You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी : '…तर मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल'
शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
सध्या देशात लोकशाही नाही. पंतप्रधानांविरुद्ध उभे राहणाऱ्यांना दहशतवादी संबोधलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे जरी मोदी यांच्या विरोधात गेले, तर त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दात गांधी यांनी मोदींवर टीका केली.
तिन्ही कृषि कायदे तत्काळ मागे घ्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात असलेल्या काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने राष्ट्रपती भवनापर्यंत रॅली काढण्याचा प्रयत्न केला पण ही रॅली काँग्रेस मुख्यालयाजवळच थांबवण्यात आली.
यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडक भांडवलदारांच्या सोयीने काम करत आहेत. जे पण त्यांच्या विरोधात येईल त्यांना दहशतावादी म्हटलं जात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राहुल गांधी म्हणाले, "केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले. या कायद्यांमुळे शेतकरी आणि मजुरांचे नुकसान होणार आहे. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत. पंतप्रधानांना वाटत असेल की शेतकरी घरी परततील तर तो त्यांचा गैरसमज आहे."
ते पुढे म्हणाले, "कोरोनामुळे मोठे नुकसान होईल हे मी आधीच सांगितले होते. आज मी पुन्हा सांगतोय, शेतकरी आणि मजुरांविरोधात कोणतीही ताकद उभी राहू शकत नाही."
चीनने भारताच्या हजारो कि.मी. जागेचा ताबा घेतला यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच भाष्य का करत नाहीत? असा पश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
यावेळी प्रियंका गांधी यांनीही केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, "सरकारच्या भूमिकांवर आक्षेप व्यक्त केल्यास त्याला थेट दहशतवादाच्या दृष्टीने पाहिले जाते. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवत आहोत."
लोकशाही असलेल्या देशात जनतेने निवडून दिलेल्या खासदारांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्ष या नात्याने शेतकऱ्यांची समस्या जाणून घेणे आमचे काम असल्याचंही प्रियांका गांधी यांनी सांगितले.
"शेतकऱ्यांना ज्या नावांनी संबोधले जात आहे ते पाप आहे. सरकार त्यांना राष्ट्र विरोधी म्हणत असेल तर सरकार पापी आहे." अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.
"भारतात आता लोकशाही केवळ कल्पना आहे," काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)