गोपीचंद पडळकर : वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देऊन भाजपच्या वाटेवर?

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
'वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र, आपण आता वंचित बहुजन आघाडीचं काम थांबवत आहोत,' असं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
लोकसभा निवडणुकीवेळी गोपीचंद पडळकरांनी भाजपमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांनी सांगलीमधून वंचितच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूकही लढवली होती. चुरशीच्या झालेल्या या लढतीत पडळकर यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली होती.
राज्यात वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये पडळकर यांना पहिल्या क्रमांकाची मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीला सोडत असताना पडळकर यांनी भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं.
पडळकर यांनी म्हटलं, "धनगर आरक्षणाबाबत सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. त्यामुळे धनगर आरक्षणाला सरकारचं पाठबळ आहे. सरकारने समाजासाठी एक हजार कोटी दिले आहेत. 22 आदिवासी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजप सरकार धनगर समाजासाठी चांगलं काम करत असल्याची लोकांची भावना आहे आणि ती खरी आहे,"
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर टीका करणारे पडळकर आता भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पडळकर यांनी म्हटलं, "अजून माझी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली नाही. पण ही चर्चा झाल्यानंतर माध्यमांना कळवू."
भाजपमध्ये प्रवेश करणार?
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात पडळकर हे सध्या राज्यातला सेना-भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या महादेव जानकर यांच्यासोबत आघाडीवर होते. जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातही ते होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले.
आटपाडी-खानापूर परिसरात काम करताना सांगली जिल्ह्यातला भाजपचा चेहरा आणि धनगर आरक्षणाचे समर्थक म्हणूनही ते पुढे आले. पण त्यानंतर भाजपचे सांगलीचे खासदार असलेले संजयकाका पाटील यांच्यासोबतचे त्यांचे वाद जास्त गाजले.

फोटो स्रोत, FACEBOOK
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि आश्वासनावर भाजप सरकारनं फसवणूक केली, या मुद्द्यावर बाहेर पडून पडळकर वंचित बहुजन आघाडीत गेले होते.
लोकसभा निवडणुकीवेळी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत पडळकर यांनी भाजप सरकारच्या आरक्षणाच्या भूमिकेवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं, "आम्ही आंदोलन उभं केलं. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार चालढकल करतंय हे लक्षात आलं. मग आम्ही बाहेर पडलो"
कोण आहेत गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पडळकर हे दुष्काळी भागातल्या आटपाडीचे आहेत. या आटपाडीतलं पडळकरवाडी हे त्यांचं गाव. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा निवडणूकही लढवली आहे. 2009 मध्ये 'रासप'चे रिपब्लिकन डाव्या लोकशाही आघाडीतले उमेदवार म्हणून आणि 2014 मध्ये भाजपतर्फे पराभूत झाले, पण त्याच वेळेस वाढत गेलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात त्यांचं नेतृत्व पुढे येत गेलं.
पडळकरांचं राजकारणाव्यतिरिक्त काम म्हणजे ते चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि अभिनेतेही आहेत.
रविकांत तुपकरांचा स्वाभिमानीला रामराम
तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. तुपकर बुलढाणा इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढच्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, तुपकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. याबाबत तुपकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळं त्यांची भूमिका अजूनही समजू शकली नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचे एक भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचारासाठी शिरोळमध्ये केलेलं हे भाषण आहे. यावेळी रविकांत तुपकर यांनी चंद्रकांत दादांना व्यासपीठावरूनच खडे बोल सुनावले होते.
खरं तर लोकसभा निवडणुकीआधी रविकांत तुपकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती. या चर्चेला उत्तर देताना रविकांत तुपकर यांनी चंद्रकांत दादांना व्यासपीठावरून सुनावताना म्हटलं होतं, की जनतेत संभ्रम निर्माण करू नका.
"काहीही झालं तरी चालेल अगदी आत्महत्या करायची वेळ आली तरी चालेल पण मी तुमच्या पक्षात येणार नाही," हे लक्षात ठेवा असं रविकांत तुपकर यांनी चंद्रकांत दादांना म्हटलं होतं. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या याच भाषणांचा दाखला देत आता सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. इतकी जहाल वक्तव्य करणारे रविकांत तुपकर आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे तुपकर यांच्यावर टीका होत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








