राहुल गांधी : काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सुधारणा करण्याच्या मार्गात गांधी घराणं अडथळा ठरतंय?

    • Author, जुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"काँग्रेस पक्ष वरिष्ठ पातळीवर फार जड झाला आहे. त्यात अनेक बुद्धीवाद्यांचा भरणा झाला आहे."

"नेते सुस्त आणि आळशी झाले आहेत. त्यांना दिल्लीत राहण्याची सवय झाली आहे."

"त्यांना वास्तवाचं भान राहिलेलं नाही. ते पक्ष कार्यकर्त्यांपासून आणि सामान्य जनतेपासूनही तुटले आहेत."

"नेतृत्त्वाचं एक मोठं संकट आहे. अंध पुत्रप्रेमामुळे सोनिया गांधी पक्षाची कमान राहुल सोडून इतर कुणालाच देऊ इच्छित नाहीत."

"नेते अजूनही अहंकारी आहेत. त्यांना वाटत जनता त्यांच्याकडे लवकरच परत येईल."

"नव्या राजकीय कलांचा सामना करण्यासाठी पक्षाकडे कुठलंच मेकॅनिझम नाही."

"पक्ष बुडतोय. त्याचा शेवट जवळ आहे."

नुकतीच झालेली बिहार विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांमधल्या पोटनिवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात आणि बाहेरही अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत.

पक्षांतर्गत सुधारणांची मागणी

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष जेव्हा-जेव्हा निवडणूक हरतो तेव्हा पक्षात दबक्या आवाजात बंडखोरीचे सूर आळवले जातात. मात्र, थोडेच दिवसात हे सूर विरूनही जातात.

प्रसार माध्यमांमध्येही पक्षाचं भविष्य आणि अस्तित्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येतं.

काँग्रेसचेच अनेक नेते पक्षांतर्गत सुधारणेची मागणी लावून धरतात. अशी मागणी लावून धरणाऱ्यांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांचा समावेश असतो.

मात्र, याच दरम्यान काँग्रेसने कर्नाटक, पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि मध्यप्रदेश आणि कर्नाटकात सत्ता गमावलीदेखील.

यावेळी 'बंडखोरी' करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पक्षात सुधारणा करण्यासाठी लिहिण्यात आलेल्या चिठ्ठीवर स्वाक्षरी करणाऱ्या 23 नेत्यांपैकी आहेत.

या नेत्यांना आता अनौपचारिकपणे G23 म्हणून संबोधलं जातं. या G23 पैकी एक कपिल सिब्बल यांनी मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. दीड वर्षांपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतल्या प्रस्तावांवर अजूनही अंमलबजावणी का झाली नाही, असा त्यांचा प्रश्न आहे.

कुठल्याही निवडणुकीत भाजपचं आव्हान पेलू शकणारी शक्ती बनून काँग्रेसने उभारी घ्यावी आणि त्यासाठी पक्षात नवसंजीवनी फुंकण्याची गरज असल्याचं, असं या नेत्यांचं म्हणणं आहे.

गांधी घराणं - काँग्रेसच्या मार्गातील अडथळा?

काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी मार्च महिन्यात एका इंग्रजी दैनिकात लेख लिहून पक्षांतर्गत सुधारणेवर भर दिला होता. या लेखानंतर पक्षाने त्यांचं प्रवक्तेपद काढून टाकलं होतं.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "लेखात ज्या मुद्द्‌यांवर चर्चा करण्यात आली होती, पक्षासाठी गरजेची असलेली इच्छाशक्ती आणि परिवर्तन घडवण्याचा ध्यास, हे अजूनही घडत नाहीय. सध्या प्रतिक्रिया खूप ऐकायला मिळतात. मात्र, प्रत्यक्षात विशेष बदल झालेला नाही."

पक्ष नेत्यांना ज्या सुधारणांची अपेक्षा आहे त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्‌दा नेतृत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष बनल्या. मात्र, हल्ली त्यांची प्रकृती बरी नसते.

पक्षाला नवा अध्यक्ष फार पूर्वीच मिळायला हवा होता. मात्र, अजूनही ते झालं नसल्याने संजय झा निराश आहेत.

गांधी घराणंच काँग्रेसच्या मार्गातला अडसर असल्याचं आता पक्षातल्याच लोकांना वाटू लागलं आहे.

अनेक नेते गांधी घराण्यावर थेट टीका करत नाहीत. मात्र, या घराण्यातील व्यक्ती पक्षाध्यक्ष असू नये, असं त्यांचं म्हणणं आहे. "या घराण्यात आता पूर्वीप्रमाणे मतदारांना आकर्षित करण्याची शक्ती उरलेली नाही," असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते गांधी घराणंच सर्वात मोठी अडचण आहे.

घराणं नाही तर पक्षही नाही?

