गोपीचंद पडळकर कोण आहेत? ते सतत वादात का असतात?

फोटो स्रोत, facebook
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी
भाजप नेते गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
बुधवारी (30 जून) दुपारी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केल्यानंतर संध्याकाळी अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचं समोर आलं आहे.
या घटनेनंतर पडळकर म्हणाले, "पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते हे आता राज्याला माहित आहे. परंतु माझा आवाज बंद होणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही."
या घटनेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "हा हल्ला भाजपचाच स्टंट असावा. कोणत्याही सदस्याच्या गाडीवर असा हल्ला होऊ नये. पण हा भाजपने घडवून आणलेला स्टंट आहे. प्रसिद्धीसाठी हे केलं जातं आहे, असंही ते म्हणाले.
शरद पवार यांच्याविषयी ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
गोपीचंद पडळकर हे आपल्या आक्रमक भाषाशैलीसाठी ओळखले जातात. पडळकर यांच्या वक्तव्यांप्रमाणेच त्यांची एकूण राजकीय कारकिर्द रंजक आणि तितकीच वादग्रस्त राहिली आहे.
त्यांच्या राजकीय प्रवासाचा बीबीसी मराठीने घेतलेला हा आढावा...
शरद पवारांवर सातत्याने टीका
"शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे," अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

फोटो स्रोत, facebook
सोलापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना पडळकर यांनी शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या या बैठकीवरूनही टीका केली आहे.
"मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे," अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केला.
यापूर्वीही अनेकवेळा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्रमक शब्दात टीका केली आहे.
जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होताना ते म्हणाले होते, "शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो,"
त्यापूर्वी, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
गोपीचंद पडळकर यांनी आपली वक्तव्य सांभाळून करावीत. अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.
त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देणं सुरू झालं आहे. पुण्यात यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "त्याला विनाशकाले विपरित बुद्धी सुचवलेली आहे. त्याचं डिपाझिट जप्त झालं आहे. त्याला का मोठं करता," असं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय.
तर "गोपिचंद पडळकर हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.
भाजपकडून विधान परिषदेवर
काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.
भाजपने प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि ऐनवेळी उमेदवार बदलून डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना विधानपरिषदेवर जाण्याची संधी दिली होती त्याचीही बरीच चर्चा झाली होती.

फोटो स्रोत, facebook
पण उमेदवारांच्या यादीवरून भाजपमधली अंतर्गत खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
भाजपने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि निष्ठावानांना डावलून पक्षबदलूंना संधी दिल्याचा आरोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये बारामतीत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास अनेक नागमोडी वळणांचा राहिला आहे. पडळकर यांच्या याच प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
'एकच छंद, गोपीचंद'
सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव. हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पण सध्याच्या काळात डॉक्टरांची वाडी म्हणून पडळकरवाडीची ओळख बनली आहे. इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत, हे इथलं वैशिष्ट्य.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून आरक्षण आंदोलनाला बळ दिलं.

फोटो स्रोत, facebook
या माध्यमातून आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवला. त्यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. पुढे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना मानलं जाऊ लागलं. ते भाषणासाठी व्यासपीठावर येताच 'एकच छंद, गोपीचंद...' अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या.
38 वर्षीय गोपीचंद पडळकर यांचं शिक्षण 12 वी पर्यंत झालेलं आहे. पडळकरांचा राजकारणाव्यतिरिक्त पडळकरांना सिनेमाची आवड आहे. ऐन लोकसभा निवडणुक 2019च्या तोंडावरच त्यांनी धुमस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय केलेला आहे.
तीन पक्षांचा प्रवास
विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता.
त्या क्षणापर्यंत भाजपने कोणत्याही उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नव्हतं. पण फडणवीस यांनी पडळकर यांच्या प्रवेशावेळीच ते बारामतीमधून लढतील, अशी घोषणा केली होती.

