You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी भावुक, गुलाम नबी आझादांबाबत बोलताना अश्रू अनावर
राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपत असताना केलेल्या भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले.
गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. चारही सदस्य जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व करतात. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले.
मोदी म्हणाले, "गुलाम नबी आझाद यांची क्षमता जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगी पडेल. मी अनेक वर्ष जम्मू काश्मीरमध्ये काम केलं. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जे कुणी हे पद सांभाळेल त्यांना गुलाम नबी यांच्यासारखं राहताना अडचण येईल. कारण गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. मी शरद पवार यांनाही याच श्रेणीत बघतो. मी एक बैठक घेत होतो. त्यावेळी त्यांनी फोन करून सांगितलं की, सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घ्या. मी ती बैठक घेतली. 28 वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो."
निवडणुकीच्या राजकारणात नसताना नरेंद्र मोदी आणि गुलाम नबी आझाद यांची भेट पाहून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. गुलाम नबी आझाद म्हणाले, "आम्हाला नेहमी वादविवाद करताना बघता पण, आम्ही कुटुंबासारखे आहोत. गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरची आठवण यावी असं गार्डन तयार केलेलं आहे."
जेव्हा गुजरातमधील यात्रेकरूंवर कट्टरतावाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वांत आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणब मुखर्जी यांना फोन केला. रात्री उशीर झाला होता.
दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह आणण्यासाठी लष्कराचं विमान उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर रात्रीही गुलाम नबी यांनी पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील माणसांची चिंता करतो, तशी चिंता त्यांच्या तोंडी होती.
पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावुक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे असं सांगताना पंतप्रधान मोदींना भरून आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)