कामगार कायदा : 4 दिवसांचा आठवडा आणि 3 दिवसांची सुटी लागू होणार?

तुम्ही आठवड्याचे किती दिवस काम करता? 5 की 6 की सातही दिवस? तुम्हाला ऐकून आनंद होईल की आता भारतात 4 दिवसांचा आठवडा आणि तीन दिवस आराम ही गोष्ट कदाचित लवकरच वास्तवात उतरू शकेल.

केंद्र सरकारने कंपन्यांना तसा पर्याय देऊ केलाय. पण हे खरंच होणार आहे का? हे केल्यामुळे कंपन्यांचं नुकसान होऊ शकेल का? 4 दिवस कर्मचाऱ्यांची पिळवणूक तर होणार नाही ना? आणि मुळात यामुळे उत्पादकता वाढेल का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखात घेऊ या.

काय आहे केंद्र सरकारचा प्रस्ताव?

केंद्र सरकारने नव्या लेबर कोडमध्ये म्हणजे कामगार नियमांमध्ये अशी तरतूद केलीय की कंपन्यांना इथून पुढे कामाचा आठवडा चार दिवसांचा करता येऊ शकेल. पण तसं केलं तर कर्मचाऱ्यांना दिवसाला 12 तास काम करावं लागेल. कारण आठवड्याला 48 तास काम ही मर्यादा तशीच ठेवलीय.

या नव्या कामगार नियमांची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करायचा केंद्र सरकारचा इरादा आहे. त्यामुळे 4 दिवस 12 तास करायचं, पाच दिवस साडे नऊ काम करायचं की 6 दिवस 8 तास काम करायचं... हे कंपन्या आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ठरवायचं आहे.

4 दिवसांचा पर्याय केंद्राने पहिल्यांदाच दिला असला तरी त्याची कोणतीही सक्ती नाही, असंही कामगार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं.

उद्योग संघटना आणि कामगार संघटना काय म्हणतात?

उद्योग जगतातल्या अनेकांनी या नव्या पर्यायाचं स्वागत केलं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणतात, "नवीन कामगार नियम सक्तीचे नाहीयत त्यामुळे कंपन्यांना हा पर्याय उपलब्ध राहील. एखादा कर्मचारी जर दररोज दोन-तीन तास प्रवासात घालवत असेल तर त्याला ते फक्त आठवड्याचे चारच दिवस घालवावे लागतील आणि बाकीचे दिवस तो कुटुंबाला देऊ शकेल. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही हे चांगलं ठरेल."

पण कर्मचाऱ्यांना 12 तास काम करण्याचा शीण येऊन त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही का? याबद्दल बोलताना गिरबने म्हणतात, "हॉस्पिटॅलिटी किंवा एअरलाईन क्षेत्रात कर्मचारी 12 तास काम करतातच की. ज्या क्षेत्रांना हे शक्य आहे त्यांनी हा पर्याय निवडावा. जिथे शक्य नाही तिथे आरोग्य सुरक्षितता धोक्यात घालून हा पर्याय निवडू नये."

पण कामगार संघटना या निर्णयाबद्दल नाखूष आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना इंटकचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय कुमार सिंह म्हणाले की 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम ही विभागणी कृत्रिम आहे. ते पुढे म्हणतात, "आम्ही सहा तासांच्या ड्युटीची मागणी करतोय आणि सरकार 12 तास काम करण्याची तजवीज करतंय. आम्ही या नवीन नियमांविरोधात सरकारला प्रस्ताव दिला होता, पण या सरकारला कुणाशी चर्चाच करायची नाहीय. सरकारला खुशाल नवीन नियम आणू दे, गरज पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ."

चार दिवस खूप काम आणि तीन दिवस पूर्ण सुटी, या नव्या पर्यायाबद्दल कर्मचाऱ्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आठवड्यात एक दिवस जास्त सुटी मिळणार आणि आपली इतर कामं करण्याठी रजा वाया घालवावी लागणार नाही याबद्दल काहींनी आनंद व्यक्त केला. पण काहींना 12 तास सलग काम केल्यानंतर त्या दिवशी घरच्यांसाठी काहीच वेळ मिळणार नाही तसंच इतके तास सलग काम करून उत्पादकताही कमी होईल याची काळजी वाटते.

उत्पादकता कशी वाढते?

तुमच्या कामाच्या वेळेत तुम्ही काम किती करताय आणि ते किती चांगल्या पद्धतीने करताय याला उत्पादकता म्हणता येईल.

कामाचे तास आणि उत्पादकता यावर बरीच संशोधनं झाली आहेत. स्वीडनमध्ये दिवसाला सहाच तास काम करण्याच्या प्रयोगाला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं.

न्यूझीलंडमध्ये गेल्या वर्षी युनिलीव्हर कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारकपात न करता 4 दिवसांचा आठवडा देऊ केला. त्यांनाही याचे चांगले निकाल पाहायला मिळाले.

ओहायो विद्यापीठाच्या एका संशोधनात असं दिसून आलं की कामाचा आठवडा लहान केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत 64 टक्के वाढ झाली. पण याचा अर्थ 6 दिवसांचे तास चार दिवसांत संपवणं असा नाही.

युकेतला एक सर्व्हे सांगतो की ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी 8 तासांच्या दिवसांत 2 तास 53 मिनिटंच कामावर लक्ष देऊ शकतात.

मायक्रोसॉप्टने 2020च्या सुरुवातीला जपानमध्ये 4 दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग केला. मीटिंग्जची वेळही कमी केली, फार तर अर्धा तासच मीटिंग करायची असा नियम केला. या प्रयोगानंतर त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत 40 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर त्यांचं वीजबीज 23 टक्क्याने कमी झालं. प्रिंटआऊट्स घेण्याचं प्रमाण 59 टक्क्याने कमी झालं.

पण याच्या बरोब्बर उलट दृष्टिकोन चिनी उद्योगपती जॅक मा यांचा आहे. आठवड्याचे सहा दिवस, दररोज 12 तास काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणंय. हे एक वरदान असल्याचं जॅक मा म्हणाले होते. कामाचं स्वरूप काय आहे, यावरही तासांचं गणित आणि उत्पादकता अवलंबून असते, हे लक्षात घ्यायला हवं.

या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात की जास्त तास काम केल्याने जर मानसिक आणि शारीरिक ताण येत असेल तर त्यामुळे व्यक्तीची उत्पादकता कमी होते. त्यामुळे जास्त तास काम केल्यानेच उत्पादकता वाढते ही भ्रामक समजूत आहे. यामुळेही 12 तास काम करण्याच्या प्रस्तावावर अनेकांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय.

योगायोग असा की वर्षभरापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला होता. तेव्हाही त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)