कराची बेकरीनं मनसेच्या विरोधामुळे मुंबईतली शाखा बंद केली?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

एक बेकरी बंद झाली, एका पक्षानं जल्लोष केला आणि अनेक खवय्ये हळहळले.

मुंबईत कराची बेकरीचं एकमेव दुकान बंद झाल्यावर असंच चित्र दिसतंय. मूळच्या हैदराबादच्या असलेल्या या बेकरीनं मुंबईतली आपली शाखा बंद केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी हा आपला विजय असल्याचा दावा केला आहे.

पण कुणाच्या दबावामुळे नाही, तर आर्थिक नुकसान होत असल्यानं मुंबईतलं हे दुकान बंद करण्यात आल्याचं कराची बेकरीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

कारण काही असो, आपल्या आवडीची बिस्किटं मिळणारं एक दुकान बंद झाल्यानं अनेक मुंबईकर मात्र हळहळतायत आणि सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया मांडतायत.

'कराची'ला का होता विरोध?

मनसेच्या काही नेत्यांनी लगेचच ही बेकरी बंद करण्याचं श्रेय घेण्यास सुरुवात केली. पक्षाचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी तसं ट्वीटही केलं.

पण ही मनसेची अधिकृत भूमिका नसल्याचं पक्षाचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील शिवसेना आणि मनसेच्या काही नेत्यांनी पाकिस्तानातल्या शहरांची नावं असलेली दुकानं बंद करण्याचा इशारा दिला होता.

शिवसेनेचे नितीन नांदगावकर कराची स्वीट्स नावाच्या दुसऱ्या एका दुकानाच्या मालकाला धमकी देतानाचा एक व्हीडियोही तेव्हा व्हायरल झाला होता. मुंबईत कराची नावाने कोणताही व्यवसाय होऊ देणार नाही, असं नांदगावकर त्यात म्हणताना दिसले होते.

ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं पक्षानं त्यानंतर स्पष्ट केलं होतं. दुकानदारानं वाद वाढू नये म्हणून दुकानावरची नावाची पाटी वृत्तपत्रांनी झाकली होती.

मात्र मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मात्र नांदगावकरांसारखीच भूमिका घेतली आणि कराची स्वीट्सपाठोपाठ कराची बेकरीविरोधात निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी मुंबईतली ही बेकरी बंद झाली आहे.

आर्थिक तोट्यामुळे बेकरी बंद

कुठल्या राजकीय दबावामुळे नाही, तर आर्थिक कारणांमुळे ही बेकरी बंद झाल्याचं इथले कर्मचारी सांगतात.

दुकानाचे मॅनेजर रामेश्वर वाघमारे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, की ही बेकरी बंद झाल्यामुळे त्यांचीही नोकरी गेली आहे.

"दोन वर्षांत दुकानाला तोटा सहन करावा लागत होता. त्यात कोव्हिडमुळे व्यवसायावर आणखी परिणाम झाला. इथे फारसे ग्राहक येत नव्हते. त्यात जागेचं भाडंही वाढलं आहे. त्यामुळे जानेवारीतच हे दुकान बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला. माझी नोकरी सध्या गेली आहे, पण मुंबईतच दुसरीकडे पुन्हा शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे."

दुकानाचं नाव बदलणार नाही, यावर मालक ठाम असल्याचंही ते सांगतात. धमक्या आल्यावर कराची बेकरीनं मनसेला कायदेशीर नोटीसही पाठवली होती.

वांद्रे इथे 33 वा रस्ता आणि 15 वा रस्ता जिथे एकमेकांना छेदतात तिथेच कराची बेकरीची ही शाखा होती.

एरवी हा परिसर सतत गजबजलेला असतो. इथे लिंकिंग रोड, हिल रोडवरची फॅशन मार्केट्स प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच इथे अनेक कॅफे, बेकरीज आणि रेस्टॉरंट्सही सुरू झाली. कराची बेकरी त्यापैकीच एक होती.

पण लॉकडाऊननंतर या परिसरात अनेक दुकानं आणि व्यवसाय बंद झाले आहेत.

'कराची बेकरी'चे चाहते हळहळले

खरंतर मुंबईकरांना एखाद्या बेकरीचं काय कौतुक असा प्रश्न एखाद्याला पडेल. तर ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्किट हे पदार्थ मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा आणि अनेकांसाठी तर रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहेत.

इथल्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा पोटाला केवळ याच पदार्थांचा आधार असतो. त्यामुळे हे पदार्थ विकणाऱ्या बेकऱ्या मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनतात.

साहजिकच कराची बेकरी बंद होत असल्याचं कळल्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

नाव कराची, पण पाकिस्तानी नाही

कराची बेकरीमधल्या कराची या नावाला मनसेच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला असला, तरी या बेकरीचा आताच्या पाकिस्तानाशी काही संबंध नाही.

कराची बेकरीचे संस्थापक खानचंद रामनानी हे पूर्वी कराचीला राहायचे. आता पाकिस्तानच्या सिंध प्रांतातलं हे मुख्य शहर ब्रिटिशकालीन भारतात मुंबई प्रांताचा भाग होतं.

1947 साली फाळणीनंतर सिंध प्रांतातून खानचंद रामनानी भारतात आले आणि इथल्या हैदराबाद शहरात राहू लागले. 1952 साली त्यांनी बेकरी सुरू केली, तेव्हा तिला आपल्या गावाचं नाव दिलं.

आता कराची बेकरी आणि त्यांची फ्रूट बिस्किट्स ही हैदराबादची एक ओळखच बनली आहे. गेल्या काही वर्षांत हैदराबादबाहेरही या बेकरीनं शाखा उघडल्या आहेत.

फाळणीनंतर रामनानी यांच्यासारखेच अनेक सिंधी निर्वासित भारतात आले, त्यातले अनेक जण मुंबईत स्थिरावले. त्याआधीही कराचीतून मुंबईत आलेल्या अनेकांची संख्या मोठी होती.

यातल्या अनेकांनी आपल्या व्यवसायांना मूळ गावाचं नाव दिलं होतं. त्यामुळं मुंबईत कराची, ताश्कंद, काबूल, पेशावर, मुलतान, लाहोर अशी नावं असलेली दुकानं किंवा हॉटेल्स नवी नाहीत.

अर्थात त्यावरून 2009 सालीही वाद झाला होता. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच कार्यकर्त्यांनी मुलुंडमधल्या कराची स्वीट्स नावाच्या दुकानाला पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)