रिंकू शर्मा : दिवसाढवळ्या झालेल्या खुनाचं कारण काय?

रिंकू शर्मा

फोटो स्रोत, Social media

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, मंगोलपुरीहून

वायव्य दिल्लीतल्या मंगोलपुरी भागात राहणाऱ्या रिंकू शर्मा या तरुणाच्या हत्येनंतर या हत्येचं कारण काय? यावरून वाद पेटला आहे.

सोशल मीडियावर रिंकू शर्मा हिंदू होता आणि बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचे संबंध होते, यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

मात्र, हे धार्मिक हिंसाचाराचं प्रकरण नसून परस्परातील वादामुळे ही हत्या करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. तसंच परिसरातला तणाव बघता निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

शुक्रवारी दुपारी काय घडलं?

शुक्रवारी (12 फेब्रुवारी) दुपारी मंगोलपुरीच्या ज्या गल्लीत रिंकू शर्मा रहायचा त्या गल्लीत जाण्याआधी बीबीसीच्या प्रतिनिधींनी बाह्य दिल्लीचे अॅडिशनल डीसीपी सुधांशू शर्मा धामा यांच्याशी बातचीत केली.

धामा सांगतात, "परवा रात्री काही मुलं एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगोलपुरीच्या एका गल्लीत जमले होते. या पार्टीमध्ये या मुलांमध्ये एका रेस्टोरंटवरून भांडण झालं. दोन्ही पक्षांची वेगवेगळ्या रेस्टोरंटमध्ये पार्टनरशीप होती. हत्या करण्यात आलेल्या रिंकूची कुठल्याही रेस्टोरंटमध्ये पार्टनरशीप नव्हती. मात्र, त्याचे मित्र सचिन आणि आकाश या दोघांचं रेस्टॉरंट होतं. तसंच चिंगू उर्फ जाहिद या तरुणानेही रोहिणी भागात एक रेस्टॉरंट उघडलं होतं."

रिंकू शर्मा घर

रिंकू शर्माच्या मित्राचं रेस्टॉरंट लॉकडाउनमुळे बंद झालं होतं, अशी माहिती अॅडिशनल डीसीपींनी दिली. यावरूनच वाद सुरू झाला. वाद वाढल्यावर चिंगू उर्फ जाहीद तिथून निघून गेला. त्यानंतर तो मामा आणि इतर तीन-चार नातेवाईकांना घेऊन रिंकूच्या घरी पोहोचला.

जाहीदचे मामा दानिश उर्फ लाली यांचं घर रिंकू ज्या गल्लीत रहायचा त्याच गल्लीत होतं. याचवेळी या लोकांमध्ये भांडण सुरू झालं आणि त्यात रिंकूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर रिंकूला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाल्याचं धामा सांगतात.

धामांनी सांगितलं, "या प्रकरणातल्या लोकांना त्याच वेळी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चौघांचाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. आतापर्यंत या प्रकरणात कुठलाही धार्मिक अँगल समोर आलेला नाही. हे पूर्णपणे व्यवसायिक स्पर्धेचं प्रकरण आहे. हे सगळे एकमेकांच्या शेजारी रहायचे आणि एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे यात धार्मिक तेढ असावी, असा कुठलाच अँगल नाही."

मात्र, रिंकूच्या काही नातेवाईकांचं म्हणणं वेगळं आहे. रिंकू हिंदू होता. त्याचे बजरंग दलाशी संबंध होते आणि राम मंदिर उभारण्यासाठी तो देणगी गोळा करत होता, असं काही नातेवाईकांचं म्हणणं आहे. रिंकूच्या धाकट्या भावाचाही असंच म्हणणं आहे.

लोकांचं काय म्हणणं आहे?

दिल्ली पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर बीबीसीची प्रतिनिधी रिंकू शर्माच्या घरी पोहोचले. तिथे राजकीय नेत्यांचं जाणं-येणं सुरू होतं. बीबीसीचे प्रतिनिधी पोहोचले तेव्हा तिथे भाजप खासदार हंसराज हंस, आम आदमी पक्षाच्या आमदार राखी बिरला आणि दिल्ली भाजप प्रमुख आदेश गुप्ता होते.

हंसराज हंस
फोटो कॅप्शन, हंसराज हंस

बीबीसी प्रतिनिधींनी रिंकू शर्माच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय नेते असल्याने आम्हाला दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे आम्ही आधी सामान्य जनतेशी बोलायचं ठरवलं.

आम्ही लोकांशी बोलून या भागात यापूर्वी कधी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली होती का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

रिंकू शर्माच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, "या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम असा रंग देण्यात येतोय. इथे बरेच मुस्लीम राहतात. बघा, तुमच्या मागेच अजानचा आवाज येतोय. मी जवळपास 40-45 वर्षांपासून इथे राहतोय. यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही."