मात्र, दुसरीकडे गांधी घराण्याचं नेतृत्व नसेल तर पक्ष फुटेल, असं मानणारेही अनेक आहेत. सीताराम केसरी पक्षाध्यक्ष असताना अनेक नेते काँग्रेस सोडून गेले आणि जे होते ते सोनिया गांधींचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांची पसंती आणि निष्ठा गांधी घराण्याप्रती आहे.

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते पक्षाचे मोठे निर्णय घेतात आणि मोठ्या मुद्द्यांवर तेच अधिक बोलतात, असं पक्षाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. एका सूत्राच्या म्हणण्यानुसाार सोनिया गांधी यांची मोहर केवळ एक औपचारिकता असते. इतकंच नाही तर, "ते निर्विवाद बादशाह आहेत."

मात्र, प्रत्यक्षात सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता आणि त्यांच्याप्रति असलेली निष्ठा अबाधित असल्याचं जाणवतं.

2018 सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मी काँग्रेस पक्षावर वार्तांकन करण्यासाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता. त्यावेळी सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोलताना मला जाणवलं की राहुल गांधी त्यांच्यासाठी हिरो आहेत.

मुंबई स्थित ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव भावना जैन सामान्य पक्ष कार्यकर्त्यांमध्ये काम करतात.

मी त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या पक्ष नेतृत्त्वबदलाच्या मागणीवर सामान्य कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया विचारली. मात्र, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी निवडणुकीतील पराभवापूर्वी जेवढे लोकप्रिय होते तेवढेच आताही असल्याचं त्यांनी मला सांगितलं.

राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्ष व्हावं, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असल्याचं त्या म्हणतात. त्या म्हणाल्या, "राजीनामा दिल्यावरही त्यांच्यावर टीका झाली आणि दिला नसता तरीही त्यांच्यावर टीका झाली असती. त्यांनी अध्यक्षपदी परतावं, अशी सर्वच कार्यकर्त्यांची भावना आहे. सहा महिन्यात हा बदल नक्कीच दिसेल."

कार्यकर्त्यांचं मनोधैर्य

ग्वाल्हेरमध्ये डॉ. रश्मी पवार शर्मा काँग्रेसच्या नेत्या आहेत. 2008 साली त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती आणि आज त्या मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिव आहेत. राहुल गांधी हेच काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हावे, ही केवळ ग्वाल्हेर शहरच नाही तर संपूर्ण राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "राहुल गांधी यांनी पक्षाचं नेतृत्त्व करायला हवं. राहुलजींनी यावं आणि पक्षाची कमान हाती घ्यावी, असं आमच्या लोकांना वाटतं. मला वाटतं मार्चपर्यंत पक्षात बदल होईल आणि पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल. नवीन अध्यक्ष राहुल गांधी असावे, अशी आमची मागणी आहे."

राहुल गांधी यांच्या पात्रतेवर कुणालाच शंका नसल्याचं डॉ. रश्मी पवार शर्मा यांचं म्हणणं आहे. त्या म्हणतात, "ते उत्तम काम करत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की काँग्रेस स्वतःच एक मोठा समुद्र आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याने अचानक चमत्कार होईल, असं मी म्हणणार नाही. मात्र, हळू-हळू बदल घडेल."

ग्वाल्हेर आणि चंबळ भागांमधल्याा पक्ष कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कायम असल्याचं त्या म्हणतात. "ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतरही सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जायला नकार दिला. यावरूनच कार्यकर्त्यांच्या पक्षाप्रति असलेल्या निष्ठेचा अंदाज बांधता येतो," असं डॉ. रश्मी पवार शर्मा सांगतात.

3 नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 'कमी होत असलेल्या प्रभावावर' बोलताना त्या म्हणाल्या, "ग्वाल्हेर पूर्व मतदारसंघात त्यांची हवेली आहे, तो त्यांचा गढ आहे आणि तिथली जनता माझी जनता असल्याचं ते म्हणतात. तर त्या मतदारसंघात त्यांच्या जनतेने त्यांचे उमेदवार मुन्ना लाल गोएल यांना नाकारून काँग्रेस उमेदवाराला निवडलं."

काँग्रेस आणि राहुल गांधी

रश्मी पवार सांगतात की, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. कारण ते त्यांना घाबरायचे.

रश्मी पवार एनएसयुआयच्या अध्यक्षही होत्या. काहीही झालं तरी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची साथ कधीही सोडणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हीच निष्ठा सामान्य कार्यकर्त्यांमध्येही दिसेल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीत नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जातो. मात्र, याचा त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत नसल्याचं भावना जैन यांचं म्हणणं आहे. मात्र, पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षात त्यांचं म्हणणं ऐकलं जात असल्याचं म्हटलं जातं.

