उदयनराजे भोसले आणि शरद पवार भेटीचे हे 4 अर्थ तुम्हाला माहिती आहेत का?

शरद पवार, उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, @Chh_Udayanraje

फोटो कॅप्शन, उदयनराजे भोसलेंनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी (11 फेब्रुवारी) नवी दिल्लीत भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

"शरद पवार मराठा समाजाचे सर्वांत मोठे नेते आहेत. तसंच त्यांच्या पक्षाचं सध्या महाराष्ट्रात सरकार आहे. त्यामुळे त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा असं मलाच नाही तर सर्वांना वाटतं," असं विधान भेटीनंतर उदयनराजेंनी केलं

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आल्यानंतर वर्षभराच्या आतच उदयनराजे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

त्यानंतरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या पोटनिवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची जाहीर भेट झाली.

त्यामुळे या भेटीचे नेमके अर्थ काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

कटुता दूर करण्याचा प्रयत्न

सातारा पोटनिवडणुकीआधी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांचे विचार संकुचित असल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

पण, आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ही भेट म्हणजे दोघांमध्ये निवडणुकीदरम्यान निर्माण झालेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांच्या मते, "सातारा पोटनिवडणुकीनंतर शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात जी काही कटुता निर्माण झाली होती, ती सोडून पुन्हा एकदा शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत आणि मी तुमचा चाहता आहे, हे दाखवण्यासाठी उदयनराजेंनी त्यांची भेट घेतली असावी."

तर 'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी सांगतात, "उदयनराजेंचं राजकारणच असं आहे की त्यात ते आज टीका करतात आणि उद्या मिठी मारतात. ते काही 24 तास द्वेष डोक्यात ठेवून राजकारण करत नाहीत. शरद पवार उदयनराजेंच्या कायम पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीदरम्यान आलेली कटुता दूर करण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न असू शकतो."

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, SAI SAWANT

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, "भाजपची मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका आहे. आम्ही मराठा आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं. पण, महाविकास आघाडी सरकार ते सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात अपयश ठरलं, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण ही पूर्णपणे राज्य सरकाची जबाबदारी आहे असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्यादृष्टीनं या भेटीगाठी सुसंगत आहेत."

शरद पवारांच्या कोर्टात चेंडू?

मराठा आरक्षण मिळालं नाही तर उद्रेक होईल. मराठा आरक्षणामध्ये शरद पवारांनी लक्ष घालावं, असंही उदनराजेंनी म्हटलं आहे.

यातून आता मराठा आरक्षणाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात ढकलण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न आहे का, या प्रश्नावर मिस्कीन सांगतात, "शरद पवारांच्या कोर्टात चेंडू टाकण्याचा प्रश्नच नाही. उदयनराजेंनी अशाप्रकारे भूमिका घेणं अभिप्रेत आहे. संभाजीराजे आणि उदयनराजे हे दोघेही आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. संभाजीराजेंनी मोदींची वेळ मागितली होती, पण ती देण्यात न आल्यामुळे कदाचित उदयनराजेंनी आता पवारांची वेळ मागितली असावी. जेणेकरून शरद पवारांच्या माध्यमातून मोदींना भेटण्यासाठी या दोन्ही राजांना वेळ मिळू शकेल."

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter

"सध्या महाराष्ट्र सरकारचे प्रमुख शरद पवार आहेत. उदयनराजे किंवा संभाजीराजे या दोघांनीही मराठा आरक्षण प्रश्नाचं नेतृत्व केलं तरी सध्या त्यांच्या हातात काहीच नाहीये. दुसरं म्हणजे नेतृत्व केलं आणि त्यातून काही घडलं नाही तर लोक जबाबदार धरतात. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता आम्ही तुमच्या हातात दिलाय, तुम्हीच दाखवा करून, असंही सांगण्याचा उदयनराजेंचा यामागचा उद्देश असू शकतो," विनोद कुलकर्णी त्यांचं मत व्यक्त करतात.

उद्धव ठाकरेंची तक्रार?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत नेमकं काय काय झालं आहे याची श्वेतपत्रिका काढावी. तसंच मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली जात नाही, असंही उदयनराजे यांनी शरद पवारांनी म्हटलं आहे.

त्यामुळे ही भेट म्हणजे उदयनराजे उद्धव ठाकरेंची शरद पवारांकडे तक्रार केली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

"उदयनराजेंची ही भेट म्हणजे कही पे निगाहे, कही पे निशाणा असू शकते. कारण शिवसेना कधीच उदयनराजेंना जवळ करत नाही. उद्धव ठाकरेंनी एका सभेत म्हटलं होतं की, 'नावापुढचं राजे काढून बघा, मग कळेल कुणी ओळखतं का?' तेव्हापासून शिवसेना आणि उदयनराजेंचं बिनसलं आहे," असं एका स्थानिक पत्रकारानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter

दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता शरद पवारांची भेट घेऊन उदयनराजे या दोघांना एक मेसेज देऊ इच्छित असावेत, असंही ते पुढे सांगतात.

विनोद कुलकर्णी सांगतात, "मराठा समाजात एकंदर सूर आहे की, सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली जात नाहीये किंवा मराठा आरक्षण प्रश्नाचा फॉलो-अप घेतला जात नाहीये. त्यामुळे उदयनराजे या भेटीतून उद्धव ठाकरेंची शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न असू शकतो."

भाजप-राष्ट्रवादी सत्तेची चाचपणी?

2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. इतकंच काय 2019च्या निवडणुकीनंतरही शरद पवारांनी मोदींची भेट घेतली होती. त्यामुळे आताही भाजप-राष्ट्रवादीमधील भेटीगाठी ही एकत्रित येऊन सत्तेसाठीची चाचपणी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याविषयी अभय देशपांडे सांगतात, "भाजपकडून देवेंद्र फडणवीस सरकारचं नेतृत्व करतील हे स्पष्ट आहे, राष्ट्रवादीचा त्याला आक्षेप आहे. पण, भविष्यात महाविकास आघाडीत काही पेच निर्णय झाल्यास आणि काही नवीन समीकरणं मांडायची झाल्यास राष्ट्रवादी काही विचार करू शकेल. पण, आता तरी शरद पवार लगेच तसा निर्णय घेतील, अशी शक्यता नाही.

"याचं कारण आता राष्ट्रवादीकडे सत्तेवरचं जेवढं प्रभुत्व आहे, तेवढं भाजपबरोबर गेल्यानंतर राहणार नाही. कारण भाजपच्या 105 जागा आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीत शरद पवार तसा निर्णय घेणार नाही."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)