जपानच्या फुकुशिमा जवळ 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप

जपानमध्ये शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. भूकंपानंतर अजूनपर्यंत त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.

एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार अमेरिका आणि जपानकडून त्सुनामीचा कोणताही संभाव्य इशारा दिला गेला नाहीये.

अमेरिकन एजन्सी यूएसजीएसनुसार फुकुशिमा जवळ पॅसिफिक महासागरात 54 किलोमीटर खोल या भूकंपाचं केंद्र होतं.

एपी या वृत्तसंस्थेनं जपानच्या एनएचके या सरकारी टेलिव्हिजनच्या हवाल्यानं बातमी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भूकंपामुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचं काही नुकसान झालं आहे का याची माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर देशातील अन्य कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पामध्ये नुकसान झाल्याची तक्रार अजूनपर्यंत मिळाली नसल्याचं म्हटलं गेलं आहे.

राजधानी टोकियोपासून जपानच्या नैऋत्य भागापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. हा तोच भाग आहे जिथे मार्च 2011 मध्ये त्सुनामी आणि भूकंपामुळे प्रचंड हानी झाली होती.

2011 साली फुकुशिमामध्ये आलेल्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती आणि 18 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते.

जपानमध्ये भूकंप आल्यानंतर 2011 च्या भूकंपाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)