर चॉपरची गरज भासली, तर चॉपरचा वापर करू.''

ओवेसी स्वतःला सिंह समजतात?

तुमचे समर्थक तुम्हाला सिंह म्हणत आहेत. तुम्ही पण स्वतःला सिंहच समजता का? त्यावर ओवेसींनी म्हटलं,''मी त्यांना घोषणाबाजी करू नका म्हणून अडवलं होतं. कारण हे रेल्वे स्टेशन आहे. पण राजकारणात सामान्य लोकांच्याही भावना असतात. प्रेमानं, भावनेच्या भरात कधीकधी जास्त बोलून जातात, विशेषणं लावतात. भाई, मी पण माणूसच आहे ना. हे लोकांचं प्रेम आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.''

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

सिंह हे रुपक आहे का? की याचाही काही वेगळा संदर्भ आहे? आपल्यासाठी प्रत्येक परिस्थितीत पाय रोवून उभा राहणारा नेता हवा, अशी तुमच्या समर्थकांची भावना आहे का?

या प्रश्नाचं उत्तर देताना ओवेसी म्हणाले, ''मी माझा पक्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक कमकुवत आहेत, विशेषतः मुसलमान, ज्यांना राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलंय त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत, हाच माझा प्रयत्न आहे. मला तशी संधी मिळाली आहे आणि मी त्यादृष्टिनं प्रयत्न करत आहे.''

एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही त्यांचे समर्थक 'सिंह' म्हणायचे. आता हेच रुपक तुमच्याबद्दल वापरलं जातंय का? ओवेसी यांनी म्हटलं, ''तुम्ही ही गोष्ट खूपच ताणत आहात. राजकारणात अशी घोषणाबाजी होत असते. मी लोकांच्या प्रेमाची कदर करतो. अशा घोषणा देऊ नका म्हणून मी अडवलंही होतं. पक्ष महत्त्वाचा आहे, व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पण तरीही आम्ही कितीही अडवलं तरी हे लोकांचं प्रेम आहे.''

'ममता बॅनर्जींनी मोदींचं अभिनंदन केलं होतं'

पश्चिम बंगाल भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जनाब अली हुसैन यांना विचारलं की, बंगालमधले मुस्लीम तरुण असदुद्दीन ओवेसींना सिंह का म्हणत आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना हुसैन यांनी म्हटलं की, ओवैसी हा एक सांप्रदायिक चेहरा आहे. ते धर्माच्या आधारे फुटीरतावादी धोरण अवलंबत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे धर्मनिरपेक्ष राजकारण करत असल्याचंही हुसैन यांना वाटतं.

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

पश्चिम बंगालमध्ये भाजप मजबूत स्थितीत पोहोचण्याचं नेमकं कारण काय आहे? असं काय झालं की भाजपची वाटचाल सत्तेच्या दिशेनं होताना दिसत आहे?

या प्रश्नाचं उत्तर देताना ओवेसी यांनी म्हटलं,''भाजप आणि आरएसएसच्या वाढीत अनेकांनी भूमिका बजावली आहे. यामध्ये ममता यांचाही हातभार होताच. जेव्हा गुजरात जळत होता, तेव्हा ममता भाजपसोबतच होत्या. भाजप ज्या राज्यांमध्ये मजबूत बनत गेली, तिथे कथित धर्मनिरपेक्ष पक्षांची भूमिका महत्त्वाची राहिली...मग ते आसाम, बिहार, तेलंगणा असो की कर्नाटक. प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर दिसेल की, ओपनिंग देण्याचं काम तथाकथित सेक्युलर पक्षांनीच केलं आहे."

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

"युपीमध्ये पाहा ना. तिथे सपा आणि बसपा सोबत होते. भाजपनं बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पूर्णपणे संपवून टाकलं. भाजपकडून जेव्हा हे पक्ष हरायला लागतात आणि आम्ही निवडणुका लढवायला येतो, तेव्हा पराभवाची जबाबदारी आमच्यावर ढकलली जाते."