फोटो स्रोत, facebook
"आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकर पुन्हा घराकडे परत आले आहेत. ते वंचितमध्ये गेल्यानंतर दुःख झालं होतं. कोणतीही मागणी न करता फक्त धनगर सामाजासाठी त्यांनी व्रत स्वीकारलं आहे. गोपीचंद हे ढाण्या वाघ आहेत. ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं. माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे," असं फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.
या प्रवेशापूर्वी पडळकर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. याच पक्षाकडून त्यांनी सांगली लोकसभा लढवली. या दरम्यान, भाजप सरकारने धनगरांना ST आरक्षण दिलं नाही, म्हणून पडळकरांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं.
"धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करून आरक्षण लागू झालं नाही तर महाडमधून अंदाजे 20-25 लाख धनगर लोक आपल्या शेळ्या, मेंढ्या, गुराढोरांसह मोर्चा काढतील आणि विधानभवनावर धडकतील," असा इशारा पडळकर यांनी भाजपला दिला होता.
खरं तर गोपीचंद पडळकर यांनी 2018 च्या जुलै महिन्यात वंचितमध्ये प्रवेश केला होता. पुढे त्यांना सांगली लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्या आधी 2013 ते 2018 दरम्यान ते भाजपमध्ये होते. 2009 ते 2013 दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते.
वंचित बहुजन आघाडीला सोडत असताना पडळकर यांनी भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं होतं.
पडळकर यांनी त्यावेळी म्हटलं, "धनगर आरक्षणाबाबत सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. त्यामुळे धनगर आरक्षणाला सरकारचं पाठबळ आहे. सरकारने समाजासाठी एक हजार कोटी दिले आहेत. 22 आदिवासी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजप सरकार धनगर समाजासाठी चांगलं काम करत असल्याची लोकांची भावना आहे आणि ती खरी आहे."
पक्ष बदलण्याच्या या सवयीमुळेच पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. पण धनगर समाजाच्या हितासाठीच हे निर्णय घेतल्याचं पडळकर नेहमी सांगताना दिसतात.
'सालगडी म्हणून पाच वर्षं ठेवा'
तुम्ही मला बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, असं आवाहन करणारं गोपीचंद पडळकर यांचं भाषण लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजलं होतं.
सांगलीतून वंचित बहजुन आघाडीतर्फे निवडणुकीस उभे असताना प्रचारसभेत त्यांनी हे भाषण केलं होतं.

