ड्रेस कोड: राज्य सरकारचा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड, जीन्स-टीशर्टला बंदी

शासकीय कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये कोणते कपडे घालावेत यासाठीच्या मार्गदर्शक सूचना सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत.

मंत्रालय आणि मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमधून राज्य सरकारचा कारभार चालवला जातो, इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातं, म्हणून या कर्मचाऱ्यांचा पेहराव हा कार्यालयाला अनुरूप असणं गरजेचं असल्याचं महाराष्ट्र शासनाने या परिपत्रकात म्हटलंय.

कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी हे ऑफिसच्या वेळेमध्ये शासकीनय कर्मचाऱ्याला अनुरूप वेशभूषा करत नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कर्मचाऱ्यांच्या लोकांच्या मनातल्या प्रतिमेवर होत असल्याचं या पत्रकात सरकारने म्हटलंय.

म्हणूनच ज्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने गणवेश नेमून दिलेला आहे, असे कर्मचारी वगळता इतरांसाठी कार्यलयीन पेहरावासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

या गाईडलाईन्सनुसार :

  • अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जीन्स - टी शर्ट घालून येता येणार नाही, सोबतच गडद रंगाचे, चित्र विचित्र नक्षी वा चित्रं असणारे कपडे घालू नयेत असं सांगण्यात आलंय.
  • महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार अथवा चुडीदार आणि कुर्ता, ट्राऊझर - शर्ट घालावेत, गरज असल्यास ओढणी घ्यावी, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय.
  • शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा - शुक्रवारी खादीचे कपडे घालावेत, असं सांगण्यात आलंय.
  • सोबतच ऑफिसमध्ये येताना स्लीपर्स घालू नयेत, चप्पल - सँडल वा शूज घालावेत असंही या सूचनांमध्ये म्हटलंय.
  • कर्मचाऱ्यांचे कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असावेत. आणि त्यांनी ओळखपत्र दिसेल असं लावावं अशी सूचना देण्यात आलेली आहे.
  • शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी कर्मचारी आणि सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सगळ्यांनाही या सूचना लागू असतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)