ओवेसी सांगतात,"तुमच्या चुकांमुळेच भाजपची आगेकूच होत आहे आणि पराभवाचं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय? ते आम्हाला जणू अस्पृश्य मानतात, पण भाजपशी आघाडी करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. 2002 साली ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं.''

ओवेसी कितीकाळ राजकीयदृष्ट्या 'अस्पृश्य' राहणार?

कोलकाता रिसर्च ग्रुप पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सर्वेक्षण आणि रिसर्च करत आहे.

ओवेसी

फोटो स्रोत, Getty Images

संशोधक प्रियंकर डे म्हणतात, ''ओवेसी यांचा प्रश्न अतिशय योग्य आहे. जर तुम्ही भाजपसोबत आघाडी करू शकता आणि ओवैसींना अस्पृश्य मानता तर तुमच्या राजकारणात काहीतरी समस्या नक्की आहे. इतर पक्षांना वाटतं की, ओवैसी यांच्यासोबत आघाडी केल्याने त्यांचं महत्त्व अधिक वाढेल. पण माझ्यामते आता त्यांना दीर्घकाळ थोपवून धरता येणार नाही."

''मला वाटतं की, येत्या काही वर्षांत फुरफुरा शरीफचे अब्बास सिद्दीकी हे मुसलमानांचे मोठे नेते बनून पुढे येतील आणि ममता यांच्यासाठी मुसलमानांची मतं मिळवणं अवघड होत जाईल.''

प्रियंकर डे सांगतात की, बंगालमध्ये जाती आणि धर्माच्या आधारे नेतृत्व आणि प्रतिनिधीत्वाची चर्चा व्हायची नाही. मात्र भाजपच्या आगमनानंतर ती व्हायला लागली. प्रियंकर यांच्या मते, अशाप्रकारच्या राजकारणाच्या निशाण्यावर टीएमसी, काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत.

बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेससारखे पक्ष ओवेसी यांची उपेक्षा अजून किती काळ करणार? गेल्या विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाला बिहारमध्ये पाच जागांवर विजय मिळाला. इतर ठिकाणी त्यांचंही बरंच नुकसान झालं. पण येत्या काळात आरजेडी किंवा काँग्रेस ओवेसींना 'अस्पृश्य' समजणार?

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

ओवेसी म्हणतात, ''बिहारमध्ये आजही आरजेडीचे नेते गर्वात वावरत आहेत. बिहार विधानसभेत उपसभापती पदासाठी निवडणूक झाली आणि त्यांनी आमच्या पक्षाचे गटनेते आणि प्रदेशाध्यक्ष अख्तरूल ईमान यांच्याशी संवादही साधला नाही. तुम्ही त्यांना विचारतही नाही. या निवडणुकीत मदत करा, असं तुम्ही म्हणू शकत नव्हता? ज्यांना पोटदुखी आहे, त्यांनी औषध मागायला हवं ना?''

जर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सरकार स्थापनेसाठी काही आमदारांची मदत लागली तर ओवेसी त्यांना समर्थन देतील? या प्रश्नाचं उत्तर देताना ओवैसी म्हणतात, ''ममता बॅनर्जी तर मला गद्दार म्हणत आहेत. मी पैसे घेऊन येतो, एजंट आहे असंही म्हणतात. भविष्यात काय होईल हे आताच सांगता येणार नाही. आम्हाला आमच्या पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यायचा आहे.''

ओवेसी यांच्या विधानांमध्ये विरोधाभास?

ओवेसी यांनी आपल्या सभेतील भाषणादरम्यान म्हटलं की, 'ममता मला तुमच्याकडून संरक्षण नको आहे. माझ्यासाठी अल्लाहच पुरेसा आहे. तोच मला संरक्षण देईल.' मात्र दुसरीकडे ओवेसी गरीबी, शिक्षणाचा अभाव आणि प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ममता यांच्यावर टीका करत आहेत. ओवेसी यांच्या विधानांमध्ये विरोधाभास नाहीये का?

