You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी यांच्या पुशअप्समुळे नरेंद्र मोदींच्या चाहत्यांना पडला प्रश्न
दक्षिणेतील राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने या राज्यांमधील शहरांना भेटी देत आहेत. मात्र राजकीय भूमिकांपेक्षा चर्चा रंगते आहे त्यांच्या समुद्रातील उडीमुळे तसंच पुशअप्समुळे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच सध्या त्यांच्या फिटनेसचीही चर्चा सुरु आहे. राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
केवळ फिटनेसची चर्चाच रंगली नाही तर राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला फिटनेसचा दमही दाखवून दिला. निमित्त होतं एका शाळेतील कार्यक्रमाचं.
राहुल गांधी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कन्याकुमारी येथे रोड शो केला. त्यानंतर त्यांनी एका शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी गप्पा मारता मारता त्यांनी आयकिदो हा मार्शल आर्टचा प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवला.
त्यानंतर मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तत्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी केरळमध्ये आले होते. यावेळी ते मच्छिमारांसोबत समुद्रावर गेले होते. त्यावेळी त्यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोत होडीतून प्रवासही केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी समुद्रात उडी मारून पोहण्याचा आनंदही लुटला होता.
याचवेळी राहुल यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात ते त्यांचे सिक्स अॅब्स दाखवताना दिसत आहेत. राहुल यांच्या या फिटनेसचं सोशल मीडियावरून मात्र प्रचंड कौतुक होतं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. अवघ्या 9 सेकंदात त्यांनी 13 पुशअप्स मारले. त्यानंतर या विद्यार्थ्यीनीने त्यांना एका हाताने पुशअप्स मारायला सांगितले. राहुल यांनी या विद्यार्थीनीची ही इच्छाही पूर्ण करत एका हाताने पुशअप्स मारले.
सोशल मीडियावर राहुल गांधींच्या या फिटनेसप्रेमी अवताराची भुरळ पडलेली दिसते.
राहुल गांधींच्या पुशअप्सना कसं प्रत्युत्तर द्यावं असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्यांना पडला असेल असं काहींचं म्हणणं आहे.
राहुल गांधी मनं जिंकून घेत आहेत असं काहींना वाटतं. राहुल गांधी फिटनेसविषयी अतिशय जागरुक आहेत. त्यांनी चांगला ट्रेंड रुजवला आहे असं म्हटलं जात आहे.
एखाद्या राजकारण्याला फिटनेससाठी एवढं जागरुक असलेलं पाहून आनंद झाला असं काहींचं म्हणणं आहे.
राहुल गांधी फिट आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यांच्या फिटनेसचं कौतुक करायला हवं. त्यांच्यावर टीका करायची असेल तर जरूर करा पण त्यासाठी अन्य मुद्दे आहे असं एका नेटिझनला वाटतं.
तरुणांचे नेते म्हणून राहुल गांधी छाप उमटवत आहेत असं काहींना वाटतं आहे.
निवडणुकांच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी मतदारांची करमणूक करायचं ठरवलं आहे असा टोला काहींनी लगावला आहे.
आयटी सेलवाले आता पुशअप्स अशा मारल्या जात नाहीत असं काहीतरी घेऊन येतील असं उपरोधिकपणे एक नेटिझन म्हणतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)