यावर भावना जैन म्हणतात, "राहुल गांधी अजूनही मोठे निर्णय घेतात, असं तुम्ही म्हणत आहात. त्यात चुकीचं काय आहे. ते आजही पक्षातले एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे विचार आणि भूमिका यांचं महत्त्व आहे. सोनियाजी त्यांचे सल्ले घेत असतील तर ते पक्षहितासाठी. शेवटी निर्णय सोनियाजीच घेतात. त्या आजारी असल्या तरीही."

जम्मूमधले एक तरुण काँग्रेस कार्यकर्ते राज रैना आपण राहुल गांधींच्या बाजूचे असल्याचं सांगतात. मात्र, पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शीपणे व्हावी, असंही त्यांचं म्हणणं आहे.

पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांवर ते नाराज आहेत. ते म्हणतात, "दिल्लीत गेल्यावर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणं अशक्य असतं. त्यांच्यापैकी कुणीच जम्मूत येत नाही आणि चुकून कधी कुणी आलंच तर त्यांना भेटणं शक्य होईलच, असं नाही."

'पक्षाला नेता नाही'

संजय झा यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणतात, "कुणालाच जबाबदार धरलं नाही तर पक्षाचा असाच पराभव होईल. सध्या पक्षात कुणाकडेच जबाबदारी नाही. जवळपास दोन वर्ष होत आलेत पण पक्षाला अध्यक्ष नाही."

ते पुढे म्हणतात, "घराण्याचं पक्ष किंवा देशासाठी जे योगदान आहे, ते निर्विवाद आहे. घराण्याने जे बलिदान दिलं त्याची इतिहासात नोंद झाली आहे. मात्र, आता पक्षाने नव्या नेतृत्वालासंधी द्यायला हवी, असं लोकांना वाटतं."

संजय झा म्हणतात, "राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. मात्र, महिनाभरात पक्षाला नवा नेता मिळायला हवा, असं ते म्हणाले नाही."

"त्यांनी ही प्रक्रिया सुरूच केली नाही. त्यामुळे अखेर सोनिया गांधी यांनाच यावं लागलं. आता सारं जग म्हणतंय की काँग्रेस पक्षाकडे नेता नाही. त्यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे."

पक्षाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेसाठी इतर नेतेही जबाबदार असल्याचं मत संजय झा नोंदवतात. पक्षांतर्गत सुधारणा न होण्यामागे मोठ्या नेत्यांचा उद्धटपणा आणि आळस जबाबदार असल्याचंही संजय झा म्हणतात.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणाला लोक लवकरच नाकारतील आणि काँग्रेसकडे परत येतील, असा गैरसमज यांना असल्याचं झा म्हणतात.

संजय झा म्हणतात, "पक्ष कुठल्याही एका व्यक्तीचा किंवा एका घराण्याचा नाही. आज फ्रंट फुटवर खेळायची गरज असताना आम्ही पक्षांतर्गत बाबींमध्येच अडकून पडलो आहोत. नेतृत्व काही बोलत नाही. G23 च्या नेत्यांनी प्रस्ताव मांडला आहे. कुणीही पक्ष सोडलेला नाही. पक्षाने आमचं निलंबन केलं आहे. आम्ही पक्ष सोडलेला नाही."

काँग्रेसचे नेते आळशी झाल्याचं आणि ते दिल्ली सोडून जाऊ इच्छित नसल्याचं आपल्याला काही वर्षांपूर्वीच कळलं होतं, असं बिहारमधले काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार शकील अहमद खान म्हणतात. शकील अहमद खानही काही वर्ष दिल्लीत होते. मात्र, आपली जनतेशी नाळ तुटत चालल्याचं लक्षात येताच आपण बिहारमध्ये परतल्याचं ते सांगतात.

आमदार शकील अहमद खान म्हणतात, "सामान्य जनतेशी जोडून घेण्यासाठी आणि त्यांची कामं करण्यासाठी मी काही वर्षांपूर्वीच बिहारमध्ये परतलो."

दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार पंकज व्होरा गेली 40 वर्ष काँग्रेसचं वार्तांकन करत आहेत. पक्षाच्या चढ-उतारांवर त्यांचं बारीक लक्ष असतं. त्यांच्या मते राहुल गांधी यांनी त्यांच्या घराण्याबाहेरील व्यक्तीला पक्षाध्यक्षपदी नेमण्यासाठी मदत करून पक्ष बळकट केला पाहिजे.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "बिहार विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांना 135 वर्ष जुन्या काँग्रेस पक्षाचे निर्विवाद नेता म्हणून स्वीकारणं कठीण असेल. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीत सामील होण्याऐवजी त्यांनी अन्य कुणाला अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी मदत कराायला हवी."

मात्र, पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शकपणे पार पडली तर काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता राहुल गांधींव्यतिरिक्त कुणाचीच निवड करणार नाही, असा विश्वास डॉ. रश्मी पवार शर्मा आणि भावना जैन दोघीही व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)