लक्षद्वीपमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीचा खासदार कसा निवडून आणला?

फोटो स्रोत, Twitetr/@faizalpp786
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, कोचीमधून
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले होते. ते लक्षद्वीप येथून लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.
एका हत्येच्या प्रकरणात त्यांना लक्षद्वीपच्या न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांना 10 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. 11 जानेवारी 2022 रोजी त्यांच्यासह 4 जणांना शिक्षा सुनावली गेली. 25 जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेवर केरळ उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली.
लोकसभा सचिवालयाने 13 जानेवारी रोजी ते सभागृहाचे सदस्य म्हणून काम राहाण्यास अपात्र ठरवल्याची घोषणा केली होती..
लक्षद्वीपमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीचा खासदार कसा निवडून आणला?
17 डिसेंबर 1998. सर्वसामान्य भारतीयांसाठी एक साधासुधा दिवस असला तरी लोकसभेत विरोधीपक्षांसाठी महत्त्वाचा दिवस होता. लक्षद्वीपमधून सातत्यानं निवडून येणारे काँग्रेसचे पी. एम. सईद त्या दिवशी लोकसभेचे उपसभापती म्हणून निवडले गेले होते.
नेहमीच्या पद्धतीप्रमाणं सभापती, उपसभापती यांच्या निवडणुकांनंतर बहुतांशवेळा सर्वपक्षीय नेते त्यांचं कौतुकच करतात. आदर व्यक्त करतात आणि त्यांच्या कार्यकाळात चांगलं कामकाज होईल अशी आशा व्यक्त करतात. पण पी. एम. सईद यांच्या निवडणुकीनंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी मात्र आपल्या भाषणात सईद यांच्या कौतुकाबरोबर काही गोष्टी सांगितल्या.
त्या ऐकल्या तर शरद पवार किती बारकाईने राजकारणाचा अभ्यास करून आपले निर्णय घेत असतील आणि एखाद्या निर्णयासाठी किती आधीपासून तयारी करत असतील याचा विचार करता येतो.
या भाषणात शरद पवार यांनी पी. एम. सईद लक्षद्वीपमधून सतत नऊ वेळा निवडून आले आहेत आणि त्यांच्या यशामागे कदाचित त्या मतदारसंघात केवळ 34 हजार मतदार आहेत हेसुद्धा एक कारण असावं असं सांगितलं. सईद यांच्याविरुद्ध उभा असलेला नेता दरवेळी एकच असतो आणि तो ज्या पक्षाकडे वारं वाहात असतं त्या पक्षाकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवतो असं निरीक्षणही शरद पवार यांनी मांडलं होतं.
आता लक्षद्वीप मतदारसंघ म्हटला तर एक दूरचा आणि फारसं कोणाचा लक्ष नसलेला मतदारसंघ वाटतो. पण शरद पवार यांचं मात्र या मतदारसंघाकडे लक्ष होतं आणि त्यांच्या राजकारणाची पद्धत कशी आहे हे पुढच्या काळात दिसून आलं.
लक्षद्वीपमध्ये पुढे शरद पवार यांनी काय केलं?
शरद पवार यांनी 1999 साली काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पी. एम. सईद दहाव्यांदा निवडून आले. मात्र 2004 साली सईद यांना तेव्हा जनता दल युनायटेडमध्ये असलेल्या पी. पोकुन्ही कोया यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. फक्त 71 मतांनी कोया निवडून आले.
पुढच्या म्हणजे 2009 च्या निवडणुकीत हे कोया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. पण पी. एम. सईद यांचे पुत्र मुहम्मद हमदुल्ला सईद यांनी त्यांना पराभूत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षद्वीपमध्ये 2009ची पहिलीच निवडणूक होती.
या निवडणुकीत अपयश आलं तरी शरद पवार यांनी या मतदारसंघावरचं लक्ष कमी केलं नाही. 2014 साली मुहम्मद सईद यांना राष्ट्रवादीच्या पी. पी. मोहम्मद फैजल यांनी पराभूत केलं. त्यानंतर 2019 सालीसुद्धा पी. पी. मोहम्मद फैजल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर यश मिळवलं. महाराष्ट्रातील नेहमीच्या मतदारसंघाप्रमाणे शरद पवार यांनी एक सुरक्षित मतदारसंघ कायमचा जोडला.
