You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...म्हणून काँग्रेसची आमदारकीची ऑफर स्वीकारली नाही – उर्मिला मातोंडकर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधले.
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त जागांसाठी कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे समजते. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली असल्याने उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश केला.
...म्हणून काँग्रेसची आमदारकीची ऑफर स्वीकारली नाही - उर्मिला मातोंडकर
"मी काही वेगळ्या मुद्यावरून काँग्रेस सोडली होती. पदाचा मुद्दा अजिबात नव्हता. म्हणून मी काँग्रेसकडून आमदारकी स्वीकारली नाही," असं उर्मिला यांनी स्पष्ट केलं आहे.
देशाच्या राजकारणात विषारी राजकारण सुरू झालं आहे. हे विषारी राजकारण देशातून बाहेर काढायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
"सेक्युलर म्हणजे इतर धर्मांना विरोध आणि त्यांचा तिरस्कार करणं नाही. मी हिंदू आहे. जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. त्यामुळे धर्म हा आस्थेचा विषय आहे," असं सेक्युलर विचारांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना उर्मिला यांनी म्हटलं आहे.
बॉलिवुड आणि मुंबईचं घट्ट नातं
मुंबई बॉलिवुडच्या नसा-नसा भिनलेलं आहे. मुंबई बॉलीवूडच्या रक्तात आहे. त्यामुळे मुंबई आणि बॉलीवूड वेगळं होणार नाही. योगींच्या फिल्मसिटीसाठी शुभेच्छा, असं त्यांनी योगी आदित्यनाथ नोएडामध्ये उभारत असलेल्या फिल्मसिटीबाबत म्हटलं आहे.
यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी 2019 लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
अभिनेत्री कंगना राणावत यांच्या भूमिकांना आव्हान दिल्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या.
मुंबई पोलिसांवर टीका केल्यानंतर कंगना राणावत यांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कंगनावर निशाणा साधला होता.
कंगना राणावतला भाजपचं तिकीट हवं असल्यामुळे तिने असा प्रकार सुरू केल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला.
कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. उर्मिलाच्या प्रतिक्रियांवर कंगना राणावतने उर्मिला मातोंडकर 'सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री'असल्याचे म्हटले होते.
हा वाद सुरू असताना उर्मिला मातोंडकर यांनी "बदल्याची भावना मानवाला जळवते. संयम हाच बदल्याच्या भावनेवर नियंत्रण आणण्यासाठीचा उपाय आहे. शिवाजी महाराज अमर रहे," असं वाक्य लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
कंगना राणावतने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट आरोप केले होते. शिवाय, तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका केली. अशावेळी उर्मिला मातोंडकर या मोजक्या अशी अभिनेत्रींपैकी एक होत्या, ज्यांनी कंगना राणावतला प्रत्युत्तर दिले. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही याचा फायदा झाला.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित 12 जागा रिक्त असताना, यात कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे उर्मिला मातोंडकर यांची नवी राजकीय कारकीर्द सुरू होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)