You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर, 21 मार्चला होणार पूर्वपरीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 21 मार्च 2021 रोजी होणार आहे.
राज्य सेवेची पूर्वपरीक्षा 14 मार्च 2021 रोजी नियोजित होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काल (11 मार्च) पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नवी तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.
अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. ही 2020 या सालाची पूर्वपरीक्षा आहे.
या पत्रकात आणखी दोन सूचना आयोगानं दिल्या आहेत :
- 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेसाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल.
- 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसंच, 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेल नाही.
काल मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
MPSC च्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) ऑनलाईन संवादात म्हटलं. तसंच MPSC ची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
"14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. उद्या (12 मार्च 2021) ही तारीख जाहीर होईल. तसंच आठवडाभरातच ही परीक्षा होईल," असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.
"कोरोना वाढत आहे. लॉकडाऊन भागात असलेल्या परीक्षा केंद्राबाबत निर्णय घेण्यासाठी थोडा अवधी पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आणखी वेळ पाहिजे असल्याचं सांगितलं होतं.
गेल्यावर्षी दिवाळीच्या आधी परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. त्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. यापुढे तारीख पुढे ढकलणार नाही, असं तेव्हा सांगण्यात आलं होतं, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली होती.
राज्याचा कर्मचारी वर्ग सध्या कोरोनाच्या कामात व्यग्र आहे. परीक्षेसाठी देण्यात येणारे कर्मचारी हे कोरोना निगेटिव्ह असले पाहिजेत, त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असं ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पुण्यात रस्त्यावर जमलेल्या विद्यार्थ्यांनी माघारी जाण्यास सुरुवात केली. साडेनऊनंतर मात्र पुण्यातला आंदोलनाचा परिसर बऱ्यापैकी रिकामा झाला होता.
"पुढच्या आठवड्यात जर कोरोनाचे पेशंट वाढले तर काय करणार," असा प्रश्न आता विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
"सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरचा खून करत आहे," अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर दिली आहे.
तसंच आज रात्री पुण्याच्या रस्त्यांवरच आंदोलन करणार असल्याची घोषणा पडळकर यांनी केली. जोपर्यंच परीक्षा 14 तारखेलाच घेण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होत.
पण पोलिसांनी मात्र गोपीचंद पडळकर आणि त्यांच्याबरोबर आंदोलन करत असलेल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रस्ता मोकळा केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)