फोटो स्रोत, facebook
या भाषणात पडळकर म्हणतात, मी श्रीमंत नाही, गर्भश्रीमंत आहे. कारण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. मी मोकळा माणूस आहे. मला वापरून घ्या ना. तुम्हाला जिल्ह्यात कोण मोकळा दिसतो का? बाकीच्या नेत्यांना सुतगिरण्या, कारखाने, बँका अशी कामं आहेत. मी मोकळा असल्यामुळे तुम्ही मला सालगडी म्हणून पाच वर्षांसाठी ठेवा. घरातल्या सालगड्याला तुम्ही पगार देत असाल, पण मला बिनपगारी ठेवा. विरोधकांनी आपले अर्ज स्वतःहून मागे घेतले पाहिजेत. त्यांनी 70 वर्ष गोरगरिबांची, वंचित, उपेक्षितांची मतं घेतली. यांनीच आता आम्हाला बिनविरोध निवडून दिलं पाहिजे.
पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारासाठी आणलं होतं. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. हाच धागा पकडून खडसे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे.
गोपीचंद पडळकर शिवराळ भाषेत मोदींवर टीका करत होते. अशा नेत्याला भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. यातून भाजपचं सध्याचं राजकारण दिसून येईल, असं खडसे म्हणाले आहेत.
विधानसभेच्या वेळीही पडळकर यांना अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी याबाबत बोलताना आपण फक्त जनसामान्यांचा आवाज लोकांसमोर मांडत असल्याचं, तसंच धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण पडळकर यांनी दिलं होतं.
पण पडळकर यांच्या निवडणुकांना हजारो-लाखोंची गर्दी होत असूनसुद्धा त्याचं मतांमध्ये रुपांतर झाल्याचं आतापर्यंत कधीच दिसून आलं नाही. त्यामुळे लोकांमधून निवडून येण्याची संधी पडळकर यांच्या वाट्याला अद्याप आलेली नाही.
सलग चार निवडणुकीत पराभूत
पडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्या आहेत. पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोडं पाहावं लागलं आहे.
2019 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती. पण अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही. त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याच्या नामुष्की ओढवली होती. निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाख 95 हजार 641 मतं मिळाली. तर पडळकर यांना 30 हजार 376 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
तर 2019 एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीस उभे होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली होती. पण इथंही त्यांना पराभव स्वीकारावा लागलां.
सांगलीत भाजपचे विजयी उमेदवार संजय पाटील यांना 5 लाख 8 हजार 995 मतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 मतं मिळाली होती.
त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवण्याची नोंदही पडळकर यांच्याच नावे आहे.
याशिवाय 2014 आणि 2009 मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते.
यात 2014 मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर 2009 ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती.
पण पराभूत होऊनही पडळकर यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली नाही. उलट त्यांचा राजकीय आलेख चढताच राहिल्याचं दिसून येईल.
अखेर विधान परिषदेच्या माध्यमातून आता पडळकर यांना आमदारकीचं तिकीट मिळालं आहे.
'संघ, भिडे गुरुजी यांच्याशी संबंध'
कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या 'शिवप्रतिष्ठान संस्थाना'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत पडळकर यांचा संबंध असल्याचा आरोप पडळकर यांच्यावर वारंवार होत आला आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण घडल्यानंतर आणि त्यामध्ये संभाजी भिडेंचं नाव आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भिडेंना या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हटलं होतं.
लोकसभा निवडणुकीत पडळकर यांना वंचितची उमेदवारी मिळाल्यानंतर याच संभाजी भिडे यांच्यासोबतचे आणि संघाच्या गणवेशातील फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
पण या दोन्ही संघटनांशी आपला काहीएक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी त्यावेळी दिलं होतं. तसंच सांगली जिल्हातील सर्वपक्षीय नेत्यांचे संभाजी भिडे यांच्याशी संबंध आहेत. तसेच संबंध आपलेही आहेत. ते दोषी असतील तर कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले होते.
पण हिंदुत्ववादी राजकारणाच्या अवतीभोवतीच पडळकर यांच्या राजकारणाला सुरूवात झाल्याचं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात.
चोरमारे यांच्या मते, "पडळकर यांचे भिडे गुरूजी यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पडळकर दिसले आहेत. पडळकर यांचा पाया हिंदुत्त्ववादी राजकारणाचा आहे. याचा त्यांना भाजपमध्ये फायदा झाल्याचं पाहायला मिळालं आहे."
फडणवीसांचे विश्वासू
गोपीचंद पडळकर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांना भाजपमध्ये संधी मिळत आहेत, असं ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांना वाटतं.

फोटो स्रोत, facebook
ते सांगतात, "सध्याच्या भाजपच्या राजकारणात फडणवीसांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या स्पर्धकांना अलगद बाजूला केलं आहे. त्यांनी अनेक नव्या फळीच्या नेत्यांना पुढे आणलं आहे. नव्या नेत्यांना संधी देऊन नेतृत्व आपल्या हातात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून पडळकरांची निवड करण्यात आलेली असू शकते."
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, "भारतीय जनता पक्षाकडे सध्या मोठा धनगर चेहरा नाही. पूर्वी प्रकाश शेंडगे काही काळ होते. पण ते बाजूला झाले. राम शिंदे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. ज्याप्रकारे आयात मराठा नेत्यांना भाजपने मोठ्या प्रमाणात संधी दिली. त्याचप्रमाणे धनगर समाजातील पडळकर यांना राजकीय समीकरण डोक्यात ठेवून संधी देण्यात आल्याची शक्यता आहे."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