पश्चिम बंगालः ओवेसींना काही मुस्लीम तरुण 'हिरो' का मानतात?

फोटो स्रोत, ANI

या प्रश्नाचं उत्तर देताना ओवेसी सांगतात, ''आपल्या नागरिकांचं रक्षण करणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्यच असतं. तुम्ही कोणावरही उपकार करत नाहीये. पण मी तुमचं संरक्षण करतोय असं जर तुम्ही लोकांवर बिंबवू लागला तर ते चुकीचं आहे. तुम्ही असं काय संरक्षण दिलं आहे? हे तुमचं घटनात्मक कर्तव्य आहे, ज्यामध्ये तुम्ही अपयशी ठरता."

''मुसलमानांना तुरुंगात डांबलं जात आहे. शालेय शिक्षणात मुसलमान मागे पडत आहेत. मुर्शिदाबादमध्ये पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण वाढलेलं आहे. इथे कोणतंही विद्यापीठ नाहीये. त्यामुळेच मी म्हटलं होतं की, संरक्षणाच्या गप्पा करणं सोडा, किमान आम्हाला न्याय तरी मिळवून द्या. जेव्हा तुम्ही न्याय कराल, तेव्हा आम्हाला सुरक्षा मिळेल. ममता सभांमध्ये सांगतात की, त्या हिंदू ब्राह्मण आहेत. तुम्ही यातून 27 टक्के लोकसंख्येला नेमका कोणता संदेश देत आहात?''

कुराण आणि चंडीपाठ

पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. योगी यांच्या सभा पाहिल्या की मुसलमान व्यक्ती त्यांच्या सभेत का येईल असं वाटतं.

योगी यांच्या सभांमध्ये मुसलमानांबद्दल कधीच बोललं जात नाही आणि जेव्हा बोललं जातं तेव्हा बांगलादेशी घुसखोर आणि पाकिस्तानी म्हणून. ओवेसी यांच्या सभांमध्येही कुराणातील वचनं, इस्लाममधील घोषणा आणि एकाच समुदायाबद्दल बोललं जातं. अशापरिस्थितीत कोणताही मुसलमान योगी यांच्या सभांना का जाईल आणि एखादी हिंदू व्यक्ती स्वतःला ओवैसींसोबत कसं जोडून घेईल?

याचं उत्तर देताना ओवेसी म्हणतात,''आता माझ्या सीटवर बाजूला बसलेली व्यक्ती कोण होती? तो मुसलमान होता का? ममता बॅनर्जी जर चंडी पाठ करू शकतात, तर मी कुराणातील वचनं का नाही वाचू शकत? योगी आदित्यनाथ एका सर्वसमावेशक भारताबद्दल बोलत नाहीत, ते एकांगी बोलतात. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सर्वांसमोर आहे. धर्मनिरपेक्षतेमुळेच भारताला जगात त्याचं योग्य स्थान मिळत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं."

''मी तर सरकारसमोर आकडेवारी देऊन समानतेबद्दल बोलत आहे. लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही, तर प्रतिनिधीत्व देण्यासाठीही आहे. जर तुम्ही भाजपपासून आम्हाला वाचविण्याच्या आणि आमच्या प्रगतीच्या गप्पा करत असाल, तर तुम्ही चूक आहात. प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ आहे, तर मुर्शिदाबादमध्ये का नाही. सीएए आणला गेला तेव्हा ममता यांचे खासदार सभागृहातून गायब होते.''

ओवेसींवर त्यांचे विरोधक उजव्या विचारधारेचं राजकारण करत असल्याचा आरोप करतात, तर काहीजणांच्या मते ते अल्पसंख्यांकांमधील असुरक्षिततेच्या भावनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.

