2020 वर्षं तर सरलं, 2021 मध्ये 'या' 5 पद्धतीने पैशाचा प्रश्न मिटवा

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकाच्या घरचं एक ठरलेलं बजेट असतं. खर्च जरा वर-खाली झाला. तर, संपूर्ण घराचं बजेट कोलमडतं. त्यामुळे, महिन्याच्या सुरूवातीला पैशांचं नियोजन करून आपण त्यानुसार खर्च करतो.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये रहाणाऱ्या अमांडा क्लेमन पैशांचं नियोजन करत नव्हत्या. मात्र, आर्थिक चणचण भासू लागल्यानंतर त्यांना नियोजनाचं महत्त्व समजलं.

कोव्हिड-19 संसर्गाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे 2021 मध्ये पैशांचं नियोजन कसं करायचं? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. पाच सोप्या पद्धतीने आपण पैशांच नियोजन करू शकतो याची माहिती अमांडा देत आहेत.

अमेरिकेत आर्थिक व्यवहार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या अमांडा बीबीसी मुंडोशी बोलताना सांगतात, 'माझ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली होती. मला फार लाज वाटत होती.' अमांडा यांच्यावर 19 हजार डॉलर्सच (14 लाख रूपये) कर्ज झालं होतं.

पैशांचं नियोजन

अमांडा यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर मोठा होता. या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं, या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. आईच्या मदतीने अमांडा यांनी कर्ज फेडलं.

त्यानंतर अमांडा यांना पैशांच्या नियोजनाचं महत्त्व पटलं. अमांडा कधीच आर्थिक नियोजन करत नव्हत्या. मात्र ठेच लागल्यानंतर त्यांनी बजेट आणि आर्थिक नियोजन सुरू केलं.

अमांडा सांगतात, "मी पहिल्यापासून बजेट आखण्यासाठी टाळाटाळ करत होते. बजेट आखल्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर गदा येईल असं मला वाटत होतं."

मात्र, बजेट आखल्यानंतर त्यांना जास्त स्वातंत्र्य मिळतं याची जाणीव झाली. त्यांचे वायफळ खर्च हळू-हळू कमी झाले. अमांडा पैसे साठवू लागल्या. आणि साठवलेल्या पैशातून त्यांनी कर्ज फेडलं.

अमांडा सांगतात, "कर्जाच्या डोंगरामुळे मला एक रस्ता मिळालाय. आता पैशांच्या व्यवहाराबाबत मी जास्तीत-जास्त खबरदारी घेत असते."

अमांडा यांनी काही वर्ष समाजसेवा क्षेत्रात काम केलं. मात्र, आर्थिक नियोजनाची आवड निर्माण झाल्याने अमांडा आर्थिक व्यवहारतज्ज्ञ बनल्या आहेत.

पैशांच्या बाबतीत आपण का घाबरतो?

अनेकांना आर्थिक चणचण भासते. हातात पैसा नसल्याने लोक चिंतातूर होतात. अमांडा अशा लोकांना मदत करतात. ज्या व्यक्तींना आर्थिक प्रश्नांमुळे त्रास होतोय. अशा लोकांसाठी माहिती देणारे विविध कोर्स आयोजित करतात. सामान्यांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करतात.

अमांडा सांगतात, "एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला त्रास होत असेल, तर, शरीर आणि मन आपल्याला धोक्याची सूचना देतात. आपण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार होतो. पण, लोक घाबरलेले असल्यामुळे संभाव्य धोक्यांवर लक्ष देत नाहीत."

अमांडा सांगतात, "म्हणून आर्थिक चणचण भासू लागली की आपण खूप घाबरतो. अशावेळी, विचारपूर्वक निर्णय न घेता, घाईगडबडीत निर्णय केला जातो."

त्या पुढे सांगतात, "या चुकीच्या निर्णयांमुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते. ज्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. आपण अधिक घाबरतो. एका पाठोपाठ एक संकटांनी खचून जातो. यावर मात करण्यासाठी आपल्याला, भीतीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. शांतपणे आपल्यासोबत काय होत आहे, याचा विचार केला पाहिजे."

