You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावतविरोधात वॉरंट जारी झालेलं प्रकरण नेमकं काय आहे?
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी (1 मार्च) अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
अंधेरीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी कंगनाला समन्स बजावून 1 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कंगना सोमवारी (1 मार्च)न्यायालयात हजर झाली नाही.
याप्रकरणी मॅजिस्ट्रेट आर. आर. आर. खान यांनी कंगनाविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केलं.
कंगनाला बजावण्यात आलेला समन्स कायद्यानुसार घालून दिलेल्या प्रक्रियेचे पालन न करता बाजवण्यात आला होता असा युक्तिवाद कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला.
दंडाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जाईल, असंही ते म्हणाले.
या प्रक्रियेला आव्हान दिलं जात असलं तरी उच्च न्यायालयाने समन्सला स्थगिती न दिल्यास कंगनाला निर्देशानुसार न्यायालयात हजर राहावं लागेल असा युक्तिवाद जावेद अख्तर यांचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी कोर्टात एक अहवाल सादर करत कंगनाविरुद्ध मानहानीच्या दाव्याची तक्रार असल्याचा उल्लेख केला.
जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही तक्रार दाखल केली होती. कंगनाने आपल्या विरोधात निराधार चुकीची वक्तव्य केली आणि यामुळे आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहचली अशी तक्रार जावेद अख्तर यांनी केली होती.
जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये उपस्थित असलेल्या 'कोटरी'चा हवाला देत कंगनाने एका मुलाखतीत आपल्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा दावा जावेद अख्तर यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
कंगनाच्या अशा निराधार टिप्पणीमुळे आपली प्रतिष्ठा खराब झाल्याचा दावा जावेद अख्तर यांनी आपल्या याचिकेतही केला आहे.
26 मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)