याच गल्लीत थोडं पुढे गेल्यावर मी एका मंदिरात पोहोचलो. तिथे एका 50 वर्षांच्या महिलेशी आम्ही बोललो. त्या म्हणाल्या, "रिंकू चांगला मुलगा होता. पंडित घऱातला होता. मंदिरात येऊन पूजा करायचा. कधी झेंडे लावायचा. दिसल्यावर विचारपूस करायचा. साधा-सरळ मुलगा होता. त्याच्या घरची माणसंही चांगली आहेत. हे खूप वाईट झालं."

रिंकू शर्मा घर

आम्ही अटक केलेली मुलं आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, "आम्ही कायस्थ समाजातले आहोत. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. ते खालच्या जातीतले लोक आहेत. आमच्या गल्लीतही दोन घरं आहेत. आम्ही त्यांच्याशी कसलाच संबंध ठेवत नाही. या लोकांची या गल्लीत एक नाही बरीच घरं आहेत. एका-एकाची चार-चार मुलं आहेत आणि सगळे भांडणात पुढे असतात."

याच महिलेने आम्हाला अटक करण्यात आलेल्या मुलांच्या घरचा रस्ता दाखवला.

मंदिरापासून जवळपास 50 पावलांच्या अंतरावर गुलाबी रंग लावलेलं एक जुनं घर होतं. ते घर रिकामं होतं. घरातले सगळे पळून गेल्याचं शेजारी उभ्या लोकांनी सांगितलं.

तिथेच शेजारी माहताब राहतात. आता देवाचं नाव घ्यायचीही भीती वाटते, असं ते म्हणाले. त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या 50 वर्षांच्या ललिता यांचंही तसंच म्हणणं होतं.

मात्र, याआधी कधीही धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी शेजारी राहणाऱ्या माहताबच्या कुटुंबीयांकडून काही त्रास झाला का, हे विचारल्यावर त्यांचं उत्तर नाही, असं होतं.

आम्ही महताबच्या घरासमोर राहणाऱ्या अनेकांशी बातचीत केली. इथे उपस्थित असलेल्या दोघांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर आम्ही गल्लीत जागरणाचे कार्यक्रम घ्यायचो. रस्त्यावरच जेवण बनायचं. मात्र, टेलरिंगचं काम करणारे माहताबचे वडील किंवा स्वतः माहताब यांनी कधीच त्यावर आक्षेप घेतला नसल्याचं सांगितलं.

या घटनेत जो चाकू वापरण्यात आला तो रिंकू शर्माचाच असल्याचंही या लोकांनी सांगितलं.

संतप्त जमावाचा हल्ला

माहताब यांच्या घराबाहेर त्यांच्या शेजाऱ्यांशी बातचीत सुरू असतानाच लाल आणि ग्रे रंगाचे स्वेटर घातलेल्या दोन व्यक्तींनी आम्हाला घेराव घालायला सुरुवात केली.

आधी मोठ्याने बोलत धक्का-बुक्की करत धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर या लोकांनी इतरांनाही बोलवायला सुरुवात केली आणि गर्दी वाढू लागली.

हात-पाय तोडून टाकू, इथून निघा, असं धमकावण्यात आलं. प्रेस कार्ड मागितल्यावर प्रतिनिधींनी बीबीसीचं ओळखपत्र दाखवलं. बीबीसीचं नाव बघून ती माणसं अधिकचं चिडली.

हे सगळं मेन रोडपासून अवघ्या 15 मीटर अंतरावर सुरू होतं. मेन रोडपर्यंत पोहोचण्यासाठी एक-एक पाऊल टाकणंही कठीण होतं. बाहेर पडताना काही लोकांनी पाठीवर मारहाणही केली. बीबीसीचे प्रतिनिधी कसंबसं 15 मीटर अंतर पार करत मेन रोडवर पोहोचले. तिथे निमलष्करी दलाचे दोन जवान दिसले.

मेनरोडवर पोहोचल्यावर बीबीसीच्या प्रतिनिधींनी आय कार्ड दाखवत बीएसएफच्या जवानांकडे मदत मागितली. मात्र, ते हल्लेखोरांना काहीच बोलले नाही. दरम्यान, बीबीसीच्या प्रतिनिधींनी मेन रोडवर पुढे चालत जात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दोन हल्लेखोर आपल्यासोबत जमााव घेऊन मेनरोडपर्यंत आले आणि त्यांनी हात धरून पुन्हा गल्लीत नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका टिव्ही पत्रकाराने बीबीसी प्रतिनिधीचा हात धरून त्याची तिथून सुटका केली.

हल्लेखोर जमावाला बघून सामान्य माणसांनीही बोलणं बंद केलं. दुर्दैवाची बाब अशी की गल्लीत राहणारी ती माणसं जी दोन्ही बाजूच्या लोकांना ओळखायची ती हल्लेखोरांच्या जमावासमोर असहाय झाली आणि पत्रकारांना तिथून निघून देण्याचा सल्ला देत होती.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)