You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. शीतल आमटे करजगी यांचे निधन
आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक निलेश पांडे यांनी म्हटलं आहे की "त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आत्महत्या आहे की नक्की काय यावर भाष्य करता येणार नाही."
शीतल आमटे त्यांच्या आनंदवन येथील घरी बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
कोण होत्या शीतल आमटे?
डॉ. शीतल आमटे या पेशाने डॉक्टर होत्या. त्या समाजसेविका आणि दिव्यांगतज्ज्ञ होत्या. डॉ. शीतल आमटे यांनी 2004 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे - कराजगी आणि त्यांचे पती गौतम - कराजगी यांना स्थान देण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या महारोगी सेवा समितीच्या CEO पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती गौतम - कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
लिंक्डइनवरील त्यांच्या वैयक्तिक माहितीनुसार, त्या 'मशाल' आणि 'चिराग' या नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या संस्थापक होत्या. या माध्यमातून त्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असत.
आनंदवन, सोमनाथ प्रकल्प, लोक बिरादरी प्रकल्प, लोकबिरादरी प्रकल्प नागेपल्ली, लोकबिरादरी प्रकल्प खमंचरू, अशोकवन प्रकल्प नागपूर, ग्रामीण विकास प्रकल्प मुळगव्हाण, ग्रामीण विकास प्रकल्प चेतीदेवळी, महारोगी सेवा समिती चंद्रपूर आणि ग्रामीण विकास संस्था वरोरा असे 10 प्रकल्प महारोगी सेवा समितीच्या अंतर्गत येतात.
त्यामुळे महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या करत असलेल्या कामाचं अनेकजण कौतुक करत असत.
काही दिवसांपूर्वी आल्या होत्या चर्चेत
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे-करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते.
या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.
या फेसबुक लाइव्हनंतर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला होता.
त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं. त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.
या निवेदनावर डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश - डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सह्या केल्या होत्या.
या प्रकरणाबाबत त्यांनी खुलासा केला होता. "दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं," अशी प्रतिक्रिया डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
दरम्यान डॉ. शीतल आमटे- करजगी यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबा आमटे यांच्यावर आनंदवनात ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या शेजारीच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंदवनाच्या प्रथेनुसार दफनविधी नुसार अंत्यसंस्कार झाले.
आमटे कुटुंबीय आणि शीतल आमटे यांच्या सासरकडची माणसं लोक अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)