आर्थिक चणचण भासल्यामुळे प्रत्येक व्यक्ती घाबरून जातो. पण, यावर मात करण्यासाठी अमांडा पाच मार्ग सांगतात.

1. पैशांच्या बाबतीत उत्सुक राहा

आपल्याला मिळणाऱ्या पैशांच्या बाबतीत उत्सुक रहाणं गरजेचं आहे.

तुम्ही केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराबाबत माहिती ठेवा. आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास करा. फक्त कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित करू नका.

तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? त्याचा विचार करा. स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारा. मी केलेला आर्थिक व्यवहार योग्य आहे? मी माझ्या वेळेचा सदुपयोग करतोय का? या प्रश्नांनी तुम्हाला उत्तरं मिळतील.

2. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा

महिन्यात कमीत-कमी तीन वेळा या गोष्टी करा:

बॅंकेत किती पैसे येतात आणि किती पैशांची बचत होते याकडे लक्ष द्या

येणाऱ्या काळात आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा विचार करा

3. योग्य आर्थिक नियोजन करा

उदाहरणार्थ, घराचं भाडं वाढत असल्यास तुम्हाला बजेटमध्ये बदल करावा लागेल.

यासाठी तुमच्याकडे काही पर्याय उपलब्ध असला पाहिजे.

4. वेळेआधी योग्य नियोजन करा

तुम्हाला जे मिळालंय, त्यावरून तुमची गुणवत्ता ओळखा

लक्ष डोळ्यासमोर ठेऊन तुमची प्रगती किती झाली. याचा सारासार विचार करा.

लक्ष पूर्ण का झालं नाही. या गोष्टीचा जास्त विचार करू नका.

तुम्ही हळू-हळू पुढे जात असाल. पण, याचा अर्थ तुमच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे.

आर्थिक परिस्थितीबद्दलची भीती एका रात्रीत काढून टाकता येणार नाही.

5. नवनवीन प्रयोग करत रहा

अपयशी होण्याची भीती वाटत असल्यामुळे आपण नवीन प्रयोग करायला घाबरतो.

प्रत्येक गोष्टी करण्याची पद्धत वेगळी असू शकते.

थोडा विचार केल्यानंतर अनेक रस्ते खुले होऊ शकतात

सकारात्मक विचार केला पाहिजे.

पैसे नसणं ही 'चांगली गोष्ट' आहे

पैसे नसणं ही 'चांगली गोष्ट' आहे, हे ऐकण्यासाठी थोडं विचित्र वाटतं. मात्र यामुळे परिस्थितीत बदल करण्यासाठी विचार करता येऊ शकतो.

अमांडा म्हणतात, "आर्थिक परिस्थितीला आपण तोंड देऊ शकत नाही. असा विचार करण्यापेक्षा, या परिस्थितीतून आपण कसे बाहेर पडू शकतो. याचा विचार केला पाहिजे."

ही काही जादू नाही

अमांडा सांगतात, "फायनान्शिअल थेरपी आणि आर्थिक व्यवहारांच्या विकासाबद्दल विचार करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे. ही काही जादूची छडी नाही."

"आपलं शरीर आणि मन आपल्याला काय संकेत देत आहेत. हे जाणून घेण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आव्हानांबद्दल विचार केला पाहिजे."

तुमची नोकरी गेली तर?

नोकरी गेली असेल तर, आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या मते, लोकांनी शांतपणे बसून विचार केला पाहिजे. नक्की काय परिस्थितीत आहे, याचा विचार केला पाहिजे.

ज्या लोकांना तुम्ही देणं लागता. त्यांच्या चर्चा केली पाहिजे. पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडून थोडा वेळ मागून घेतला पाहिजे.

तुमच्याकडे साठवलेले पैसे किती दिवस पूरू शकतात. या पैशातून किती दिवस खर्च चालवू शकता याचा विचार केला पाहिजे.

तुम्ही भविष्यासाठी साठवलेले पैसे खर्चासाठी पुरणार नाही. पण, कर्ज आणि व्याज भरण्यासाठी याची निश्चित मदत होऊ शकते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)