उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजप समोर नमतं घेतलं का ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या आक्रमक रणनीतीसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमतं घेतलं आहे का?
२७ मे २०२० उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ६ महिने पूर्ण होतील. त्याआधी त्यांना आमदार होणं अनिवार्य होतं. राज्यपालांकडे नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला पण ती नियुक्ती झाली नाही.
मग केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विनंती करण्यात आली. ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक जाहीर झाली. पण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी ६ जागा लढणार असल्याचं जाहीर केलं.
भाजपनं ४ जागा लढविणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. १ जागेसाठीची रस्सीखेच सुरू झाली होती. महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचं संख्याबळ बळ होतं. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांची थोडी जुळवाजुळव केली असती तर भाजपच्या चौथ्या जागेपेक्षा कॉंग्रेसची दुसरी जागा निवडून आणणं जास्त सोपं होतं.
मग उध्दव ठाकरेंनी आक्रमक झालेल्या भाजपसमोर नमतं का घेतलं? यानिमित्ताने महाविकास आघाडीतले मतभेद समोर आले आहेत का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
'आम्ही नमतं घेतलं नाही'
कागदावर १६९ आमदारांच्या संख्याबळाचं गणित दिसतय. अगदी थोड्या मतांची जुळवाजुळव केली असती तर आघाडीला सहावी जागा मिळाली असती.
याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले कागदावरच गणित वेगळ असतं आणि प्रत्यक्षातलं राजकीय गणित हे वेगळ असतं. कॉंग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी ५८ मतांची गरज होती. प्रत्यक्षात त्यांच्याकडे ४४ जागा आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला दुसर्या जागेसाठी १४ जागा कमी पडतायेत.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

"मुख्यमंत्री रिंगणात आहेत अशावेळी त्यांना अधिकची ३-४ मतं द्यावी लागतील. त्याचबरोबर उपसभापती दुसरी जागा लढविता आहेत. शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसला २ जागा जिंकण्यासाठी ४ मतं कमी पडतायेत. त्याची जुळवाजुळव करावी लागेल आणि भाजपचं म्हणाल तर त्यांना चौथ्या जागेसाठी एक मत कमी आहे.
जर कोरोनाचं संकट नसतं तर आम्ही हा मतांचा जुगार खेळला असता पण आता निवडणूक बिनविरोध करणं गरजेचं आहे. राज्यावर मोठं संकट असताना मतांचा हा जुगार खेळता येणार नाही. त्यामुळे आम्ही कोणासमोरही नमतं घेतलं नाही. आम्ही सामंजस्याने प्रश्न सोडवला. कॉंग्रेसने यावेळी खूप सामंज्यस्याची भूमिका घेतली," असं संजय राऊत म्हणाले.
कॉंग्रेसचं मौन?
आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढलो तर ६ जागा निश्चितपणे जिंकता येतील असं बाळासाहेब थोरात यांनी रविवारी माध्यामांशी बोलताना म्हटलं होतं.
पण या वक्तव्याला काही तास उलटले नाहीत तोवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेस एका उमेदवाराचा अर्ज मागे घेत असून विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचं ट्विट केलं.
या ट्विटमध्ये त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे आभारही मानले. पण त्यानंतर कॉंग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. या बातमीसाठी आम्ही वारंवार काँग्रेस पक्षााच्या नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी काँग्रेसच्या या भूमिकेचं विश्लेषण केलं. ते म्हणाले, "कदाचित ही निवडणूक होण्यामागे भाजप आणि शिवसेनेचं डील असू शकतं जे कदाचित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला माहिती नसेल. भाजपला चार जागा आणि महाविकास आघाडीला पाच जागा देऊन ही निवडणूक करण्यासंदर्भात भाजपबरोबर डील झाल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच शिवसेनेने भाजपवर दबाव न आणता कॉंग्रेसची मनधरणी केली असावी."
कॉंग्रेसने गमावलं की कमावलं?
कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांचं एकच नाव जाहीर करण्यात आलं होतं. पण तरीही दुसर्या जागेसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्य पातळीवर राजकिशोर मोदी हे नाव जाहीर केलं.
त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर शिवसेना नेते कॉंग्रेसच्या नेत्यांच्या भेटीसाठी गेले.
याबाबत मिड-डे वृत्तपत्राचे शहर संपादक संजीव शिवडेकर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात.
ते म्हणतात, "जर कॉंग्रेसला ही जागा लढायची होती तर कॉंग्रेस नेते मातोश्रीवर का नाही गेले? शिवसेनेच्या नेत्यांना विशेष करून संजय राऊत यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन मनधरणी का करावी लागली? यातून कॉंग्रेसने निश्चितपणे भविष्यासाठी काहीतरी पदरी पाडून घेतलं असावं. जूनमध्ये राज्यपाल नियुक्त जागा आहेत. आताच्या निवडणुकीतून माघार घेऊन पुढे कॉंग्रेसने एखादी जागा अधिकची मिळवली तर आश्चर्य वाटणार नाही".

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे हा कॉंग्रेसचा मास्टर स्ट्रोक असल्याचं संजीव शिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. त्यामुळे ही कॉंग्रेसची राजकीय खेळी आहे की उध्दव ठाकरेंचं भाजपबरोबर असलेलं छुपं डील हे भविष्यात नक्की समोर येईल.
उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची निवड होण्यापासून ते आमदार होईपर्यंतचा प्रवास हा अनेक नाट्यमय घटनांनी गाजला आहे. त्यातच कोरोनाच्या काळात त्यांना राज्य सांभाळणं आणि मुख्यमंत्रिपद टिकवणं ही दुहेरी कसरत करावी लागली.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी दावा केलाय की काँग्रेसने त्यांना सहाव्या जागेची ऑफर दिली होती आणि भाजपचे 6 आमदार क्रॉस व्होटिंग करणार होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