राष्ट्रीय पक्ष
1999 साली सोनिया गांधी मूळच्या परदेशी असल्याचा मुद्दा पुढे करुन त्यांचे नेतृत्व अमान्य करणाऱ्या शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतेक सर्व ताकद महाराष्ट्रात असूनही शरद पवार यांनी संगमा आणि अन्वर यांच्या रुपाने मेघालय आणि बिहारमध्ये आपलं अस्तित्व तिकडेही जागतं ठेवलं. गेल्या 21 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सुरक्षित आणि लहान राज्यांची निवड केलेली दिसते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार निवडून आले त्यात मेघालय आणि मणिपूरच्या एकेक खासदारांचा समावेश आहे.
2009च्या लोकसभेत या पक्षाचे 9 खासदार निवडून आले त्यामध्ये मेघालयच्या एका खासदाराचा समावेश होता. 2014 साली महाराष्ट्रात भाजपच्या लाटेचा मोठा तडाखा संयुक्त पुरोगामी आघाडीला बसला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून फक्त 4 खासदार निवडून आले परंतु बिहारच्या कटिहारमधून तारिक अन्वर आणि लक्षद्वीपमधून पी. पी. मोहम्मद फैजल निवडून आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपले संख्याबळ 6 वर नेता आलं.
2019 च्या निवडणुकीमध्येही फैजल निवडून आले आहेत. गोव्यातही चर्चिल आलेमाव यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. काँग्रेस हा प्रमुख मित्रप्रक्ष असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने विविध राज्यांमध्ये काँग्रेसविरोधातही आपले उमेदवार उभे केलेले आहेत.
मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काँग्रेस रिंगणात असला तरी नशीब आजमावून पाहातात. गुजरात विधानसभेच्यावेळेस काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत असूनही राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात आणले आणि तेथे त्यांचा एक आमदार विधानसभेत निवडून गेला आहे.
भारतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकांमध्ये किमान तीन राज्यांमध्ये 2 टक्के जागा जिंकून याव्या लागतात किंवा किमान 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये 6% मतं आणि लोकसभेच्या 4 जागा मिळवाव्या लागतात किंवा 4 राज्यांमध्ये त्या पक्षाला राज्य पातळीच्या पक्षाचा दर्जा मिळवावा लागतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस करत असलेल्या प्रयत्नांचा अंदाज येतो.
2021 मार्च महिन्यामध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे पी. सी. चाको यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची. केरळमध्ये काँग्रेस पक्षात लोकशाही उरलेली नाही असं सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात सहभागी होतील याविषयी अंदाज लावले जाऊ लागले. परंतु चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन धक्का दिला. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

फोटो स्रोत, Getty Images
विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांशी शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत हे सर्वांना माहिती असतं. पण काँग्रेससाठी केरळसारख्या महत्त्वाच्या राज्यात त्याच पक्षातून एक महत्त्वाचा नेता आपल्या पक्षात घेण्यातून त्यांच्या राजकारणाच्या वेगळ्या शैलीची चुणूक त्यांनी दाखवून दिली.
शशीधरन यांच्याप्रमाणे गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे केरळमधील नेते थॉमस चांडी यांना कुट्टनाड मतदारसंघात यश मिळाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 1.3 टक्के मते मिळाली होती. मात्र थॉमस चांडी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्तच राहिली. या निवडणुकीमध्ये कुट्टनाड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे थॉमस चांडी यांचे बंधू थॉमस के. थॉमस लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध केरळ काँग्रेसचे पी. जे. जोसेफ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटतर्फे लढत आहेत. 1965 पासून 13 निवडणुकांपैकी 8 वेळा कुट्टनाडच्या मतदारांनी आपलं दान डाव्या आघाडीच्या पारड्यात टाकलं आहे. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यूडीएफच्या उमेदवाराला या मतदारसंघात अधिक्य मिळालं आहे. परंतु 2020 साली झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत या मतदारसंघातील 13 पैकी 10 ग्रामपंचायतींवर डाव्यांना यश मिळालं आहे.
याचप्रमाणे पाला या मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष असतं. इथं केरळ काँग्रेस (एम) चे नेते के. एम. मणि अनेकदा निवडून आले. 2016च्या निवडणुकीमध्येही त्यांनी या जागेवर विजय मिळवला मात्र 2019 साली त्यांचे निधन झाले. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मणि सी. कप्पन यांनी लढवली आणि त्यांना यश मिळालं. मात्र 2021 च्या निवडणुकीत केरळ काँग्रेस एलडीएफ डाव्यांच्या आघाडीत आला आहे. त्यामुळे ही जागा त्या पक्षाला देण्याचा निर्णय डाव्या आघाडीने घेतला. त्यामुळेच संतप्त झालेल्या कप्पन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस केरळ नावाचा पक्ष स्थापन केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