ओवेसी यांच्या सभांमध्ये तरुण मोठ्या संख्येनं दिसतात. महिला आणि ज्येष्ठ नागरिक का दिसत नाहीत? ओवेसी सांगतात, ''येणारा काळ हा तरुणांचा आहे. भविष्यासाठी नवीन राजकीय नेतृत्व तयार करण्याची गरज त्यांना वाटत आहे. त्यांच्या भविष्याचा निर्णय दुसऱ्या कोणी घेणं त्यांना पसंत नाही. आम्ही ज्येष्ठांनाही आणण्याचा प्रयत्न करू. दुपारची वेळ असल्याने महिला फारशा आल्या नाहीत.''

ओवेसी यांच्याकडे मुस्लिम तरुणांचा ओढा का?

ओवेसी यांच्याकडे मुस्लिम तरुणांचा ओढा का? या प्रश्नाचं उत्तर देताना सागरदिघीमधील मुस्लिम तरुणांनी म्हटलं की, एकच असा नेता आहे, जो संसदेत एखाद्या सिंहाप्रमाणे बोलतो. नाहीतर इतर कोणी बोलतही नाही.

आसिफ शेख नावाच्या एका तरुणानं म्हटलं, ''मोदींच्या नेतृत्वाखाली एकीकडे भाजपच्या जवळ जाण्यासाठी सगळे धडपडत आहेत. कथित धर्मनिरपेक्ष पक्षांवर दबाव आहे, तेव्हा ओवेसी साहेब हे आमच्यासाठी आशेचा एकमेक किरण आहेत. या भीतीच्या वातावरणात जर कोणी धाडसाने संसदेत बोलत असेल, तर ते आमचे ओवैसी साहेब आहेत. अल्लाह त्यांची भरभराट करो.''

मुस्लिम तरुणांच्या या प्रेमाबद्दल ओवेसी म्हणतात की, मी कोणतंही मोठं काम करत नाहीये. संसदेत जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलणं हेच खासदाराचं काम आहे. यात काही खूप मोठी गोष्ट नाहीये.

ओवेसी भाजपच्या चढत्या भाजणीसाठी काँग्रेसला जबाबदार धरतात. ते म्हणतात, ''काँग्रेस आणि सीपीएमची मतं पूर्णपणे भाजपकडे वळली आहेत. पण तरीही त्यांना वाटतं की, ते माझ्यामुळे हरतील. ममता बॅनर्जी आजही तेच म्हणत आहेत. त्या स्वतःला हिंदू ब्राह्मण म्हणवून घेत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

''हे आपल्या जातीय वर्चस्वाचं जाहीर प्रदर्शन आहे. आता आपण लोक निर्वाचित हुकूमशाहीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. दिल्लीपासून अगदी चेन्नईपर्यंत धर्माच्या आधारे ध्रुवीकरण केलं जात आहे. कमलनाथ यांनी राम मंदिराला चांदीच्या विटा देऊ, असं विधान केलं. प्रियंका गांधींनी राम मंदिराच्या निर्णयाचं स्वागत केलं.''

राहुल गांधींबद्दल बोलताना ओवेसींनी म्हटलं, ''ते पाण्याच्या समुद्रात पोहतात, पण मी राजकारणाच्या समुद्रात पोहतो. ते काय, पुशअप्स वगैरे मारतात. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या...आता घराणेशाहीचं राजकारण नाही चालणार. देशानं हेच बजावून सांगितलं आहे. माझे वडील अमुक होते आणि म्हणून मला मतं द्या, असं मी म्हणू शकत नाही. कारण लोक म्हणतील की, तुमचे वडील चांगलेच होते. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू. या आता."

"राहुल गांधी अशाच पद्धतीने लढत राहिले, तर मोदींना विजयापासून कोणीच अडवू शकणार नाही. आमच्यावर पाकिस्तान मुर्दाबाद म्हणण्यासाठी दबाव आणला जात आहे.''

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)